स्त्री-मुक्ती : कायद्यापलीकडील सामाजिक वास्तव

 


स्त्री-मुक्ती : कायद्यापलीकडील सामाजिक वास्तव
   आठ मार्च रोजी आपण महिला मुक्ती दिवस म्हणून साजरा केला. वर्षानुवर्षे करीत आहोत. स्त्री मुक्त झाली आहे असं दाखवलं जातं. 
पण खरोखरच वास्तव आहे की वास्तव अजून वेगळं आहे, याची चिकित्सा केली जात नाही, किंवा जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले जाते. 
     मानवी संस्कृतीच्या दीर्घ इतिहासात स्त्रीचे स्थान नेहमीच एका विचित्र विरोधाभासात अडकलेले दिसते. एका बाजूला स्त्रीला “माता”, “देवी”, “ जननी” अशा  उपाधी देऊन गौरविकरण केलं गेलं. 
तिच्या त्यागाचे, सहनशीलतेचे आणि ममतेचे स्तोम माजवले गेले. याचाच वापर करून तिच्या आयुष्याभोवती अनेक अदृश्य भिंती उभ्या केल्या गेल्या. समाजाने तिच्या भूमिकांचे गौरवगीत गात असतानाच तिच्या माणुसपणाला चौकटीत कैद केले.
त्यामुळे स्त्रीच्या आयुष्याचा विचार केला की एक प्रश्न पुन्हा पुन्हा समोर उभा राहतो. 
 स्त्री खरंच मुक्त झाली आहे का, की तिची मुक्ती अजूनही अपूर्ण आहे?
   आधुनिक काळात स्त्रीच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत.
 शिक्षण, रोजगार, राजकारण, विज्ञान, साहित्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांत स्त्रियांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. समाजात स्त्रीचे सार्वजनिक अस्तित्व अधिक दृश्यमान झाले आहे. वरवर पाहता हे चित्र प्रगतीचे आणि आश्वासक वाटते. हे जरी खरं असलं तरी 
आपण या दिसणाऱ्या दाखवल्या जाणाऱ्या 
चित्राच्या पलीकडे जाऊन वास्तवाकडे बारकाईने पाहिले, तर जाणवते की स्त्रीच्या आयुष्याभोवती असलेली अनेक भिंती अजूनही कायम आहेत.

   संविधानाने स्त्रीला समानता देणारे अधिकार बहाल केले. त्यामुळे 
संधी वाढल्या,परंतु समाजाच्या मानसिकतेत  अजूनही बदल झालेला नाही. समाज अजूनही स्त्रीला माणूस म्हणून स्वीकार करायला तयार नाही. तो तिच्याकडे त्याच पारंपारिक शोषक व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पाहतो. त्यामुळे कायद्याने दिलेले अधिकार व सामाजिक दृष्टीकोन,सामाजिक कृती,व्यवहार यात विरोधाभास दिसून येतो. 

स्त्रीची मुक्तीची संकल्पना 

    स्त्रीच्या मुक्तीचा विचार करताना सर्वप्रथम “मुक्ती” या शब्दाचा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. अनेकदा मुक्तीचा अर्थ केवळ आर्थिक स्वावलंबन किंवा घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य, किंवा मनासारखा पोशाख करणं 
असा मर्यादित केला जातो. एवढ्या वरून ठरवलं जातं की स्त्री मुक्त झाली आहे. 
मुक्तीचा खरा अर्थ यापेक्षा अधिक व्यापक आणि गहन आहे.
 थोडक्यात सांगायचं तर  तिच्याकडे तिच्या आयुष्याची मालकी आहे का?
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर दिलं तर लक्षात येईल. 
   स्त्रीला तिच्या आयुष्याशी संबंधित स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असणे. तिच्या विचारांना, स्वप्नांचा, आकांक्षांचा स्विकार करून   सन्मान देणे. 
भीती, दबाव आणि सामाजिक टीकेच्या सावटाशिवाय तीला स्वतःचे जीवन जगता येईल असं असण्याला मुक्ती असं म्हणता येईल. 
 मुक्ती ही केवळ बाह्य परिस्थिती बदलण्याची गोष्ट नाही. ती मानवी सन्मान, स्वाभिमान आणि अस्तित्वाच्या स्वीकार यावर अवलंबून असते. याविषयी समाजाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 

   अदृश्य सामाजिक बंधने
   स्त्री जीवन अनेक अदृश्य साखळदंडानी जखडून ठेवलेले आहे.
या अदृष्य कड्या दृश्य स्वरूपात दिसत नसल्या तरी स्त्रीचं आयुष्य त्याच नियंत्रित करतात. 
 चौकटी दिसत नाहीत,मात्र ती समाजाच्या विचार , मान्यता , रुढी,परंपरा यात मानसिकरित्या कैद केली गेली आहे. आता ती स्वतःच तो तुरुंग डोक्यात वागवते. 
असे अनेक सांस्कृतिक तुरुंगात असतात.
स्त्रीने कसं वागावं, कसं बोलावं, कोणत्या मर्यादेत राहावं, याबद्दल समाजाच्या ठराविक अपेक्षा असतात. या अपेक्षा अनेकदा इतक्या लांबलचक असतात की त्या त्यांनी तिच्या सगळ्या जगण्याला वेढून उरतात. 
आपल्या हिताचा किंवा आपल्या अधिकाराचा निर्णय घेताना “लोक काय म्हणतील” हा दबाव एवढा असतो की, तो ओलांडून पुढे जाता येत नाही. परिणामी तिचे स्वातंत्र्य न्याय, जगण्याचे अधिकार 
कागदावर उतरतात. ज्याला अलिकडे 
'सगळे कायदे बायकांच्या बाजूने आहेत' 
अशी टीका केली जाते. 
कायदे असले तरी प्रत्यक्ष वास्तव वेगळं असतं.

संस्कार आणि कुटुंबाची भूमिका
कुटुंब व कौटुंबिक संस्कारांची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. समाजातील लैंगिक भेदभावाची बीजे कुटुंबातूनच बालपणापासून पेरली जातात.
मुलगा आणि मुलगी वाढवताना ती  अतीसोशिक कशी बनेल याची तयारी करून घेतली जाते. तर मुलाच्या जास्त मुक्त असण्याला, त्याच्या चोखंदळपणाला प्रोत्साहन दिले जाते.  मुलाला स्वातंत्र्य, धाडस आणि नेतृत्व शिकवले जाते, तर मुलीला संयम, सहनशीलता,त्याग, समर्पण यांचे धडे दिले जातात. याची सुरूवात आपल्या हिश्याचा खाऊ भावाला देण्यापासून होते. 
या प्रक्रियेत नकळत मुलींच्या मनात स्वतःबद्दल मर्यादित अपेक्षा निर्माण होतात. ती स्वतःच्या इच्छा आणि स्वप्नांना दुय्यम स्थान देण्याची सवय लावून घेते. 
हळूहळू हे संस्कार इतके खोलवर रुजतात की अनेक स्त्रिया आपलं दुय्यम स्थान नैसर्गिक मानू लागतात. असंच जगत राहतात. 

आर्थिक स्वावलंबन आणि त्याच्या मर्यादा
    गेल्या काही दशकांत स्त्रियांचे शिक्षण व आर्थिक स्वावलंबनामुळे परिस्थितीत बराच बदल झाला आहे.
शिक्षण स्त्रीला विचार करण्याची आणि प्रश्न विचारण्याची क्षमता देते. आर्थिक स्वावलंबन तिच्या आत्मविश्वासाला बळकटी देते.
जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा कुटुंबात आणि समाजात तिच्या मताला अधिक महत्त्व मिळू लागते. किंवा असं व्हायला हवं. मात्र बहुतेक वेळा असं न होता तिच्याकडे शेकडो वर्ष आपल्या मेंदूत असलेल्या स्त्री प्रतिमेनुसार व्यवहार केला जातो. 
तथापि, फक्त आर्थिक स्वावलंबन म्हणजे संपूर्ण मुक्ती असेही म्हणता येणार नाही. कारण आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही अनेक स्त्रियांना सामाजिक दबाव,पूर्वग्रह या गोष्टींचा सामना करावा लागतो.

व्यक्ती स्वातंत्र्यासाठी आवश्यक आंतरिक स्वातंत्र्य 
   स्त्री मुक्तीचा सर्वात महत्त्वाचा व दुर्लक्षित राहणारा पैलू म्हणजे तिचे व्यक्ती स्वातंत्र्य.
समाजाने घातलेल्या मर्यादा अनेकदा इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की स्त्री स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ लागते. ती स्वतःच्या इच्छांना दाबून ठेवते , आपले आयुष्य इतरांच्या अपेक्षांनुसार  घडवण्याचा प्रयत्न करते.
म्हणूनच मुक्तीचा प्रवास बाह्य बदलांइतकाच आंतरिक स्वातंत्र्य हे बाहेरच्या परिवर्तनाशी संबंधित आहे. स्त्रीने स्वतःच्या मूल्याची जाणीव ठेवणे, स्वतःच्या विचारावर विश्वास ठेवणे आणि स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. तीचं स्वतःला माणूस म्हणून स्वीकार करणं हा परिवर्तनाचा पाया आहे.

मुक्तीचा सामाजिक संदर्भ
   स्त्रीची मुक्ती ही केवळ स्त्रियांची जबाबदारी नाही. ती संपूर्ण समाजाची बांधिलकी आहे .
समाजात जोपर्यंत स्त्री-पुरुषांबाबत वेगवेगळे नियम अस्तित्वात असतील, जर स्त्रीच्या स्वातंत्र्याकडे संशयाने पाहिले जात असेल, तोपर्यंत 
'मानव मुक्तीचा' प्रवास अपूर्णच राहील.
स्त्री मुक्तीचा प्रश्न हा प्रत्यक्षात मानव मुक्तीचा, समानतेचा प्रश्न आहे. समानतेची जाणीव आणि परस्पर सन्मान यांशिवाय कोणताही समाज खऱ्या अर्थाने प्रगत होऊ शकत नाही. हे सत्य आहे.

   स्त्रीची खरी मुक्ती तेव्हाच शक्य होईल, जेव्हा तिला सर्वप्रथम माणूस म्हणून पाहिले जाईल. तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जाईल. तिच्या स्वप्नांना आणि निर्णयांना समाजाने मर्यादा घालण्याऐवजी त्यांना सन्मान दिला जाईल.
स्त्रीचे आयुष्य समाजाने आखलेल्या चौकटींनी नव्हे, तर तिच्या स्वतःच्या निवडींनी घडेल.
स्त्रीची मुक्ती हा एखाद्या एका दिवसात घडून येणारी घटना नाही, तर तो दीर्घ सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक परिवर्तनाचा प्रवास आहे.तो समाजातील प्रत्येक घटकाला जाणीवपूर्वक करावा लागणार आहे 
  माय सावित्री, क्रांतीबा, डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामनवांनी केलेल्या 
संघर्षामुळे, शिक्षणचा स्वविकासाचा मार्ग 
 सोपा झाला, स्त्रीयांमधे जागरूकता निर्माण झाली. बदलत्या मूल्यांमुळे या प्रवासात अनेक पावले पुढे पडली आहेत. तरीही अजून खूप अंतर पार करणे बाकी आहे.
आणि कदाचित म्हणूनच आजही अनेक प्रश्न आपल्या समाजासमोर उभे आहेत त्यातील मुख्य प्रश्न -
आपण खरोखर स्त्रीला सन्मानाने जगण्यासाठी सुरक्षित भवताल  तयार केला आहे का ? किंवा करत आहोत का?

@छाया

टिप: “या विषयावर आपले मत काय आहे? सुज्ञ वाचकांची आपली मते नोंदवावी.

हेही वाचा:

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .