माझ्या हयातीचा दाखला : मानवतेचा आवाज ठरणारा कविता संग्रह - पुस्तक परिचय | छाया बेले
“माझ्या हयातीचा दाखला” : मानवतेचा आवाज ठरणारा कविता संग्रह
साहित्यिक कोणतंही साहित्य का निर्माण करतो, तर त्याला आतमध्ये ठसठसणारं काहीतरी सांगायचं असतं. तो ते किती प्रभावीपणे जसंच्या तसं शब्दात पकडतो, त्यावरून त्या साहित्यकृतीचा कस आणि दर्जा ठरत असतो. विषय कोणताही असो, तो व्यक्त करणाऱ्याच्या विचारांची स्पष्टता, विचारांच्या कक्षा, त्या विचारांशी असलेली प्रामाणिकता आणि समाजाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन असेल, तरच दर्जेदार साहित्यनिर्मिती होते. तेच साहित्य जीवनोपयोगी, समाजोपयोगी ठरते.
नुकताच विशाल इंगोले यांचा असाच एक कसदार, दर्जेदार कविता संग्रह वाचनात आला - ‘माझ्या हयातीचा दाखला’. या संग्रहाचे बाह्यरूप जेवढे सुंदर आहे, तेवढेच अंतरंगही उच्च दर्जाच्या कवितांनी समृद्ध आहे. पहिल्या कवितेपासूनच वाचक खिळून राहतो.
शतकानुशतके गाडली जाताहेत माणसे
शस्त्रांच्या धारेखाली
शास्त्रांच्या गुलामीत
.......
येणाऱ्या पिढ्यांनी उत्खनन केल्यास
सापडेल का त्यांना शस्त्राविना एखादा थर
हातात हात आणि गळ्यात गळे असलेले सांगाडे
‘आपण एवढे करूया’ या पहिल्याच कवितेतून कवी मानवतावादी विचाराची पेरणी करतो. ही कविता खरोखरच माणसात माणसे मिसळवून टाकणारी, दुसऱ्याच्या शरीराच्या जखमा आपल्या कातडीने झाकणारी आहे.
आपल्या आसपासचा परिसर, सामाजिक पर्यावरण, संस्कृती याचा माणसाच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. आजूबाजूला अशा अनेक घटना घडत असतात ज्याने मनाचा तळ ढवळून निघतो. मात्र प्रत्येकजण ते व्यक्त करू शकत नाही. सामान्य माणूस याकडे रोजचं राहाटगाडगं म्हणून सोडून देतो. कवी मात्र याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून संवेदनशीलतेने पाहतो. अशा कितीतरी घटनांवर डॉ. विशाल इंगोले व्यक्त होतात. ‘निराधार ठसठशीत जखम’, ‘कोर्ट’, ‘HIV सोबत जगताना’ या कविता वाचकाच्या मनाचा ठाव घेतात.
मनोगतात कवी म्हणतो, “कविता जन्माला येणे लहानपणापासूनच सुरू झाले. आजूबाजूची माणसे, वातावरण, समाज, जिवंत प्रश्न, मेलेली उत्तरे, अशाच डोक्याभोवती भनभनणाऱ्या गोष्टींनी अजूनही माझी कविता याच मुर्दाड वर्तमानाचे जिवंत चित्रण करीत मोठी होत आहे. माझ्या व माझ्या कवितेच्या हातात तीच मशाल आहे आणि तिला हाच काळवंडलेला वर्तमान उजेडात आणायचा आहे.” या ओळींमधून कवीच्या काव्यनिर्मितीचा हेतू आणि विचारांतील प्रगल्भता स्पष्ट होते. ही स्पष्टता सामाजिक चळवळीत काम करीत असताना समाजाच्या जवळून केलेल्या निरीक्षणातून लाभलेली आहे.
दाटून येतो लेखणीचा गळा
हळहळते वेदनेची शाई
उतरतो दाह वंचितांचा
कागदाच्या देहावर
वंचितांचा दाह आपल्या लेखणीतून उतरवून त्या वेदनेला कवी श्रीमंत करून जातो. अनेक वेळा संमेलनांच्या बातम्यांची हेडलाईन ठरलेली ‘अतिक्रमण’ ही कविता माणसाला शांतीच्या मार्गाने घेऊन जाते.
त्या पिंपळ वृक्षाखालचे अतिक्रमण काढावे म्हणतो
बुद्धाला अन् माणसाला थेट जोडावे म्हणतो.
या ओळींमधून कवी जाती-धर्माच्या नावाखाली धुमसणाऱ्या मानवी समुदायाला शांतीचा, मानवमुक्तीचा संदेश देतो. कवी व्यवस्थेला अनेक प्रश्न विचारतो. त्याची उत्तरे व्यवस्थेकडे नाहीत किंवा ती देऊ शकत नाही, म्हणून मग तो स्वतःच त्यावर उत्तर शोधतो. अपेक्षेच्या मातीत स्वप्न पेरत जातो. जळजळीत असे काही त्याच्या मनात गोठतच नसल्याने त्याच्या संवेदनेतून कायम उपेक्षितांची दुःखे वाहत राहतात.
मिळतो दोन तीन महिन्याला निराधार म्हणून
सुईच्या भोकाएवढा पगार
घुसतच नाही त्यातून अडचणीचा धागा आरपार
‘निराधार’ या कवितेतून शासनाच्या अनेक योजनांच्या फोलपणावर त्याने अचूक बोट ठेवले आहे. या संग्रहातील प्रत्येक कविता विचार करायला भाग पाडते.
‘कविता माझ्या जगण्याचा श्वास आहे’ या कवितेत कवी म्हणून मिरवण्याची हौस असणाऱ्यांना आणि कवितेचा फायदा करून घेण्यासाठी कविता लिहिणाऱ्यांना कवी चांगलेच सुनावतो.
स्वाभिमानाच्या दाराला लावावे भले मोठे कुलूप
..............................
कपाळावर घेता येते कवी गोंदवून
येतात पुरस्कार
अशी शिकवण देणाऱ्या मित्राला कवीकडून मिळालेले उत्तर हे साहित्यजगतासाठी मार्गदर्शक आहे -
पण काय करू मित्रा कवितेतून माणूस हटत नाही
आणि जळजळीत असं काही कधीच आत गोठत नाही
कवी विशाल इंगोले यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूस आहे. या कवीला स्वतःच्या दुःखाचे अप्रूप नाही. हा कवी समष्टीचे दुःख जगतो. त्या दुःखाच्या काटेरी वनात जखमी होत जातो. माणसाचे जगणे सुंदर व्हावे यासाठी तो विचारपेरणी करीत जातो.
‘माझ्या हयातीचा दाखला’ या संग्रहाच्या पाठराखणीत डॉ. गजानन जाधव म्हणतात, “बुद्धाला अन् माणसाला थेट जोडू पाहणारा हा कवी समाजामध्ये शांतता रुजवू पाहत आहे. शिक्षण व्यवस्थेची डागडुजी व्हावी, मानवता हाच सर्वांचा धर्म व्हावा, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, हा आग्रह त्यांच्या कवितेतून व्यक्त होतो.”
ते भांडत राहिले रंगावरूनी रात्रभर सभेत
मी जाताना फक्त माणसाचा झेंडा नेला होते
या दोन ओळींत कवी मानवतेचा सार सांगून जातो. हाच या कविता संग्रहाचा सार आहे. संतांच्या शिकवणीचे आणि महामानवांच्या विचारांचे प्रतिबिंब या कवितेत पाहायला मिळते.
म्हणूनच कवीला आपल्या कवितेवर विश्वास आहे, तिच्याविषयी कृतज्ञताही आहे.
मी खतवत राहिलो जगण्याच्या साऱ्या थकबाकीचे हिशेब
............
भविष्याच्या पुढ्यात चिरंतन चिरंजीवी असेल
याच माणसाची नोंद
जगण्याची वाट दाखवून निर्वाण करणाऱ्या बुद्धासारखी
फडफडत राहील काळाच्या गडावर कविता होऊन
> माझ्या हयातीचा दाखला
या संग्रहातील आईवरील ‘दोन श्वास’ ही कविता वाचताना डोळ्यांच्या कडा पाणावतात. आईला अर्पण केलेल्या या संग्रहाची अर्पणपत्रिकाही तेवढीच नाजूक व हृदयस्पर्शी आहे.
माणसाचा, मानवतेचा झेंडा घेऊन निघालेल्या या कवितेचा झेंडा कायम फडकत राहील यात शंका नाही. कवितेला आपला श्वास मानणाऱ्या संवेदनशील, प्रतिभावंत कवी विशाल इंगोले यांच्या ‘माझ्या हयातीचा दाखला’ या संग्रहाने साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली आहे. या कसदार कवितेची योग्य ती चर्चा व्हायला हवी, होईलच. विशाल इंगोले यांनी असेच दर्जेदार खूप लिहावे. त्यांच्या पुढील लिखाणास हार्दिक शुभेच्छा!
@छाया बेले
पुस्तक:
माझ्या हयातीचा दाखला (कविता संग्रह)
कवी: विशाल इंगोले
प्रकाशन: काव्याग्रह प्रकाशन, वाशीम
पृष्ठे: १२८ | किंमत: १४० रु.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा