चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)
“अमूक बाई खूप चांगली…”
“ती कुणाच्या नजरेसही पडत नाही…”
“कधी तिचा आवाज सुद्धा घराबाहेर ऐकू येत नाही…”
“रस्त्यानं जाताना ती वर मान करून इकडं तिकडं बघत सुद्धा नाही…”
या वाक्यांमध्ये केवळ कौतुक नसतं, तर एक अदृश्य अपेक्षा दडलेली असते.
इतकंच नाही, एखाद्या बाईने आयुष्यभर सहन करत शेवटी आत्महत्या केली तरी तिच्या सहनशीलतेचं गौरविकरण केलं जातं—
“आशिलाची लेक मरूनच गेली, पण कुणाला सांगितलं नाही… जिवंतपणी घराचा दरवाजा ओलांडून गेली नाही…”
अशा प्रकारे तिच्या वेदनेचं, तिच्या चुप्पीचं, तिच्या सहनशीलतेचंही कौतुक केलं जातं.
आणि या सगळ्यालाच “चांगली स्त्री” म्हणण्याची सवय आपल्याला लागलेली असते.
मीही हेच ऐकत मोठी झाले. नकळत त्याचं अनुकरणही केलं.
पण जसं जसं वाचन वाढत गेलं, तसं तसं मनात एक अस्वस्थता निर्माण व्हायला लागली.
हे सगळं नेमकं काय आहे?
चांगली स्त्री असणं म्हणजे स्वतःला इतकं गमावणं आवश्यक आहे का?
लहानपणी ऐकलेली एक साधी गोष्ट आजही मनात खोलवर रुजलेली आहे.
एक सासू तिच्या नव्या सुनेबद्दल अभिमानाने सांगते—“माझी सून खूप नाजूक आहे, ती अर्धीच भाकरी खाते.”
आणि त्या दिवसापासून ती सून खरंच अर्धीच भाकरी खाऊ लागते.
हळूहळू तिची तब्येत खालावते.
आईने विचारलं तेव्हा ती सहज म्हणते—“माझी सासू मला अर्धी भाकरी खाणारी नाजूक सून म्हणते… मग मी जास्त कसं खाऊ?”
ही फक्त एक गोष्ट नाही, तर त्या व्यवस्थेचं सूक्ष्म रूप आहे, जी अशा अनेक अदृश्य सापळ्यांनी स्त्रीला बांधून ठेवते.
ती स्वतःलाच मर्यादा घालायला शिकते आणि त्या मर्यादांनाच “चांगुलपणा” मानू लागते.
लहानपणापासून आपण सतत काही वाक्यं ऐकत मोठे होतो—“मुलीने असं वागायचं नसतं”, “शांत राहाणं मुलीला शोभतं”, “जास्त बोलू नको, चांगल्या मुली तसं करत नाहीत.”
ही वाक्यं केवळ सूचना नसतात, तर जणू टाकीचे घाव घालून आकार देण्याची प्रक्रिया असते.
हा आकार हळूहळू मुलीच्या मनात कायमचा बसतो.
आणि पुढे ती स्वतःलाच त्या चौकटीत बसवायला शिकते.
समाजाने “चांगली स्त्री”ची एक ठराविक प्रतिमा तयार केली आहे—ती त्याग करणारी असते, शांत आणि सहनशील असते, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देते, विरोध करत नाही आणि सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करते.
ही जणू चांगुलपणाची एक मोठी यादी आहे. ज्याने ती पूर्ण केली, ती “चांगली स्त्री” ठरते.
पण या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते—तिच्या स्वतःच्या इच्छा, भावना आणि स्वप्नांना कुठेच जागा नाही.
तिचं अस्तित्व इतरांच्या नावे केलं जातं, तेही तिला कळू न देता.
ही संकल्पना अचानक तयार झालेली नाही. ती अनेक वर्षांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रक्रियेतून तयार झाली आहे.
पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीला नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. तिची भूमिका घर आणि कुटुंबापुरती मर्यादित ठेवण्यात आली.
“संस्कार” या नावाखाली तिला शांत राहणं, सहन करणं आणि स्वतःला मागे ठेवणं शिकवलं गेलं.
“लोक काय म्हणतील?” हा दबाव तिच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवत राहिला.
देवी, त्यागमूर्ती, पतिव्रता अशा प्रतिमांनी तिच्यासमोर एक आदर्श उभा केला, पण तो आदर्श मानवी नव्हता—तो अवास्तव होता.
सुरुवातीला ही संकल्पना योग्य वाटते. पण हळूहळू ती भावनिक आणि मानसिक सापळा बनते.
स्त्रीला शिकवलं जातं की चांगली बाई तक्रार करत नाही, ती चुपचाप सहन करते.
ती स्वतःच्या वेदना दाबते, नकार द्यायला घाबरते आणि मनाविरुद्ध गोष्टींनाही होकार देते.
स्वतःसाठी काही केलं की अपराधीपणाची भावना निर्माण होते.
हळूहळू ती स्वतःला विसरते.
ती फक्त आई, पत्नी, सून या भूमिकांमध्ये अडकते आणि “ती स्वतः” कुठेतरी हरवते.
एका स्त्रीचा विचार करा—ती सगळ्यांसाठी जगते, घर सांभाळते, सगळ्यांची काळजी घेते, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवते.
सगळे तिचं कौतुक करतात—“किती चांगली आहेस तू!”
पण रात्री, एकटी असताना तिच्या मनात एक प्रश्न येतो—“मी खरोखर चांगली आहे की फक्त सहन करणारी?”
हा प्रश्न अनेक स्त्रियांच्या मनात असतो, फक्त तो मोठ्याने कोणी बोलत नाही.
समाजाची भूमिका इथेही दुटप्पीच असते.
त्याग करणारी स्त्री “देवी” मानली जाते, तर स्वतःसाठी उभी राहणारी स्त्री “स्वार्थी” ठरते.
या विरोधाभासात स्त्री गोंधळून जाते आणि स्वतःचा आवाज दाबून ठेवते.
पण आता ही व्याख्या बदलण्याची गरज आहे.
स्त्रीने स्वतःच्या भावना ओळखल्या पाहिजेत. स्वतःसाठी जगणं चुकीचं नाही—ते आवश्यक आहे.
“नाही” म्हणणं हा उद्धटपणा नसून स्वतःचा आदर आहे.
स्वतःशी प्रामाणिक राहणं, आपण काय अनुभवतो ते मान्य करणं आणि व्यक्त करणं—हेही तितकंच महत्त्वाचं आहे.
आज “चांगली स्त्री”ची व्याख्या अशी असायला हवी—
ती जी स्वतःचा आदर करते, स्वतःचे निर्णय घेते, गरज पडल्यास नकार देते, स्वतःच्या भावना लपवत नाही आणि इतरांसाठी जगताना स्वतःला विसरत नाही.
“चांगली स्त्री” ही संकल्पना बाहेरून आकर्षक वाटते, पण ती अनेकदा स्त्रीला एका चौकटीत अडकवते.
आता वेळ आली आहे ती चौकट मोडण्याची.
चांगली असणं म्हणजे स्वतःला गमावणं नाही, तर स्वतःला स्वीकारणं आहे.
शेवटी प्रश्न असा उरतो—आपण समाजाने ठरवलेल्या चौकटीत बसतो आहोत की स्वतःची ओळख जपत जगतो आहोत?
कदाचित उत्तर असं आहे—दोन्ही गोष्टी शक्य आहेत, जर आपण स्वतःला विसरलो नाही तर.
– छाया
हेही वाचा -
मर्यादित राहणं म्हणजे चांगलं . कारण स्त्रियांना एका मर्यादा मध्ये राहणं म्हणजे चांगलं मानलं गेलं. तिने मर्यादा तोडली तर तिच्या राहणीमान बदलत जातो. आणि मग ती चर्चेचा विषय बनते.
उत्तर द्याहटवाधन्यवाद ☺️
हटवा