आयुष्यगड | मराठी कविता
Date: May 4, 2020
गावशिवेच्या जवळून
भुईची अनेक कातळं उकरुन
मी आणली अस्पर्शित माती
एखाद्या अराध्याची घडवावी
मुर्ती तशी घेतली घडवायला
माय म्हणाली, स्वत:ला रांध
त्यात पुर्णपणे
मी पणाचा एकही खडा
राहू देऊ नको
मग घडेल मनासारखं
तिला विचारायचं राहून गेलं
' तूझं घडलं ?'
मी घडवत गेले आत्ममग्न होवून
जिवाचं उदक सोडत
दिवाळीचा गढ घडवावा तसा
अगदी बाबतवार
तटबंदी , पायऱ्या नसलेली विहिर
त्यात टाकून दिली चंदेरी स्वप्न
थोडीफार उगवण्याच्या वाटेवर असलेली
त्यावर,पहारेकरी बसवलेले
रात्रिच्या अंधारात चाचपडत
येवू नयेत ती बाहेर म्हणून
मी बनवलेला हा आयुष्यगढावर
सगळ्याच खुणा टिकवून आहेत
आपलं स्वतंत्र अस्तित्व
फक्त मी एक निर्वात पोकळी
बनून राहिलेय
आहेही आणि नाही ही अशी
©️®️छाया बेले🖋️
-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा