वेदनेला सुंदर करणारी प्रा. प्रकाश खरात यांची कविता | पुस्तक परिचय |


        //वेदनेला सुंदर करणारी प्रा. प्रकाश खरात यांची कविता//




 "कलेचा आविष्कार हा आंतरिक गरजेतून होत असतो, व्हायला हवा, तो तसा होत असेल तरच तो अस्सल आणि अभिजात असतो" रिल्केचं हे विधान प्रकाश खरात यांचा कवितासंग्रह वाचत असताना वेळोवेळी प्रत्ययास येतो. जन्म-मरण वरदळीवर येताना हा नेणिवेतून  जाणिवेत आणि जाणिवेतून,  जाणिवेतून कविच्या साधनातून अवतरीत झालेली कलाकृती रसिकांचा भावविश्व व्यापून टाकते. 
वाचकाने कितीही त्रयस्थ बनून काठावरून अस्वाद घ्यायचं ठरवलं तरी  त्याला ती आपल्या आत ओढून घेऊन तळापर्यंत घेऊन जाते. रसिक नकळत त्या कलाकृतीशी एकरूप होऊन जातो. कलाकारा जवळील आपल्या अनुभुतीला  व्यक्त करण्याच्या सामर्थ्यावर अवलंबून असतं. "जन्म-मरण वर्दळीवर येताना" हा कवितासंग्रह वाचत असताना असाच अनुभव येतो. प्रकाश खरात यांच्या कवितेमध्ये हे सामर्थ्य पाहायला मिळते. वाचक कवीच्या अनुभूतीचा आस्वाद काठावर उभं राहून येऊ शकत नाही. नकळत तो त्या वेदनेशी एकरूप होऊन जातो. तिच्यातून वेगळं व्हायचा मार्गही सापडत नाही. हतबल होऊन तो तिच्यात बुडत जातो. त्यातील अस्वस्थता अंतरंगात भरून वाहू लागते. त्या दुःखाचा वेदनेचा आस्वादक होण्याशिवाय  हाती काहीच राहात नाही. मा. श्रीपाल सबनीस सरांनी कवितासंग्रहावर दीर्घ अशी प्रस्तावना देऊन या कवितेचं अंतरंग उलगडून दाखवलं आहे. ते म्हणतात-
" प्रकाश खरात यांच्या कवितेचे खरे सामर्थ्य त्यांच्या प्रतिमा विश्वात आहे त्यांची कविता प्रतिमा- प्रतिका ने बहरलेली आहे पण नुसत्याच शब्दांच्या वेलबुट्ट्यांनी केवळ आकारास येणारा कलात्मक चमत्कार जन्माला घालणे या अभिजात कवीला मंजूर  नाही. अनुभूतीच्या वेगळे फळाचे चिंतनात्मक रसायन अर्थपूर्ण प्रतिमा विलास आतून अभिव्यक्त होताना ही कविता सर्वार्थाचे कलात्मक सौंदर्य उधळत जन्माला येते"

सबनीस सरांचे हे भाष्य कवितेच्या सामर्थ्याची साक्ष देणारे आहे. हे आपल्या ला जन्ममरण वरदळीवर येताना हा संग्रह वाचत असताना लक्षात येतं. प्रकाश खरात यांच्या कविता आधुनिक समाजात मानवी मूल्यांचा होत असलेला ऱ्हास जागतिकीकरणाने माणसाचं हिरावून घेतलेलं जगण्याचं अवकाश, त्यातून होणारी घुसमट, अस्वस्थता, कवीने आपल्या शब्द सामर्थ्याने मार्मिकपणे टिपली आहे.
 95 कवितांमधून या संग्रहातून वाचक दुःख, वेदना, विद्रोह, हतबलता, चिंतन, मनन या सगळ्याचं अनुभूतीतून जात असताना कवितेचे एक नितांत सुंदर स्वरूप बघून अचंबित व्हायला होतं. वेतनाही एवढी सुंदर असू शकते हे जन्म-मरण वरदळी वर येताना हा कवितासंग्रह  वाचत असताना प्रत्ययास येते.

"उत्कट प्रेम करावं अशी भूमी नाहीये पावलाखाली
 विसंवादाची मूळ असतात नव्या ईर्षेने.."

"चाखुदे हक्काचा विष अन् करूदे
 आपलासा विषाद डोह...! (पुनरुत्थानाच्या अपेक्षेनं/ २९)

अशा शब्दात कवी प्रा. प्रकाश खरात जगण्याची दाहकता शब्दबद्ध करतात.

"माझं मनस्वी पण चालत गेलेला दुःखद अरण्यातून अवतीभवती प्राणांतिक आकांत 
बधिर त्यांच्या सर्वांगीण पातळीवर 
सुज्ञ मी निर्विकार मी.."( तेव्हा ती ध्वज असायचा/३१)

प्रा. प्रकाश खरात यांची प्रत्येक कविता त्यातली प्रत्येक वळणावर याची अनुभूती देणारी आहे. समष्टीचे दुःख वेदना कवेत घेणारी प्रकाश खरात यांची कविता, जगण्याला बळ देणारी सुद्धा आहे.

स्वप्नांचा मुलुख विखुरलाय शोकांत वाटांतून
सखोल डोहासारखी भयाण रात्री सारखी
कसायाच्या सूर्या गत मानेवरून फिरलेला भूतकाळ
अवसेच्या दावणीला बांधली गेली तु काल-परवापर्यंत
योनी गुहेत तू कैद झालेली आतापर्यंत
मृत्यु वदळ सोसत राहिलेला किनारा 
अवर्तात भिरभिरलेलं राहिलेलं अस्तित्व

आज सूर्य तुझ्या नावानं उगवो
जळू आकाश तुझ्या संदर्भानं 
मिळू शाप समुद्र सरितेच्या मिथुनाला
सापेक्ष भूमीवर उमलो तुझ्या व्यक्तिमत्वाचे सुगंधी फूल

तुझ्या नावाने उगवलेला सूर्य स्त्री वत्सल होऊन
आणि तदनंतर अवतरलेली नूतन सायंकाळी क्षेत्रमयी रात्र...( आज सूर्य तुझ्या नावाने उगवो -४८)
या कवितेत कवी स्त्री अच्छा चिरकालीन वेदनेचा मायेच्या ममतेने आढावा घेतानाच, तिच्या सुखा साठी पसायदान गातात. 
एखादा कलाकार किंवा साहित्यिक स्वःताला कोणत्याही भिंतीत न अडकवता केवळ एक माणूस म्हणून आपली अभिव्यक्ती कलाकृती निर्माण करतो त्यावेळी त्याची ती कला सर्वव्यापी होते कोणतेही पूर्वग्रह न ठेवता भोवताल जसा आहे तसा मांडणे कवा जीवनाचा अंतर्बाह्य स्वरूप जसा आहे तसा आपल्या कलाकृतीतून होतो तेव्हा ती कलाकृती उत्कृष्ट म्हणायला हवी प्रकाश खरात यांनी ही जबाबदारी लीलया पेलली आहेे. 

चक्रव्यूह भेदून आलेला तू त्याचा वंशज
 लावल्यास दहशतीचा रात्री

 तुला स्मरून चढतोय वेदनेचे शिखर ( तू तेजाचा वंशज-५४)
अशा अफाट प्रतिमा प्रतीकातून कवीने आपल्या अनुभुतीला  उंच शिखरावर नेऊन पोहोचवलं आहे.

तुला अभिप्रेत होता कल्याणकारी उष:काल
म्हणून तू विसरली ना पर्याय दिलास अमृताचा

आम्हाला विश्वास आहे तुझा बाणेदार समुद्र
 पुन्हा गरजेल याचा...(तुझा बाणेदार समुद्र -८२)

कवी प्रकाश खरात यांच्या कवितांमधून कविता जीवनाविषयीच्या सखोल चिंतनानुभूतीचा प्रत्यय येतो.
सोबतच महामानवांच्या कार्याविषयीचा उतूंगकृतज्ञभाव त्यांच्या चळवळीविषयी आंतरिक तळमळ, त्यांच्यानंतर चळवळीची झालेली पडझड, सत्तेसाठी कार्यकर्त्यांचं लाचार होणं हे सगळं बघून    मनाची होणारी घालमेल हे सगळंच सहजपणे येत जातं.

एकुणात जन्म-मरण वर्दळीवर येताना ची अनेकदा केलेली सफर तेवढीच रोमांचकारी ठरली. उत्तुंग उंचीच्या कवितेच्या निर्मितीबद्दल प्राध्यापक प्रकाश खरात यांचं
 हार्दिक अभिनंदन ..
प्रा. प्रकाश खरात हे आपल्यात नाहीत हे आताच कळलं आणि डोळ्यातून अश्रू ओघळले.भावपुर्ण श्रद्धांजली!!




छाया बेले, नांदेड.

पुस्तक: जन्म-मरण वर्दळी वर येताना
कवी : प्रकाश खरात.
प्रकाशन: संवेदना प्रकाशन.
पृष्ठे :९६
किंमत:१३०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .