नवीन वर्षाचे स्वागत करताना .



नवीन वर्षाचे स्वागत करताना 
देवगीरी मिरर दि. ३१-१२-२०२५

  आपण मावळत्या वर्षाला निरोप देत,नवीन वर्षाचं स्वागत करीत आहोत.खरं तर नोव्हेंबर संपून डिसेंबर महिना सुरू झाला तेव्हापासूनच नवीन वर्ष येत आहे याची उत्कंठा असते तर, सरत्या वर्षाला निरोप देताना मन कातर होते. सरत्या वर्षाने आपल्या ओंजळीत बरंच काही घातलेलं असतं. यात काही सुखद क्षण असतात तर काही अप्रिय आठवणी. काही मिळवलेलं असतं तर काही गमावलेलं असतं. कोणी जवळ आलेलं असतं , काही नवीन नाती निर्माण झालेली असतात, काही तर काही तरी दुरावलेलं असतं त्याची पोकळीही निर्माण झालेली असते . अनेक गोष्टी साध्य केलेल्या असतात तर काही पुर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात राहून गेलेलं असतं. साध्य झालेल्या गोष्टींचं समाधान, अपुरे राहिलेल्या कामं करण्यासाठीचं मनोबल,
असं बरंच काही सरत्या वर्षाने आपल्याला दीलेलं असतं शेवटी शेवटी याची गोळाबेरीज मनात सुरू होते.
त्यामुळे त्याला निरोप देताना मनात कातरता निर्माण होते. आपण त्याला पकडून ठेवायचा प्रयत्न करत राहातो. आपण नीट बसविलेली घडी सोबत घेऊन जाणार असतं, त्यामुळे पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचं दडपण व यापेक्षा छान सुरुवात करू ही आस घेऊन आपण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी केलेली असते.  
असं जरी असलं तरी मशहूर हिंदी कवी जावेद अख्तर यांच्या दृष्टीने काळाचा प्रवास सुरू आहे की आपणच यातून पुढे पुढे जात आहोत -

कभी-कभी मैं ये सोचता हूँ
कि चलती गाड़ी से पेड़ देखो
तो ऐसा लगता है दूसरी सम्त जा रहे हैं
मगर हक़ीक़त में पेड़ अपनी जगह खड़े हैं
तो क्या ये मुमकिन है
सारी सदियाँ क़तार अंदर क़तार
अपनी जगह खड़ी हों
ये वक़्त साकित हो और हम हीं गुज़र रहे हों

वरील ओळी प्रमाणे आपण कधी विचार करतंच नाही. आपल्या अस्तित्वासोबत काळाचा छोटासा भाग आपल्या नावावर असतो. किती आहे तेही माहीत नसतं. यांचं भान मात्र आपल्याला नसतं. 
हा अंतहीन काळ कधीचा थांबून आहे. याच्या पोटात असंख्य ग्रह तारे आकाशगंगा जन्म घेतात लोप पावतात . आपण एका ग्रहावरील जीवन साखळीतील एक घटक आहोत. 
हे भान नसणं ही माणसाची ताकद आणि उणीव दोन्ही आहे. मानव स्वतःला सृष्टीच्या अस्तित्वाचा स्वामी समजून व्यवहार करत असतो. 
हा समज मानवाची शक्ती आहे कारण आजचे जग याच समजातून निर्माण झाले आहे. मानवाने निसर्गाचे निरीक्षण करत काळाला आपल्या भाषेत परिभाषित केले. दिवस , महिने वर्ष जन्माला घालून त्यांचं नामकरण केलं. इथल्या प्रत्येक गोष्टीवर आपले स्वामित्व अधोरेखित केले. प्रत्येक गोष्ट आपल्या सोयीनुसार व सोईसाठी रुपांतरीत केली.
हाच स्वामी असल्याचा भाव मानवाच्या सृजनाला बळ पुरवत असतो. यामुळेच माणूस गुहेतून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंतचा प्रवास करू शकला.
हेच सृजन जेव्हा विनाशकारी वाटेवर जाते तेव्हा ती माणसासह जीवसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते . या दोन्ही गोष्टी व्यक्तीगत स्तरावर असोत की सामुहिक परिणाम सारखाच असतो. चांगल्या गोष्टींचा परिणाम चांगला तर वाईट गोष्टींचा परिणाम वाईट. चांगल्या कृती व्यक्तीगत असतील तर फायदा किंवा त्यातून निर्माण झालेले मांगल्य हे मर्यादित असतं तर चांगले काम सर्वव्यापी असेल तर ते लोककल्याणकारी ठरतं त्याची उपयोगिता अवघ्या समष्टीला व्यापून उरते . अशा कृतीतून निर्माण होणारे मांगल्य हे सर्वव्यापी असतं. जे की अनेक संतांनी,महात्म्यांनी, महापुरुषांनी आपल्या विचारांनी आपल्या कृतीतून निर्माण केले. अनेक वैज्ञानिकांनी जीवनोपयोगी शोध लावून निर्माण केले. जर ही सृजनशक्ती नकारात्मकता घेऊन आली तर ती विनाशकारी ठरते. 
हे आपल्या तेव्हाच लक्षात येतं, जेव्हा आपण जागरुकपणे आपल्या कृतीकडे पाहतो. 
ही आत्मपरीक्षणाची संधी सरत्या वर्षाच्या व नवीन वर्षाच्या आत जो क्षणाचा नाजूक पुल असतो तो उपलब्ध करून देत असतो. आपण काय केले. काय करायला हवे होते,काय करायला नको होते,किंवा काय करू शकतो यावर माणूस या संक्रमणाच्या क्षणात सगळी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करीत असतो. याच क्षणांत ही चिंतनाची तीव्रता अधिक वाढते. 
या मंथनातून काही उत्तरं सापडतात तर काही प्रश्न अवघड कोड्याचं रुप धारण करून मागे उरतात. नवीन वर्ष हे उत्तर शोधण्यासाठी एक दरवाजा खुला करून देते. 
येणारी जाणारी वर्ष आपल्याला एवढंच सांगत राहतात की जीवन नदी सारखं वाहतं असायला हवं. तेव्हाच ते अर्थपूर्ण व उपयोगी होऊन जातं. 
 
   माणसाची अनेक गोष्टी मागे धाव सुरू असते . यात सगळंच महत्वपूर्ण असतं असंही नाही. 
या संक्रमणाच्या वेळी पावलांचा वेग मंदावून थोडी उसंत घेऊन स्वतःपाशी थांबायला हवं . 
आत काय पडझड झाली बघायला हवं. कोणती जागा लिंपून तर कोणती शाकारून घ्यायला हवी. आतल्या अवर्षणग्रस्त होत चाललेल्या सृष्टीची निगराणी करायला हवी. 
खरं तर माणूस सगळा निसर्ग, सगळे ऋतू, आपल्या आत साठवून असतो.तो भिंतीआत रहायला आला आणि निसर्ग व आपल्या आत एक भिंत उभारून घेतली. स्वतःचं जगणं कृत्रिम करून घेतलं. स्वतःला जीवंत गोष्टी पेक्षा निर्जीव वस्तूशी जास्त जोडून घेतले. 
 बाह्य गोष्टीमागे वाहताना, 
तो नैसर्गिक जगण्यापासून दुरावला आहे. 
जगण्यातील अस्सल अनुभुतीला पारखा झाला आहे. 
याची त्याला जाणीव नाही अशातला भाग नाही.
 या कृत्रिमतेने त्याच्या जीवनाच्या सर्वच स्तराला व्यापून टाकले आहे. प्रेम, नाती, परिवार अध्यात्म अगदी हेही यातून सुटलेले नाहीत !! याच कारणांमुळे माणूस आतून रिक्त व अस्वस्थ होत चालला आहे. तो आपल्या जीवनाच्या केंद्रापासून दुरावला आहे. 
म्हणूनच तर तो दरवर्षीच्या सुरवातीला अनेक संकल्प करतो. मात्र यासाठी लागणारी शिस्त लावण्यात कमी पडतो. धकाधकीच्या जीवनात गोंधळलेल्या अवस्थेत जगत असताना केलेले संकल्प मागे पडतात. 
 चिकाटीने तो पुर्णत्वास नेण्यासाठी थोडं कठोर व्हावं लागतं हेही आवाक्याबाहेरचं वाटतं.
चांगल्या गोष्टीं मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नेमकं इथेच कमी पडतो. वेळ सत्कारणी लावला जात नाही. ही खंत सरते वर्ष देऊन जाते तर नवीन वर्ष नवीन आस नवीन उर्जा घेऊन येते. म्हणून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण एवढे उत्सुक असतो. या वर्षात मागच्या वर्षीच्या जगण्याचे तटस्थपणे अवलोकन करून, स्वतःला आपल्या जगण्याच्या मुळ केंद्रशी स्थिर करायचा प्रयत्न करायला हवा. आपल्या जवळ असलेल्या वेळेचा सदुपयोग या सृष्टीत मांगल्य निर्माण करण्याचे प्रयत्न करायला हवेत. सगळी आवरणे टाकून येणारे सगळे ऋतू अंगावर झेलून पहायला हवेत. 
दर पौर्णिमा अमावस्येला 
टिपूर चांदणे व गडद काळोख डोळ्यात साठवून घ्यायला हवे. लहानपणीसारखा कोसळता पाऊस छत्रीने न आडवता झेलून पहायला हवा. थंडीचा गारठा, उन्हाच्या झळांचे चटके अनुभवायला हवेत. अनवाणी पायांनी गरम फुफाट्यात चालून पहायला हवं. डोंगर चढणे, नदीच्या पात्रात पाय सोडून बसणे किती सुखद असतं हे अनुभवायला हवं. 
आपल्या हाती असलेल्या वर्षात या नैसर्गिक जगण्याशी अधूनमधून स्वतःला जोडून घ्यायला हवं. 
कधीतरी हा काळाची ये जा आपल्यापुरती थांबणार असते हे अटळ सत्य आहे . काळ व त्याच्यातून उगवणारे सर्व काही जसेच्या तसे सुरू राहणार आहे. 
मात्र आपल्यावर जेव्हा हा जगण्याचा रंगमंच सोडण्याची वेळ येईल तेव्हा कसलीही सल मनात रहायला नको. त्याच बरोबर जे आपली जागा घेणार आहेत त्यांचा मार्ग आपण सोपा करतो आहोत की अवघड याचाही विचार असायला हवा. हे जग त्यांच्या हाती सोपवताना ते देण्यायोग्य असायला हवं ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. आपल्या जगण्यासोबतच, हे जगही सुंदर करण्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठीचा संकल्प करणे आवश्यक आहे. मानवी विकासाच्या या टप्प्यावर आपल्यातील पशूपणाचा लय होवून माणूसपणही विस्तारत जावो . त्यांच्या कृतीतून मांगल्य निर्माण होवो. 
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 

-छाया बेले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार