डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महिला सक्षमीकरण!!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना जगण्याचा अधिकार दिला !
पाण्यामध्ये मासा । श्वास घेई कैसा ।
जावे त्यांच्या वंशा । तेव्हा कळे ।।
या संतवचनाप्रमाणे भारतीय समाजात स्त्रिया वर्षानुवर्षे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जीवन कंठत आहेत. त्यांचे माणूसपणच मान्य केले जात नाही, तिथे त्यांच्या अधिकाराचा प्रश्नच उद्भवत नाही.
पुरुषप्रधान समाजाने लादलेले उपेक्षित जीवन त्या आपला जन्मभोग म्हणून स्वीकारून जगत जातात. हे सगळे देवानेच निर्माण केले आहे, असे स्त्रियांच्या मनावर शेकडो वर्षांपासून बिंबवले गेले आहे. महिलांना कर्मकांडात गुंतवून मानसिक गुलामगिरी लादली. उंबरठ्याच्या आत अडकवून त्यांचे अवकाश हिरावून घेतले गेले. 'चूल आणि मूल हेच तुझे जग आहे', हेच तिच्या मनावर कायम गिरवले गेले.
वर्षानुवर्षे झालेल्या या संस्कारांतून स्त्रियांनीही या दुष्ट रूढींना पूर्णपणे स्वीकारले आहे. एखाद्या कैद्याला कारागृहाची सवय व्हावी, तशीच स्त्रियांना या गुलामगिरीच्या जोखडाची सवय झाली आहे. खुले आकाश आपल्यासाठी नाही, असाच त्यांचा समज झाला आहे.
मातृसत्ताक संस्कृतीत राज्यकर्ती असलेला स्त्रीसमूह आपल्या कर्तृत्वाचे तेज, ओज हरवून बसला आहे. प्रस्थापित व्यवस्थेने या समूहाचा तेजस्वी इतिहास काळाच्या कृष्णविवरात दडपून टाकला आहे. त्यांच्या जगण्यावर अनेक निर्बंध घालून त्यांना अस्तित्वहीन जीवन जगण्यास भाग पाडले गेले. त्यांचे जगणे-मरणे, हसणे-रडणे, चालणे-बोलणे, श्वास घेणेही पराधीन करून टाकले. अशा अर्धमेल्या अवस्थेत स्त्रीसमूह आपले जीवन कंठत आहे.
*फुले दाम्पत्याचा क्रांतिकारी वारसा*
या शोषण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारून क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे आपल्या उक्ती व कृतीतून जगाला ठणकावून सांगितले.
मुली शिक्षित झाल्या तर त्यांचे आत्मभान जागृत होईल, त्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला, शोषणाला नकार देतील, म्हणून त्यांनी मुलींसाठी शाळा काढून स्त्रीच्या विकासाचा मार्ग मोकळा केला.
फुले दाम्पत्याने अडचणींच्या पहाडाचा सामना करीत जन्मभर स्त्रीमुक्तीचे कार्य केले. खरे तर त्यांच्या कार्याला 'स्त्रीमुक्तीचे कार्य' म्हणणे हा संकुचितपणा ठरेल. त्यांचे कार्य हे 'मानवमुक्तीचे' महान कार्य आहे. मानवसमूहापैकी अर्धा समूह गुलामगिरीत जगत असेल, तर मानव समाज विकास करत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. संपूर्ण मानवसमूहाला जर आपला उत्कर्ष साधण्यात कुठलीही अडचण येत नसेल, तर तेव्हा मानव मुक्त झाला, असे म्हणणे योग्य ठरेल. विश्वकल्याणाचा विशाल दृष्टिकोन ठेवून फुले दाम्पत्याने अखेरच्या श्वासापर्यंत व्यवस्थेविरुद्ध लढा दिला.
*बाबासाहेबांचा कायदेशीर लढा*
महात्मा फुलेंना गुरु मानून, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यात अनेक तरतुदी केल्या.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी समान अधिकाराची आवश्यकता आहे, हे बाबासाहेब जाणून होते. यासाठी शिक्षण ही मूलभूत गरज आहे. मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी मुलींना मोफत शिक्षण मिळावे, अशी कायद्यात तरतूद केली.
बाबासाहेब एवढ्यावरच थांबले नाहीत. हिंदू कोड बिलातून महिलांना संपत्तीत समान अधिकार बहाल केले, जेणेकरून महिलांवरील अत्याचार थांबतील व त्यांचे जगणे सुकर होईल.
बाबासाहेब म्हणतात, "कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून लक्षात येते."
*आजची वास्तविकता*
आजच्या शिक्षित म्हणवणाऱ्या समाजात स्त्रियांची काय अवस्था आहे, हा समाजाच्या आत्मपरीक्षणाचा विषय आहे. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला सन्मान महिलांना मिळतो का?
महिला आज कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर सुरक्षित आहेत का? किंवा या पातळ्यांवर स्वातंत्र्य, समता त्यांच्या वाट्याला येते का? या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. महिला जरी शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रांत कार्यरत असल्या, तरीही त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा पारंपरिक दृष्टिकोन अजूनही बदललेला नाही.
आजच्या प्रगत समाजात कमावत्या मुलीच्या लग्नात हुंडा घेतला जातो. हुंड्यासाठी छळ, खुनासारख्या घटनाही घडतात. भ्रूणहत्या होते. चूल आणि मूल सांभाळून नोकरी करावी, सोबतच सर्व घरकामाची जबाबदारी एकटीने पेलून आदर्श गृहिणी व्हावे (घरातील सगळ्यांचे मुकपणे ऐकून घेणारी, मग ते चूक असो की बरोबर), अशा अवास्तव अपेक्षा घरातील लोकांच्या असतात.
नोकरीच्या ठिकाणीही महिलांना पुरुषसत्ताक मानसिकतेला सामोरे जावे लागते. समाजात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या महिलेला अनेक दूषणे लावून मानहानी करण्याचा प्रयत्न केला जातो. हे सगळे आजमितीस सुरू आहे. हे सगळे तिला व्यवस्थेला तिचे माणूसपण मान्य नसल्याचेच निदर्शक आहे.
खरे तर स्त्रियांना संविधानानुसार सगळे अधिकार कागदोपत्री मिळाले असले, तरी प्रत्यक्ष समाजजीवनात पारंपरिक, अलिखित नियमानुसारच सगळे व्यवहार सुरू आहेत. सगळे बदल वरवरचे आहेत. अजूनही स्त्रीची घुसमट थांबलेली नाही.
*वारसाहक्क - सन्मानाचा पाया*
पूर्वापार चालत आलेले हे दुष्टचक्र थांबावे, म्हणून बाबासाहेबांनी स्त्रियांना हिंदू कोड बिलातून समान अधिकार बहाल केले. त्यातील सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे मुलीला मुलाप्रमाणे वारसाहक्काचा अधिकार.
घरातील संपत्तीत समान अधिकार असतील, तरच स्त्रियांना सन्मानाने जीवन जगता येईल, हे बाबासाहेब जाणून होते. ते जर नसतील, तर तिच्या वाट्याला आश्रितासारखे जगणे येईल. ते येऊ नये म्हणून त्यांनी हिंदू कोड बिलाद्वारे मुलींसाठी वारसाहक्काची तरतूद करून ते पास करून घेण्यासाठी एकाकी लढा दिला. पुरुषसत्तावादी मानसिकतेच्या लोकांनीच हिंदू कोड बिलाला कडाडून विरोध केला.
आज कायद्याने वारसाहक्क स्वीकारला असला, तरी समाजमनाने तो स्वीकारलेला नाही. आजही स्त्रीला आपला अधिकार मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे दीर्घ लढाई लढावी लागते. अनेक मानसिक तणावांना सामोरे जावे लागते. कधी सामाजिक, तर कधी आपल्याच म्हणवणाऱ्या लोकांकडून कौटुंबिक बहिष्कार घातला जातो. या सगळ्या गोष्टींना घाबरून महिला आपला अधिकार मागण्याच्या भानगडीत पडत नाहीत. निराधार अवस्थेत आपले जीवन कंठत असतात.
कुणाचाही भक्कम आधार नसल्याने, भावनिक वेष्टनात गुंडाळून समाजाने लादलेल्या नात्यांची गुलामगिरी करण्याशिवाय पर्याय उरत नाही. तिने प्रवाहाविरुद्ध जाऊन अन्यायकारक रूढींना नाकारण्याचा प्रयत्न करताच, समाजाकडून अनेक आघाड्यांवर तिच्यावर हल्ला करून तिला हतबल करून तिची मागणी दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. वारसाहक्काच्या मागणीबाबत हेच घडते.
स्त्रियांना न लढता संपत्तीमध्ये समान अधिकार मिळेल, तेव्हाच त्यांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जगता येईल. याकरिता स्त्रियांनी सद्सद्विवेकबुद्धीला जागृत ठेवून, कुठल्याही दडपणाखाली न येता आपल्या हक्कासाठी समोर येऊन लढायची तयारी दाखवायला हवी. अधिकारासाठी लढणे हा कुठलाही गुन्हा नाही.
समाजात बदल घडवून आणण्यासाठी कोणीतरी सुरुवातीचे पहिले पाऊल उचलणे गरजेचे आहे. ही लढाई मानवसमूहाच्या अर्ध्या भागाची आहे. म्हणूनच हे मानवमुक्तीचे महान कार्य आहे. शोषणविरहित समाजनिर्मितीसाठी सर्व स्तरांवर समानता येणे आवश्यक आहे. याकरिता मुलींना मुलांप्रमाणे वारसाहक्क मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रत्येक महिलेने पुढाकार घ्यायला हवा. तरच महामानवांच्या संकल्पनेतील निकोप समाज निर्माण करता येईल.
@छाया
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा