भग्न अवशेषातून- कविता
ती घडवत आहे
दिर्घ संघर्षाच्या
भग्न अवशेषातून
ती घडवत आहे
पुन्हा स्वतःला
नाजूक तरल भावनांचे
तार कापून काढलेत
आडवं आलेलं मुल
खांडून काढावं तसं
तिला झालीय जाणीव
आताशी
माणूस असल्याची
ती नाही समजत स्वतःला
बीज साठवण्याची कोठी
आजूबाजूला नाही दिसत
एकही चेहरा कुरूप
सगळ्यांनीच धारण केलेत
सुंदर बुरखे
एखाद्या क्षणात
गळून पडतो बुरखा
अन्
आतला वासनेचा
कुजकट विकट हसत
समोर येतो
म्हणूनच तर
परफ्यूमचा धंदा
तेजीत असावा
हजारो वर्षांपासूनची
ममी अजून कुजली नाही
मात्र माणसाचं माणूसपण
कुजत चाललय
हे जाणून आहे ती
अजून बराच अंधार आहे
डोळ्यासमोर तिच्या
मात्र अदमास घेते ती
वाट चुकवणाऱ्या चकव्यांचा
तिच्या खडतर वाटेची
चांगलीच ओळख झालीय
आता तिला
छाया बेले
---
Shared using https://www.writediary.com/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा