प्रत्येक क्षणी ‘पुरे झालं’ वाटत असतानाही स्त्री नातं का टिकवते?

 प्रत्येक क्षणी ‘पुरे झालं’ वाटत असतानाही स्त्री नातं का टिकवते?


     दोन-तीन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात काही स्त्रिया शेजारी बसून गप्पा मारत होत्या. बोलण्यात ओळखीची सहजता होती, पण त्या मैत्रिणी नव्हत्या, हे पुढे स्पष्ट झालं.

“काय गं, ही साडी कुठून घेतली?”


“आवडली ना?”


“नाही म्हणजे… वेगळी वाटते.”


गप्पा नेहमीसारख्याच सुरू होत्या साड्या, दागिने, मालिकांतील पात्रं.


पण हळूहळू त्या बोलण्यातून एक वेगळंच वास्तव बाहेर येऊ लागलं.


“आमच्या घरात माझ्या खर्चासाठी पैशाचा 'प' उच्चारता येत नाही…”


“वीस वर्ष झाली माहेरी जायला दिलं नाही…”


क्षणभर शांतता पसरली.


त्यांच्याच बाजूला बसलेली एक स्त्री हळूच उठली आणि म्हणाली..


“मला वाटतं… आता हे सगळं पुरे झालं.”


ती निघून गेली.


तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत एकीने उपहासाने म्हटलं -


“म्हणते नवरा खूप त्रास देतो… मग इतकी वर्षे राहिली कशी?”



 याच प्रश्नाच्या मागे आपल्या समाजातील एक वास्तव दडलेलं आहे. 


प्रत्येक क्षणी ‘पुरे झालं’ वाटत असतानाही स्त्री इतकी वर्षे नातं का टिकवते?


यामागे अनेक कारणं असतात -


       या सगळ्या जणी वेगवेगळ्या स्वरूपातील शोषणाच्या बळी होत्या तरीही दुसऱ्या बाईच्या होत असलेल्या शोषणावर त्यांचा विश्वास बसत नव्हता.हेच तर भारतीय महिलांच्या जगण्याचं वास्तव आहे. 


तिचं जगणं, तिचं दुःख, तिचं शोषण सगळं महिलाच संशयीत ठरवतात. 


         बऱ्याच स्त्रिया अशा नात्यात असतात की,


  प्रत्येक क्षणी “पुरे झालं” वाटत असतं. यापेक्षा जास्त सहन नाही करू शकत. असं म्हणत आयुष्य काढतात. 


मग प्रश्न पडतो की स्त्री एवढं सहन करीत इतकी वर्षे नातं का टिकवते? 


  यामागे अनेक सामाजिक-मानसिक 


कारणं असतात, पहिलं कारण लोक काय म्हणतील हे दडपण असतं. दुसरं कारण एका पुरूषाच्या आधाराशिवाय कसं जगायचं एकटी बाई बघून समाज उन्मत्तः श्वानःरूप धारण करतो. तिचं नाना प्रकारे 


उत्पीडन करतो. एकट्या बाईला समाज नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. 


या सगळ्याच्या पुढे जाऊन तीने स्वतःच छळातून स्वतःची सुटका करून घेण्याचा निर्णय घेतला तर 



   “इतकी वर्षे अपमान सहन करत राहिली कशी?”


हा प्रश्न उभा करून संशयाची सुई तिच्याकडे फिरविली जाते.


जरी हा प्रश्न वरकरणी साधा आणि तर्कशुद्ध वाटतो; परंतु प्रत्यक्षात तो स्त्रीच्या आयुष्याची गुंतागुंत समजून घेण्याऐवजी तिच्यावरच संशय टाकणारा असतो. 


स्त्री-पुरुष नात्यांविषयी समाजात अनेक सरधोपट समजुती प्रचलित आहेत. काहीही झालं तरी चूक तीचीच हे गृहीत धरलं जातं. 


     एखादी स्त्री अनेक वर्ष एखाद्या नात्यात राहते, म्हणजे ती कमकुवत आहे, तिच्यात निर्णयक्षमता नाही, किंवा ती परिस्थिती बदलण्यास असमर्थ आहे असं नाही तर समाज रचनेने तिच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण करून ठेवले आहेत.


 वास्तव कधीच इतके सरळ आणि एकरेषीय नसते.


सहन करीत नातं टिकवून ठेवण्यामागे,नात्यातील भावनिक, सामाजिक, आर्थिक,मानसिक स्तरांवरील घडणाऱ्या असंख्य गोष्टींचा गुंता असतो. जगलेल्या प्रत्येक क्षणामागे दिवसामागे,वर्षामागे एक न दिसणारी लढाई असते ,जी बाहेरून शांत दिसते, पण आतून तीव्र असते.


खरा प्रश्न “ती आतापर्यंत तिथंच का राहिली?” हा नाही तर,


“ती अशा परिस्थितीत अडकलीच का?” हा असायला हवा.



   १. नात्याची सुरुवात आणि अपमानाची पहिली छटा:


   कोणतेही नाते अचानक विषारी होत नाही. त्याची सुरुवात अत्यंत सूक्ष्म पातळीवर होते. सुरुवातीच्या टप्प्यावर नात्यातील असमतोल स्पष्टपणे दिसत नाही. एखादे कठोर वाक्य, एखादी दुर्लक्ष करणारी कृती, किंवा एखाद्या प्रसंगी स्त्रीच्या मताला न दिलेले महत्त्व या गोष्टी सुरुवातीला किरकोळ वाटतात.


स्त्री या अनुभवांना धोक्याची घंटा म्हणून स्वीकारत नाही.अशा गोष्टींना कधी अधिकार,तर कधी त्याचं वर्चस्व,तर कधी प्रेम तर कधी भाग मानते.


“आज त्याचा मूड खराब असेल”,


“मीच कदाचित चुकीच्या वेळी बोलले”,


अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण ती स्वतःलाच देते.


 समजूतदारपणा म्हणून दिसणारी ही प्रक्रिया प्रत्यक्षात एक मानसिक समायोजन असते. या टप्प्यावर अपमानाला नाव दिलं जात नाही, किंवा ते तसं स्पष्ट होत नाही. 


तर त्याला स्वभाव ,चुकीची वेळ, चुकीची परिस्थिती असं समजलं जातं. आणि इथूनच सहनशीलतेची प्रक्रिया सुरू होते.जी आयुष्यभर सुरूच राहते. 



२. आत्मसंशयाची निर्मिती आणि अंतर्गत दोषारोप



  नात्यातील अपमानाचा सर्वात गंभीर परिणाम म्हणजे आत्मसंशय. स्त्री स्वतःलाच प्रश्न विचारू लागते 


“मीच काही चुकीचं केलं का?”,


“मी जास्त अपेक्षा ठेवतेय का?”


“नक्कीच माझी काही तरी चूक असेल , त्याशिवाय का ते बोलले “ 


असे अनेक संशय ती स्वतःवर थोपत राहते.


समाजाने स्त्रीच्या मनात लहानपणापासून एक विचार पेरलेला असतो, चूक ही नेहमीच बाईची असते. 


या संस्कारामुळे ती समोरच्या व्यक्तीच्या दोषांचा विचार न करता स्वतःच्या नसलेल्या चूका शोधत बसते.


 हा आत्मसंशय हळूहळू आत्मविश्वास कमी करतो. ती स्वतःच्या भावनांवर शंका घेऊ लागते. परिणामी, अपमान ओळखण्याची तिची क्षमता कमी होत जाते. हा एक महत्त्वाचा मानसिक टप्पा असतो, जिथे बाह्य हिंसा अंतर्गत स्वीकारामध्ये रूपांतरित होऊ लागते.



३. आशावाद : नातं टिकवणारी पण शोषणाच्या चक्रात अडकवणारी गोष्ट 


     अशा नात्यातील अपमान सातत्याने घडत असला तरी, तो सतत एकसारखा राहत नाही. अपमानानंतर ‘रडक्याचे डोळे पुसल्यासारखं’


काही झालंच नाही असं सौम्य वर्तन, चूकून एखाद्या वेळी माफी मागणं, किरकोळ बाबतीत काळजी दाखवणं . 


या विरोधाभासी अनुभवामुळे स्त्रीच्या मनात आशा निर्माण होते.


ती स्वतःला सांगते ,


“तो पूर्णपणे वाईट नाही; फक्त परिस्थितीमुळे असे घडते.”


  मधूनमधून मिळणारी सकारात्मक वागणूक व्यक्तीला त्या नात्यात अधिक गुंतवून ठेवते.


यामुळे नात्यातील चांगल्या क्षणांचे महत्त्व वाढते आणि वाईट अनुभवांचे गांभीर्य कमी भासते. हे असंच सुरू राहतं. 



४. सामाजिक संरचना आणि स्त्रीची भूमिका



       विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा संबंध नसून एक सामाजिक संस्था आहे. त्याच्याभोवती कुटुंब, नातेवाईक आणि समाज यांचे जाळे निर्माण होते. या संरचनेत स्त्रीची भूमिका बहुपदरी असते. ती पत्नी असते, सून असते, आणि नंतर आईही बनते. सणाजाचा घटकही असते. हे तेव्हा जास्त ठळक होतं की, जेव्हा स्त्री स्वतःच्या अधिकाराविषयी बोलते, तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, तेव्हा समाज रानटी कुत्र्यासारखा तिच्यावर तुटून पडतो. 


अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे,


मातृत्व आल्यानंतर तिचे प्राधान्यक्रम बदलतात.


“मुलांचे काय होईल?” हा प्रश्न अजून एक भर घालतो.


मुलांना घर हवं, परिवार हवा, त्यांचं शिक्षण, पुढील काळातील सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी तिला त्रासदायक नात्यात अडकून राहण्यास भाग पाडतात. 


कारण ती जर नवऱ्यासोबत असेल तरच समाज या गोष्टी देऊ करतो. 


स्त्रीकडून त्याग, सहनशीलता आणि समजूतदारपणा अपेक्षित असतो. त्यामुळे नातं टिकवणं हे तिच्या “चांगल्या स्त्रीत्वाचे” लक्षण मानले जाते.तिला हेही एक प्रलोभन दाखवले जाते. 



५. आर्थिक वास्तव आणि स्वातंत्र्याचा अभाव



   अनेक स्त्रिया आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसतात. त्यामुळे नातं सोडण्याचा निर्णय हा केवळ भावनिक नसून व्यवहारिक प्रश्न बनतो.


स्वतःचा आणि मुलांचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा एक महत्त्वाचा प्रश्न तिच्यासमोर उभा राहतो.


आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव स्त्रीच्या निवडींना मर्यादा घालतो. त्यामुळे ती अनेकदा त्रासदायक नात्यात राहण्याचा निर्णय घेते. कारण तेच तिला आर्थिक सुरक्षितता देत आहे असं वाटतं.खरं तर तिथं तिच्या श्रमाचं पुर्ण मोलही मिळत नाही.मात्र तिच्यावर उपकार केले जात आहेत असं दाखवलं जातं. ती त्याच्या कष्टावर जगते आहे असं दररोज सांगितलं जातं. खरं तर ती जे कष्ट ती घरासाठी करते ते बाहेर केले तर तिच्या श्रमाची किंमत कळून येईल मात्र तसं शक्य होत नाही. किंवा मार्ग बंद असतो. त्यामुळे ती स्वतःला निरूपयोगी समजते. किंवा तिच्या मनात तसं रुजवलं जातं. 



६. सवय आणि मानसिक अनुकूलन 


   मानवी मन परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवते. मानवाकडं कोणत्याही परिस्थितीत अनुकूलन साधण्याची क्षमता आहे.


सतत घडणाऱ्या गोष्टी हळूहळू “सामान्य” वाटू लागतात. सुरुवातीला असह्य वाटणारे वर्तन नंतर सहन करण्यासारखे वाटते.


ही प्रक्रिया स्वीकार नसून एक प्रकारची मानसिक अनुकूलता असते.


स्त्री स्वतःच्या अपेक्षा कमी करते, प्रतिक्रिया देणे कमी करते, आणि भावनिक अंतर ठेवण्याचा प्रयत्न करते.


आहे तसं जगत राहते. बदल घडू शकतो. याहून वेगळं जीवन असू शकतं याचा ती विचारच करत नाही.



७. भावनिक अलिप्तता : अंतर्गत तुटणं



     दीर्घकाळ त्रासदायक नात्यात, अपमानित वातावरणात राहिल्यावर स्त्री भावनिकदृष्ट्या अलिप्त होऊ लागते. ती नात्याशी व्यवहारिक पातळीवर जोडलेली राहते, पण भावनिक गुंतवणूक कमी होते. कारण समोरची व्यक्ती तिच्याशी व्यवहारीकपणे वागते. 


या अवस्थेत राग किंवा प्रतिकार दिसत नाही, त्याऐवजी शांत उदासीनता दिसते.


ही अवस्था नात्याच्या अंतर्गत विघटनाची सूचक असते.


हे सहसा लक्षात येत नाही. 



८. निर्णायक क्षण : शांत पण निर्णायक बदल



समाजात अनेकदा नातं तुटण्याचे क्षण नाट्यमय रित्या घडतात, किंवा समोर येतात. 


अनेकदा ते कारण खूप छोटे असते. 


तो क्षण अत्यंत शांत असतो. एखादी छोटी घटना, एखादं वाक्य किंवा दुर्लक्ष , आणि अचानक स्त्रीच्या मनात स्पष्टता निर्माण होते.


“आता पुरे.”


हा निर्णय भावनिक आवेशातून घेतला जात नाही, तर दीर्घकालीन अनुभवांच्या आधारे घटित होतो.


 एवढ्या लहान गोष्टीवरून एवढा मोठा निर्णय कसा घेतला? असा प्रश्न निर्माण केला जातो. मात्र त्या घटनेची घडवणूक अनेक वर्ष अदृश्यपणे सुरू असते ‌.


फक्त ती घडल्यानंतर समोर येते. आणि त्याचाही दोष बाईच्या माथी मारला जातो. 



९. नात्यातून बाहेर पडणं : स्वसंरक्षणाची प्रक्रिया



    जेव्हा स्त्री नात्यातून खूप दिर्घ काळ जपलेल्या नात्यातून बाहेर पडते, तेव्हा ती सूड घेण्यासाठी निर्णय घेत नाही.


तो निर्णय स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासाठी असतो. अशा वेळी ती सगळे प्रयत्न करून थकलेली असते. ती आतून पुर्णपणे रिक्त झालेली असते.


तेव्हा ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न सोडते.


आणि स्वतःला वाचवण्याचा निर्णय घेते. हा निर्णय तिच्या आत्मसन्मानाच्या पुनर्स्थापनेचा प्रारंभ असतो.



१०. समाजाचा दृष्टीकोन आणि प्रश्नांची दिशा :


समाज स्त्रीला विचारतो ,


“ एवढा त्रास होता तर मग इतकी वर्षे का सहन केलं?”


हा प्रश्न वास्तवाला नाकारतो. दिशाभूल करतो.


खरा प्रश्न असा असायला हवा 


“अशी परिस्थिती निर्माण होण्यामागील सामाजिक आणि मानसिक कारणे कोणती आहेत?”


त्यावर उपाय शोधणं आवश्यक आहे. 



११. पितृसत्ताक रचना आणि असमानता



    या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी पितृसत्ताक सामाजिक रचना आहे. या रचनेत पुरुषाला अधिकार आणि स्त्रीला सहनशीलता दिली जाते. संवाद, भावनिक शिक्षण आणि परस्पर सन्मान यांचा अभाव नात्यांमध्ये असमतोल निर्माण करतो. दोघात कायमचा संघर्ष ठेवतो.



१२. सहनशीलतेचा पुनर्विचार


  स्त्रीची सहनशीलता तिची ताकद मानली जाते; परंतु तीच सहनशीलता तिच्या शोषणाचे साधन बनते. समाज तिच्या सहनशीलतेचा उपयोग नातं टिकवण्यासाठी करून घेतो, पण नात्याच्या स्वरूपात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत नाही. शोषणासाठी करतो मात्र निकोप जीवनासाठी पाऊल टाकत नाही. 



१३. स्त्रीची ताकद आणि अस्तित्व


दीर्घकाळ नात्यात राहणारी स्त्री नेहमीच अबला किंवा कमकुवत नसते. ती अनेक स्तरांवर संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असते. तिच्या सहनशीलतेमध्ये तिची ताकदही असते, आणि तिच्या परिस्थितीची मर्यादाही.



   एक दिवस असा येतो की, स्त्री स्वतःलाच विचारते 


“मी इतकी वर्षे इतरांसाठी जगले… आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आली आहे का?”


हा प्रश्न तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरतो.


आणि तिथून तिच्या नव्या प्रवासाची सुरुवात होते.


जो आत्मसन्मान, स्व-ओळख आणि स्वातंत्र्य यांच्यावर आधारलेला असतो.


— छाया बेले


हेही वाचा -

स्त्रीमुक्ती कायद्याच्या पलिकडील सामाजिक वास्तव

तीच चुकीची आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .