वांझोटं पितृत्व:आत्मजागृतीचा प्रवास
वांझोटं पितृत्व : आत्मजागृतीचा प्रवास
त्रिशिला साळवे हिचा परिस पब्लिकेशन कडून प्रकाशित कवितासंग्रह "वांझोटं पितृत्व" नुकताच हाती आला. या संग्रहात एकूण सहासष्ट कविता आहेत. कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून ते वाचकांच्या मनाचा बराच गुंता सोडवायला मदत करते. संग्रहाचं शीर्षक बघूनच बऱ्याच संदर्भांचा उलगडाही होतो आणि बरेच प्रश्नही निर्माण होतात. हे वाचकाच्या क्षमतेचा कस लावणारे आहे.
हा तिचा पहिलाच कवितासंग्रह असला तरी या कवितांच्या माध्यमातून तिने मांडलेल्या नोंदी विचार करायला लावणाऱ्या आहेत. अनेक स्त्रिया लिखाण करीत आहेत, त्यात जाणीवपूर्वक लेखन करणाऱ्या अगदी बोटावर मोजण्याइतक्या आहेत. हलकेफुलके विषय निवडीमुळे महिलांचं लिखाण फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही, मात्र याला अपवादही आहेत. स्त्रियांनी गांभीर्याने लिखाण करीत आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. त्रिशिला ही अशीच जाणीवपूर्वक लेखन करणारी एक संवेदनशील कवयित्री आहे.
मातृसंस्कृतीला गाडून पितृसत्ताक समाज निर्मिती झाली. स्त्रीचं माणूसपण हिरावून घेतलं गेलं. स्वातंत्र्य, समता या मातृसंस्कृतीच्या वैशिष्ट्य असलेल्या विचारांच्या खुणाही तिच्या मेंदूत, तिच्या विचारात, अस्तित्वात दिसणार नाहीत याची पूर्ण दक्षता पुरुषसत्ताक समाज निर्मिती करणाऱ्यांनी घेतली आहे. धडावर डोकं नसलेली गुलाम बनवण्यासाठी तिच्यावर अनेक जाचक बंधने घालून तिला चार भिंतीच्या आड कैद करण्यात आलं. मुलांना जन्माला घालणं, रात्रंदिवस राबणं, पुरुषांची सेवा करणे, चाकरी करणे एवढ्याच करिता स्त्री जन्म आहे हे तिच्या मन, बुद्धी व विचारावर ठसवलं गेलं.
क्रांतिबा महात्मा फुले व माय सावित्री यांनी स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून स्त्रीच्या हातात लेखणी दिली. हजारो वर्षांपासून अंधाऱ्या गुहेसारख्या बंदिस्त मेंदूची दारं किलकिली करून त्या दाराशी विचारांची उजेडाची ठिणगी ठेवून दिली. पुढे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रीला माणूस म्हणून जगता येईल असे अनेक अधिकार तिला बहाल केले.
आणि स्त्री शिक्षण घेत हळूहळू कोमातून बाहेर यावी तशी भानावर येत गेली. पूर्णतया नसलं तरी काही प्रमाणात स्त्रियांमध्ये आत्मभान जागृत झालेलं आहे व त्या व्यवस्थेच्या दंभावर कोरडे ओढू लागल्या आहेत. अशाच आत्मभान जागृत झालेल्या स्त्रीचा आवाज म्हणजे त्रिशिला हिचा 'वांझोटं पितृत्व' हा काव्यसंग्रह होय.
या संग्रहात त्रिशिलाने स्त्रीच्या अनेक प्रश्नांवर मांडणी केली आहे, समाजाच्या दुटप्पी व्यवहारावर सडकून वार केले आहेत.
मी फक्त विचार जगायला सुरुवात केली
संविधानाने मला दिलेल्या हक्काने
स्वतःला पुरोगामी समजणारी
पुरुषी मानसिकता ढवळून
निघाली मनुवादाच्या शापाने
अशा शब्दातून कवयित्री स्वतःला पुरोगामी दाखवणाऱ्या, मात्र स्त्रीच्या बाबतीत तीच पारंपारिक मानसिकता जोपासणाऱ्यांचा मुखवटा टराटरा फाडून काढते. समाजाचे हे दुटप्पी वागणे कवयित्रीने चांगलंच ओळखलं आहे.
स्त्री-पुरुष समानतेचा आवाज
तुझ्या किचनमधून आला तर
खरंच सांग तू जाहीर सभेत
स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलशील का...?
अशा शब्दातून कवयित्री पुरुषसत्ताक समाजाची मानसिकता मार्मिकपणे टिपते. सुशिक्षित समाज, सुशिक्षित तो, सुशिक्षित ती, तरीही तिचं दुय्यम स्थान ठरलेलं. ही सामूहिक वेदना कवयित्री आपल्या कवितेतून शब्दबद्ध करते. 'वादळापूर्वीची शांतता' (पृ. १९) या कवितेतून ही सल अतिशय समर्पकपणे व्यक्त होते.
स्त्रीचं जगणं, तिचं प्रत्येक गोष्टीत बोलणं, तिचं हसणं, तिचं चालणं, तिचा शृंगार, तिचं सगळंच टीकेचा विषय असतं. जगत असताना वेळोवेळी उपेक्षा तिच्या वाट्याला आलेली असते. तिच्या मरणानंतर मात्र भारतात ती जर नवऱ्याच्या आधी गेली तर तिला साज-शृंगार करून मानाने निरोप दिला जातो. स्त्रीच्या वाट्याला किती विरोधाभास येतो, हा विरोधाभास टिपणारी "शेवटचा निरोप समारंभ" ही दीर्घ कविता वाचकाच्या मनाचा तळ ढवळून काढणारी आहे.
या संग्रहातील जास्तीत जास्त कविता वाचताना मनाला स्पर्शून जाणाऱ्या आहेत. वाचकाला विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत, चिंतन करायला लावणाऱ्या आहेत. या संग्रहाच्या काही मर्यादाही आहेत, मात्र कवितेच्या आशयामुळे त्याकडे लक्ष जात नाही.
त्रिशिलाने स्त्रियांना पडणाऱ्या अनेक प्रश्नांची मांडणी अतिशय निर्भीडपणे केली आहे, त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तिने केला आहे. वाटेवर मार्गस्थ झालेल्या प्रत्येक स्त्रीने व पुरुषाने 'वांझोटं पितृत्व' हा संग्रह आवर्जून वाचायला हवा.
त्रिशिलाचा प्रगल्भ जाणिवांचा, आत्मभानाचा, आत्मजागृतीचा प्रवास अजून समृद्ध होत जावो. तिने अजून खूप लिहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा.
- छाया बेले, नांदेड
पुस्तक : वांझोटं पितृत्व
कवयित्री : त्रिशिला साळवे
प्रकाशन : परिस पब्लिकेशन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा