“तीच चुकीची आहे” : स्त्रीला दोष देणाऱ्या समाजाच्या मानसिकतेची चिकित्सा
कोणत्याही नात्यात संघर्ष निर्माण झाला, एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात वादळ आलं, किंवा तिचं वैवाहिक जीवन तुटलं , समाजाची पहिली प्रतिक्रिया नेहमी एकच असते -
“तिच्याचकडून काहीतरी चूक झाली असणार.”
हे वाक्य आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलो आहोत. जेव्हा हे दुसऱ्या कुणाबद्दल बोलले जाते, तेव्हा आपण नकळत बहुमताच्या बाजूने,म्हणजेच समाजाच्या बाजूने उभे राहतो.
या मानसिकतेच्या आगीत आपण स्वतः होरपळत नाही, तोपर्यंत ‘त्या’ एकटं पडलेल्या स्त्रीवर दोषारोप करून आपण मोकळे होतो.
याच मानसिकतेकडे संवेदनशीलतेने पाहण्याचा हा प्रयत्न.
संघर्षाच्या वेळी समाजाचा ठरलेला न्याय
एखाद्या स्त्रीच्या सहजीवनात संघर्ष निर्माण होतो, तिच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित घटना घडते किंवा ती एखाद्या कारणाने समाजासमोर येते , (घटना अचानक घडत नाहीत; त्या खूप आधीपासून सुरू झालेल्या प्रक्रियेचा परिणाम असतात.) अशा वेळी खरं-खोटं जाणून घेण्याची तसदी न घेता समाज अनेकदा आधीच न्यायनिवाडा करून टाकतो.
“तिच्याचकडूनच काहीतरी चूक झाली असणार.”
“तिनंच काहीतरी बोललं असेल. किंवा काही चुकिचं केलं असेल”
“बाईच्या जातीनं सहन केलं तरच घर टिकतं.”
“बाईनं जरा समजूतदारपणे वागायला पाहिजे.”
अशी अनेक वाक्ये आपल्या समाजात इतकी सहज बोलली जातात की त्यामागचा अन्याय अनेकदा लक्षातही येत नाही.
“त्रासानं माणूस मरत थोडंच?” हेही अगदी सहजपणे बोललं जातं.
स्त्रीच्या बाबतीत समाजात दिसणारी ही असंवेदनशीलता केवळ व्यक्तींची प्रतिक्रिया नसते; ती समाजमनात दीर्घकाळ रुजलेल्या मानसिकतेचा भाग असते.
स्त्रीला सहनशीलता, त्याग आणि समर्पण यांच्या चौकटीत ठेवणारी विचारसरणी पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे. परिणामी, जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा परिस्थितीचा सखोल विचार करण्याऐवजी चुकीचं खापर स्त्रीच्या डोक्यावर फोडणं समाजाला अधिक सोपं वाटतं.
ही मानसिकता तयार कशी झाली?
या विचारसरणीची मुळे समाजाच्या पारंपरिक रचनेत दडलेली आहेत. दीर्घकाळ पितृसत्ताक व्यवस्थेमुळे कुटुंबातील सत्ता, निर्णयाचा अधिकार आणि सामाजिक प्रतिष्ठा प्रामुख्याने पुरुषांच्या हातात राहिली.म्हणून नातेसंबंधांमध्ये प्रश्न निर्माण झाले की, सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्याऐवजी कमकुवत मानल्या गेलेल्या बाजूवर म्हणजे स्त्रीवर दोष टाकणे समाजाला अधिक सोयीचे ठरते.
परंपरा आणि संस्कार यांच्या नावाखालीही अनेक धारणा पिढ्यान्पिढ्या पुढे चालत राहिल्या.
स्त्रीने नम्र राहावे, घरातील वाद बाहेर जाऊ देऊ नयेत, कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्वतःचे दुःख गिळून घ्यावे, अशा अपेक्षांमुळे तिच्यावर होणाऱ्या अन्यायाला दुय्यम स्थान दिले गेले.
ही मानसिकता पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यात कुटुंब आणि समाजाची मोठी भूमिका असते.
मुलींना लहानपणापासून समजूतदार राहण्याची आणि सहन करण्याची शिकवण दिली जाते; तर मुलांना अधिक स्वातंत्र्य आणि अधिकार दिले जातात.
अशा असमान जडणघडणीतून स्त्रीच्या दमनाची परंपरा पिढ्यान्पिढ्या अधिक घट्ट होत जाते.
या विचारसरणीचे परिणाम
“तीच चुकीची आहे” ही मानसिकता केवळ एका वाक्यापुरती मर्यादित राहत नाही.
तिचे परिणाम स्त्रीच्या आत्मसन्मानावर आणि मानसिक आरोग्यावर खोलवर होतात. सतत दोष दिला गेल्यामुळे अनेक स्त्रिया स्वतःकडेही संशयाने पाहू लागतात.
“कदाचित माझीच चूक असेल” अशी अपराधी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. कालांतराने याचा परिणाम त्यांच्या आत्मविश्वासावर होतो आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे धाडस कमी होते.
समाजाकडून आणि कुटुंबाकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यांमध्येही अनेकदा एकच सूर असतो की,
“ सहन कर.”
“घरासाठी समजून घे.”
अप्रत्यक्षपणे असा संदेश दिला जातो की,
“तू बाई आहेस, तुझं जगणं इतरांसाठी आहे.”
यामुळे अन्याय सहन करणे हेच योग्य असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते.
जेव्हा एखाद्या स्त्रीचं वैवाहिक जीवन संपुष्टात येतं, तेव्हा तिच्यावर होणारे सततचे दोषारोप तिचा मानसिक ताण वाढवतात. तिच्या मानसिक आरोग्याची फिकीर कुणालाही वाटत नाही.
नातं टिकवण्यासाठी तिनं केलेले प्रयत्न, चार भिंतीत सहन केलेल्या वेदना,याबद्दल समाजाला काहीच माहिती नसते. तरीसुद्धा जिवंतपणी चौकट ओलांडून बाहेर पडणाऱ्या स्त्रीवर हल्ला करण्यासाठी पुरुषप्रधान समाज वेगवेगळ्या स्वरूपातील शस्त्र घेऊन तयार असतो.
या मानसिकतेचे पुरूषांवरील परिणाम
खरं तर ही मानसिकता पुरुषांनाही पूर्णपणे मुक्त ठेवत नाही.
शोषण टिकवून ठेवण्यासाठी एका व्यक्तीला शोषकाच्या भूमिकेत बंदिस्त व्हावं लागतं. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघांनाही पूर्ण, संतुलित मानवी जीवन जगता येत नाही.
पुरुषांसाठीही ठरावीक भूमिका ठरवून दिल्या गेल्या आहेत.
नेहमी मजबूत राहणे, भावना न दाखवणे, नियंत्रण ठेवणे.
या अपेक्षांमुळे नातेसंबंधांमध्ये संवाद आणि संवेदनशीलतेपेक्षा अधिकार आणि वर्चस्वाला महत्त्व मिळते.
दोष स्त्रीवरच का?
या प्रवृत्तीमागे समाजात खोलवर रुजलेल्या काही सवयी आणि मान्यता कार्यरत असतात.
सोपं कारण शोधण्याची प्रवृत्ती. सर्व बाजू समजून घेण्यापेक्षा एका व्यक्तीला दोष देणे सोपे वाटते.
शक्ती आणि अधिकारातील असमानता , ज्यांच्याकडे सामाजिक पाठबळ जास्त असते, त्यांच्यावर प्रश्न कमी उपस्थित होतात.
घर टिकवण्याची जबाबदारी स्त्रीचीच आहे हा खोलवर रुजलेला समज.
बदलाची सुरुवात कुठून?
ही मानसिकता बदलायची असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांनीही त्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे.
नातेसंबंध हे अधिकारावर नव्हे, तर परस्पर समज आणि आदरावर टिकतात. संवाद, संवेदनशीलता आणि परस्पर सन्मान ही कोणत्याही निरोगी नात्याची मूलभूत तत्त्वे आहेत.
दीर्घकालीन बदलासाठी पुढील पिढ्यांमध्ये समानतेची मूल्ये रुजवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुलींना केवळ सहनशीलतेची शिकवण देण्याऐवजी आत्मसन्मान आणि स्वाभिमानाची जाणीव करून देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुलांनाही संवेदनशीलता आणि महिलांचा सन्मान करण्याची शिकवण दिली गेली पाहिजे.
समाजासाठी काही प्रश्न
समाज म्हणून आपण स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारण्याची गरज आहे:
एखाद्या संघर्षाची बातमी ऐकली की आपण नकळत स्त्रीलाच दोष देतो का?
आपण तिचं म्हणणं ऐकून घेतो का, की आधीच निर्णय देतो?
परंपरा आणि संस्कार यांच्या नावाखाली आपण अन्यायाकडे दुर्लक्ष तर करत नाही ना?
या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरेच समाजाच्या मानसिकतेत बदल घडवू शकतात.
“तीच चुकीची आहे” ही मानसिकता बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने न्याय्य समाज निर्माण होऊ शकत नाही. कारण हा विचार केवळ एका स्त्रीला दोषच देत नाही तर तो न्याय व मानवी संवेदनशीलतेलाच हद्दपार करतो.
समाजाची खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःच्या पूर्वग्रहांकडे धैर्याने पाहतो आणि त्यांना बदलण्याची तयारी दाखवतो.
शेवटचा विचार
स्त्रीला दोष देणे हा न्याय नाही; तो समाजाचे वैचारिक अपंगत्व दर्शवतो. तो दंभाला पोषण देतो आणि शोषणाला खतपाणी घालतो.
हे झालं समाजाच्या जबाबदारीविषयी.
परंतु स्त्रीचीही स्वतःप्रती एक जबाबदारी आहे. तिने समाजाचे भक्ष्य बनण्यास नकार द्यायला हवा.
इथं संत तुकोबांची शिकवण उपयोगी ठरते,
“मीच मज व्यालो
पोटा आपुलिया आलो”
या ओळींतून एक मोठा संदेश मिळतो.
आपल्या जीवनाला आपण स्वतः आकार देऊ शकतो. नव्याने जन्म घेऊ शकतो. ते अधिक सुंदर, सुबक आणि समृद्ध करू शकतो.
— छाया
हेही वाचा -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा