कदाचित : स्त्रीच्या संघर्षातून माणुसकीचा शोध घेणारी कादंबरी | पुस्तक परिचय




साहित्याचा उद्देश हा माणूस-हितैषी असावा. साहित्य हे जीवनाचा पुनर्विचार करायला लावणारे असावे. साहित्यात माणूस हा केंद्रस्थानी असावा. साहित्य जाती-धर्माच्या वर्तुळाबाहेर पडून जीवनमूल्यांचा शोध घेणारे असावे. माणसाच्या जगण्याचा संघर्ष, त्याचे दुःख, वेदना त्याचबरोबर त्यावरील उपाय याचा साहित्यातून वेध घेणे आवश्यक आहे.

आजूबाजूच्या भवतालात तशा अनेक कहाण्या विखुरलेल्या असतात. त्या माणसाला प्रेरणादायी ठरतात, जगण्याला बळ देतात, गमावलेला आत्मविश्वास परत मिळण्यास मदत करतात, आत्मबळ वाढवून कोलमडलेल्या एखाद्याला पुन्हा उभं राहण्यास मदत करतात. अशाच एका घटनेची नोंद घेत बा. बा. कोटंबे यांची 'कदाचित' ही कादंबरी आकाराला आली आहे.

प्रतिमा प्रकाशनकडून प्रकाशित झालेली ही कादंबरी एका स्त्रीच्या संघर्षाची कहाणी आहे. कादंबरीची नायिका राधा एका गैरसमजातून नवऱ्याचं घर सोडते व माहेरी परत येते. पुन्हा सासरी परत जावं लागणार हे तिच्या लक्षात येतं तेव्हा ती कुणालाही न सांगता आपलं घर सोडून बाहेर पडते. तिथूनच तिच्या संघर्षाची सुरुवात होते. एका कणखर नायिकेचा प्रवास लेखकाने अतिशय समर्थपणे मांडला आहे.

कोवळ्या वयात तिचं सुटलेलं घर, तिचा प्रवासातील संघर्ष, एकट्या तरुण मुलीवर रोखलेल्या अनेक नजरा, त्यातील काही संशयास्पद तर काही वासनेने बरबटलेल्या. माणूस ओळखण्याची तिला उपजत असलेली जाण, त्यातून ती सर्व अडथळ्यांवर मात करीत जाते.

संपत वाघमारे या चप्पल सांधणाऱ्या म्हाताऱ्याच्या रूपात तिला मानवतेचं दर्शन घडतं. वाघमारे तिला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळतो. राधा त्याला वडिलांसारखा जीव लावते. या नात्यातून लेखकांनी निस्वार्थ नात्यांचे दर्शन घडवले आहे. हे हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत निस्वार्थ प्रेमाचा झरा वाहतोय म्हणूनच आजही सृष्टी टिकून आहे.

संपत वाघमारेच्या अनुभवाच्या बोलातून राधा आपल्या वाळवंटी आयुष्याला सामोरे जाण्याची तयारी करत असते. आपल्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात राकटता कशी उतरेल याकडे राधा लक्ष देते. तिच्याकडे बघताच कोणालाही धडकी भरेल अशा अवतारात ती वावरते. तिने स्वतः केलेल्या बदलामुळे संपत वाघमारे निश्चिंत होतात. आपल्यानंतर राधा स्वतःची काळजी घेऊ शकते याची त्यांना शाश्वती पटलेली असते.

स्त्रीच्या ठायी असलेली प्रज्ञा, जिद्द, कणखरपणा, प्रतिकूल परिस्थितीला न डगमगता सामोरे जाण्याचे आत्मबळ या गुणांची लेखकांनी समर्थपणे मांडणी केली आहे. स्त्री जेव्हा व्यक्ती म्हणून संपूर्णपणे विकसित होते तेव्हा कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करू शकते. मात्र समाज तिला अबला ठरवून आपण तयार केलेल्या साच्यात ठोकून बसवण्याचा प्रयत्न करतो. तू शक्तिहीन, निर्बुद्ध आहेस, तुला जगण्यासाठी कोणाचा न कोणाचा तरी आधार कायम घ्यावा लागेल, असंच तिच्या मनावर ठसवलं जातं. मात्र तिच्या विकासासाठी स्वतंत्र अवकाश मिळाला तर ती जीवन जगण्यासाठी शरीराने, मनाने, विचाराने तेवढीच समृद्ध आहे, हा स्त्रीवादी विचार लेखकांनी या कादंबरीत मांडला आहे.

संपत वाघमारे यांच्या निधनानंतर आपल्या उपजीविकेकरिता राधा त्यांचा चपला सांधण्याचा पारंपारिक व्यवसाय चालू ठेवते. तेथे विकृत मानसिकतेबरोबर चार हात करून आपल्या निर्भय व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देते. व्यवसाय स्वीकारण्यापासून त्यात आडकाठी आणणाऱ्यांना धडा शिकवण्यापर्यंत, सगळ्याच रूढी-परंपरांना हादरे देत राधा या पात्रातून लेखक स्त्रीचं माणूसपण अधोरेखित करतात.

संपत वाघमारेच्या आश्रयाला आलेली राधा एका वेश्येच्या अनाथ मुलीला घरी आणून तिला आधार देते. पुन्हा एक आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवते. तिची संपूर्ण जबाबदारी घेत, शिक्षण देऊन, लग्न करून देते. पोरींची छेड काढणाऱ्यांना चोप देत मुलींनी कसं खंबीरपणे जगायला हवं असा आदर्श राधा त्या मुलींसमोर ठेवते. इतकंच नाही तर समाजातील सर्वच अपप्रवृत्तींविरुद्ध लढा देते. राधा दुबळ्यांसाठी आधाराचे ठिकाण बनते. इतकंच नाही तर अनेक अनाथांची आई होत मातृत्व भावनेला अति-उंच शिखरावर नेऊन ठेवते.

आजूबाजूच्या भवतालात जीवनमूल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर माणसाचं माणूसपण समृद्ध करणारा विचार लेखकांनी या कादंबरीतून मांडला आहे.

'कदाचित' ही कादंबरी स्त्रीप्रधान कादंबरी आहे. स्त्री ही भरण-पोषण करणारी, सांभाळणारी, समान न्याय करणारी व ममतेने जपणूक करणारी असते, हा मातृसंस्कृतीचे नाते सांगणारा विचाराचा धागा या कादंबरीत सापडतो. ओघवत्या संवादशैलीत अतिशय सुंदर मांडणी बा. बा. कोटंबे यांनी केली आहे. त्यामुळे पुस्तक वाचत असताना कुठेही कंटाळवाणे वाटत नाही.

सुंदर मुखपृष्ठ, आशयघन असलेली ही कादंबरी वेगळ्या विषयावरील एक ताकदीची कादंबरी आहे. मराठी साहित्यविश्व समृद्ध करण्यात या कादंबरीची मोलाची भर पडणार आहे.

लेखकाचे हार्दिक अभिनंदन. बा. बा. कोटंबे यांनी असेच भरपूर लिहावे, पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.

- छाया बेले, 

कादंबरी : कदाचित
लेखक : बा. बा. कोटंबे
प्रकाशन : प्रतिमा प्रकाशन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .