🐇 बोल्ट्याच्या करामती 🐇 फाइटर बोल्ट्या !! भाग १४
फायटर बोल्टया बोल्ट्याच्या शौर्याची एक कहाणी मी सांगितलीच आहे. मात्र ती त्याच्यासारख्याच सशाशी जिंकलेल्या लढाईची कहाणी होती. ही कहाणी त्याची मांजराशी केलेल्या लढाईची आहे. तसं तर बोल्ट्या कशालाही घाबरत नव्हता. सुरुवातीला आणला तेव्हा थोडासा भित्रा होता. हळूहळू त्याच्यात आणि आमच्यात जिव्हाळा वाढत गेला, तशी त्याची भीती पळून गेली. तो घरात निश्चिंतपणे वावरायचा. त्यापेक्षा असं म्हणणं अधिक योग्य राहील की, तो घराचा मालक आणि आम्ही त्याचे पाळीव... असंच काहीसं त्याला आणि आम्हालाही वाटायचं. असा काही त्याचा रुबाब होता. आणला तेव्हा मात्र दुसऱ्या खोलीत सोडलं तरी थरथरत फरशीला चिकटून बसायचा. नखाने फरशीला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्यावेळी आम्ही त्याच्या या भित्रेपणाची मजा घ्यायचो. हळूहळू धीट होत गेला, मग सगळ्या घरावर त्याचीच दादागिरी... नाही... नाही... बोल्ट्यागिरी चालायची. *पहिली लढाई - उंदराशी* एकदा काय झालं, बाहेर जोराचा पाऊस सुरू होता. अचानक खिडकीतून एक मोठा उंदीर उडी मारून घरात आला. मला काय करावं कळत नव्हतं. या उंदराला बाहेर कसं...