थोर समाजसुधारक , आद्यक्रांतीगुरू लहुजी साळवे: पुस्तक परिचय

         

      भारतीय इतिहास हा न्याय संगत लिहिला गेला नाही .  बऱ्याच घटनांची अनेकांच्या योगदान कर्तृत्वाची शौर्याची  दखलही घेतली गेली नाही. 
याला कारण इथली वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था , त्यामुळे निर्माण झालेली उच्च-नीचता हे कारणीभूत आहेत . राजकीय , सामाजिक सांस्कृतिक सत्ता ज्यांच्या हातात आहे,  त्यांनी आपल्या पुरता आपल्या सोयीचा इतिहास लिहून ठेवला .  
   राजकारण,  समाजकारण याकरिता मोलाचे योगदान देणारे,  शौर्य गाजवणारे महानायक पडद्याआड राहिले. राहिले म्हणण्यापेक्षा ते ठेवले गेले . किंवा दुर्लक्ष केले गेले असे म्हणणं योग्य राहील .  स्वातंत्र्यानंतर जेव्हा दलित बहुजन समाज शिक्षणामुळे सुज्ञ झाला .  आपल्या महानायकांवर अन्याय झाल्याचे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हा हळूहळू शोध घेतल्यानंतर स्वातंत्र्य काळात व त्याआधी शौर्य गाजवणारे शूरवीर जगासमोर येत गेले .  
  असेच एक महानायक  म्हणजे क्रांतीगुरु लहुजी साळवे . 
डॉक्टर विठ्ठल भंडारे लिखित व पंचफुला प्रकाशनाने  प्रकाशित केलेल्या 'लहुजी साळवे एक थोर समाज सुधारक ' या ग्रंथात डॉक्टर विठ्ठल भंडारे यांनी लहुजी साळवे यांच्या घराण्याचा व त्या घराण्यातील शूरवीरांचा त्यांनी गाजवलेल्या शौर्याचा सविस्तर आढावा घेतला आहे . 
 प्रकरण एक मध्ये लहुजी साळवे यांच्या खापर पणजोबा म्हणजे थोरले लहुजी यांना  छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्रविद्यात पारंगत असल्यामुळे 'राऊत ' ही पदवी जमीन देऊन सन्मानित केले. ही जमीन जनाईचा मळा या नावाने ओळखली जाते. 
 यशवंत साळवे हे थोरले लहुजी यांच्या चुलते होते .
 त्यांनी पेशवे काळात शौर्य गाजवले . यशवंत साळवेचे लहान बंधू राघोजी यांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पराक्रम गाजवला व पराक्रमी वीर म्हणून नावारूपाला आले .
दुसऱ्या बाजीरावाने राघोजीवर शिकारखान्यात असलेल्या प्राण्यांची देखरेख व युद्ध सामग्रीचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती .
  राघोजी साळवे , लहुजी साळवे यांचे वडील होते . राघोजी शूर व शस्त्रविद्या पारंगत होते अशाप्रकारे लहुजींच्या घराण्यावर 
डॉक्टर विठ्ठल भंडारे यांनी प्रकाश टाकला आहे . 

राघोजी साळवे यांनी आपल्याला अवगत असलेली शस्त्रविद्येचे प्रशिक्षण लहुजी साळवे यांना बालपणी द्यायला सुरुवात केली.
    पोटाने किल्ल्याची भिंत चढणे . दूरवर पोहोन जाणे. गनिमी कावा याचेही प्रशिक्षण राघोजींनी आपल्या मुलाला दिले. लहुजी साळवेचे धाडस व शस्त्र विद्येतील निपुणता बघून त्यांना पेशव्यांच्या सैन्यात भरती करून घेतले गेले.
 पेशवाईत पेशव्याकडून दलितावर होणारा अन्याय,  अत्याचार बघून लहुजी नोकरीत रमले नाहीत . त्यातच खडकीतील युद्धात दुसऱ्या बाजीरावाच्या पळपुट्या धोरणामुळे राघोजीसह, महार, मांग , रामोशी , आदिवासी समाजाचे अनेक सैनिक ठार झाले. त्यामुळे लहुजी व्यथित झाले व पेशव्यांच्या पराभवानंतर इंग्रजी अधिकाऱ्याच्या मस्तवालपणाला कंटाळून स्वाभिमानी लहुजींनी सैन्याची नोकरी सोडून दिली. 
इंग्रज व पेशवाईची अमानुषता बघून लहुजी बहुजन उद्धारक महात्मा फुले यांच्या सामाजिक चळवळीला पाठिंबा देऊन त्यात सक्रिय झाले .
   लहुजी साळवे गंज पेठेतील आपल्या घरासमोरील आखाड्यात तरुणांना शस्त्रविद्याचे प्रशिक्षण देत होते . इंग्रजांना पळवून लावण्यासाठी ते तरुणांची फौज तयार करीत होते.  महात्मा फुलेही लहुजी कडून प्रशिक्षण घेत होते . हे दोघे गुरु शिष्य  मिळून इंग्रज व पेशवाईच्या गुलामगिरीतून शूद्राची सुटका कशी करता येईल , यावर विचार मंथन करीत असत .  स्त्रिया व  दलितांच्या शोषणाला त्यांचं अज्ञान कारणीभूत आहे . हे लक्षात घेऊन, 
हा समाज शिक्षित करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले यांनी 14 जानेवारी 1848 रोजी पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली . 
या कार्यात लहुजींचा सक्रिय सहभाग होता . महात्मा फुले यांना होणाऱ्या समाजकंटकांच्या त्रासापासून माय सावित्रीचे व महात्मा फुले यांचे रक्षण करण्याबरोबरच लहुजीं दलितांच्या घरी जाऊन मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन प्रबोधन करीत .  त्यांना तयार करून मुले मुलांना शाळेत आणून सोडायला सांगत . 
   या कार्याची   सुरुवात लहुजींनी आपल्या घरापासूनच केली. मुक्ता साळवे आपल्या पुतणीला त्यांनी ज्योतिरावांच्या
शाळेत प्रवेश दिला . मुक्ता साळवे ही महात्मा फुले यांच्या शाळेची पहिली विद्यार्थ्यांनी होती . तिने वयाच्या चौदाव्या वर्षी  
 महारमांगाच्या दुःखाचा निबंध निबंध लिहून दलितांच्या दुःखाला वाचा फोडली. 
 या ग्रंथात अनेक महत्त्वाच्या नोंदीसह लहुजी साळवे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा विठ्ठल भंडारे यांनी घेतला आहे.

साळवे घराण्याची तोंड ओळख .
समाज क्रांतीच्या चळवळीतील लहुजी साळवे यांचे योगदान.
 लहुजी साळवे: महात्मा फुले यांचे गुरु .
समाज सुधारक लहुजी साळवे यांची वैचारिक दिशा.
लहुजी साळवे इतिहास पासून उपेक्षित का ?
इत्यादी प्रकरणातून  लहुजी साळवेंच्या जीवन कार्यावर डॉक्टर विठ्ठल भंडारे यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे . 
    लहुजी साळवे यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने ग्रंथाचे लेखन केलेल आहे असं लेखक विठ्ठल भंडारे आणि आपल्या मनोगतात स्पष्ट केलं आहे.
 इतिहास संशोधक व इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी हा ग्रंथ महत्वपूर्ण आहे .
 डॉ.प्रल्हाद लुलेकर यांची पाठराखण या ग्रंथाची पाठराखण केली आहे. 
डॉक्टर विठ्ठल भंडारे यांच्याकडून असंच महत्त्वपूर्ण लिखाण होत राहो !! पुढील लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा.


@छाया बेले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .