आत्मभानाच्या वाटेवर | मराठी कविता
वेदनांकींत भुतकळाचं सुतक बाजूला सारून
लोहकड्याची एकेक कुठली तोडून
ती मुक्त होतेय हळूहळू
पारंपारिक संस्कारांच्या संमोहनातून
आता कुठे जागृतावस्थेत येतेय ती
ती करीत नाही पुत्रप्राप्तीसाठी देवाला आवाहन
आता जाणते ती नरमादी मिलनाशिवाय हे शक्य नाही
हे कर, ते करू नको अशा निर्देशांना
फारसं मनावर घेत नाही
ती करू लागलिये आता स्वामित्वाचा स्विकार
उत्खननात सापडल्यात तिला या खुणा
तिला तिच्या स्त्रित्वाचा नाही वाटत संकोच आता
तिलाही सिद्ध करायला आवडतं
तिचं कर्तृत्त्व
सुरक्षित दावणी पेक्षा
वाटेत येणारे खाचखळगे पार करत
मुक्त वाहणे जास्त आवडते तिला
ती अडकते मोहात
सावरते त्यातून..
आदीम भावना जगताना,
अपराधी नाही ठरवत स्वत:ला
ती शोध घेण्यात हरवून जाते स्वत:चा
नको वाटते कुंपण
तेव्हा वाढवते एखादं दत्तक मूल
आपल्या हक्काचं म्हणून
मातृत्व या
आदीम प्रेरणेच्या पुर्तीसाठी
सर्व गुणदोषांसकट स्विकारलय
तिचं माणूसपण तिने
छाया बेले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा