व्रण भरून काढतात पुस्तकं | मराठी कविता
पुस्तकं आयुष्याच्या कृष्णविवरात एखादी पणती तेवत असावी तसंच भासतं माझं पुस्तकाचं कपाट जगण्याच्या वर्दळीत दमल्या जीवाला हवा असतो विसावा मग शिरते मी हळूच पुस्तकांच्या कुशीत तेव्हा ते खरचटलेल्या जखमांवरून हळूवारपणे फिरवतात ममताळू हात मरगळलेल्या मनावरची जळमट झटकून करतात लख्ख पुस्तकं पेटवतात विद्रोह पुस्तकंच विझवतात आतला वडवानलही.. कधी देतात कणखर सल्ला बोट पकडून पुस्तकं पोहचवतात हवं तिथे पुस्तकं जगवतात तगवतात रुजतात आत खोलवर विचारातून उगवतात जेव्हा जेव्हा कण्हत कुढत जाते त्यांच्या जवळ तेव्हा न सांगता समजून घेतात मनाचं दुखणं अन् योग्य औषधाची मात्रा देवून व्रण भरून काढतात पुस्तकं @छाया बेले.