वळीव | मराठी कविता
वळीव कोसळावा
तसं काळजाच्या काटेरी
कातळावरचे काटे
नेलेस वाहून...
आता उगवून आलंय तिथे
चांदणरान...
काळजातली एकेक गाठ
सोडून
तुझ्या पुढ्यात ठेवलेली...
तू केलंस
सगळ्या सलींनां
कुलूपबंद
आणि दिलंस टाकून
तुझ्या मनाच्या
सागरतळाशी...
आता कुठे वाटतंय,
कोणीतरी डोक्यावरचं ओझं
उतरवून घेतल्यागत...
हलकं, हलकं
तुझ्या सोबत...
तुझा प्रत्येक शब्द
उलगडत जातो
जगण्याचं सारं...
मी माझ्यात असल्याची
जाणीव होते
तुझ्या सोबत...
@छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा