.जगण्याला काडी शिलगावून जळत राहिली माय | मराठी कविता
ही कविता त्या प्रत्येक आईसाठी लिहिली आहे. जी आपलं जगणं मागे ठेवून बाकी सगळ्यांना प्राथमिकता देते. आपली मुलं, नवरा,
सासू-सासरे यांची काळजी वाहण्यात तिची अख्खी जिंदगानी खर्च करते . माझी आई सुद्धा अशीच होती. तिने तिच्यासाठी काही मागितल्याचं आठवत नाही. तिलाही विश्रांतीची गरज नक्कीच असेल. छोटी मोठी स्वप्नं असतील. काही मनासारखं करावं वाटत असेल. मात्र तिने ते कधीच बोलून दाखवलं नाही. कधी तरी डोळे लाल दिसायचे डोळ्यात अडवलेलं पाणी नाकावाटे बाहेर येऊ पहायचं तेव्हा तिला काय झालं म्हणून विचारलं तर ती म्हणायची
' डोळ्यात धूर गेला. लाकडं वल्ले होते.'
मलाही ते खरं वाटायचं.
आज तिच्या डोळ्यांतील पाण्यावर विचार करते तेव्हा तिचं स्पष्टिकरण संदिग्ध होत जातं. का तिनं सांगू नये की, मी सुद्धा जीवंत माणूस आहे.
माझ्यातही सगळ्या भावना आहेत.
मलाही दुखतं खुपतं , मला विश्रांतीची गरज आहे. अमूक एक मला माझ्या मनासारखं हवंय. मला हे खायला आवडतं. मला तिथं जायला आवडतं. सुखावर माझाही अधिकार आहे. अपमानित वाटतं. मलाही राग येतो. मलाही नकार द्यावासा वाटतो. हे तिनं एकदातरी सांगायला हवं होतं.
मात्र तिने तसं केलं नाही. आत साठवत राहिली सगळं. आणि मग मेंदूने आपली साठविण्याची क्षमता गमवली, त्यानं काम करणं बंद केलं. आई सगळं आत साठवून जगातून निघून गेली.
ती बोलली असती तर....
आईनं थोडं स्वार्थी व्हायला हवं.
बोलायला हवं !
==================================
जगण्याला काडी शिलगावून
जळत राहिली माय
चुलितल्या सरपणासंग
रक्ताळलेल्या डोळ्यांचा आळ
थोपत राहिली
कधी चुलीवर तर
कधी उन्हावर
तिच्या दु:खाच्या खोलीवर
घातलेलं मौनाचं टाळं
नाही तोडता आलं कधीच
कष्टाने रापलेल्या
हातावरील रेषांतून
नाही वाचता आले
तिच्या आत वाहणारे
दु:खाळू झरे
हजारो लुप्त जिवांचे
अवशेष सापडले उत्खननात
तिने तिचं दु:ख जिथे दडवलं
ते ठिकाण नाही सापडलं
कुठेच....
छाया बेले, नांदेड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा