रातंदिन असे | पुस्तक परिचय
विद्रोहाची विवेकी मांडणी करणारी कविता !!
कविता जेव्हा कवीचा श्वास आणि ध्यास असते तिलाच अस्सल कविता म्हणता येईल कारण ती कवीच्या जगण्याचा त्याच्या अस्तित्वाचा गाभा असते . मग ती कविता कवीची जीवनसंगिनी होते , ती त्याला जगवते, तगवते, आधार देते.
जीवनातले दुःख आणि संघर्ष ही कवितेच्या जन्माची पूर्व अट असते . मग ते उगवून आणणारी परिस्थिती वेगळी असू शकते मात्र त्याच्यात मुळाशी शोषण दमणकारी व्यवस्था कारणीभूत असते . त्याच भूमीत विद्रोह क्रांती जन्माला येते. तिथेच अस्सल साहित्य निर्माण होते.
याच भूमीत उगवून आलेली कविता डॉ मारोती कसाब यांचा रात्रंदिन असे हा कविता संग्रह होय !!
ज्यांची ज्यांची या व्यवस्थेकडून छळवणूक झाली त्या सर्वांना बुद्ध जवळचा वाटतो. कारण माणसाकडून माणसाच्या होणाऱ्या शोषणाला बुद्धानेच पहिला नकार दिला . माणसाची जात माणसाचा धर्म केवळ माणूस हाच आहे हे सर्वप्रथम बुद्धानेच जगाला सांगितले.
तोच बुद्धविचारांचा झरा समता, न्याय, सत्याच्या बाजूने उभ्या असलेल्या समूहाच्या विचारातून वाहत आहे.
अशा या मार्गदात्या बुद्धावर या संग्रहातील पहिलाच अभंग पहायला मिळतो .
बुद्ध मार्गदाता / बुद्ध ज्ञान दाता /
खरा मुक्तिदाता / बुद्ध माझा //
पंचशील तत्व /जगाचे तारण
करा आचरण / मनोभावे //
जिथे जिथे मानवाच्या कल्याणाचा विचार आहे तिथे बुद्ध आहे जिथे माणसाशी माणूस जोडण्याचा विचार असेल तिथे बुद्ध आहे. जिथे मांगल्याचा विचार असेल तिथे बुद्ध आहे . मग तो विठोबाच्या रूपात असो की , बसवण्यच्या रूपात असो .
सम्यक दृष्टीने /पाही सर्वाकडे
खोट्याशी वाकडे/ विठोबाचे //
निशस्त्र तो उभा / उगे अठ्ठावीस
होई कासावीस / सदिनांसाठी//
बुद्ध आणि विठोबात जगाकडे पाहण्याची सम्यक दृष्टी आहे.
दीनांचा कळवळा आहे. म्हणून तरी हे दोघेही दीन दलित शोषित जनाला आपले वाटतात. म्हणूनच मैलोन मैलाचे अंतर पार करून वारकरी समुदाय आपल्या विठू माऊलीच्या दर्शनाला जातात. एकरूप होऊन त्याच्या पायरीशी गोळा होतात. त्याच्या पायरीजवळ जात धर्मपंथ लिंग सगळेच भेद नष्ट होतात.
विठोबाला म्हणूनच वारकरी विठू माऊली म्हणून हाक मारतात. विठोबा सर्वांना समतेच्या ममतेच्या धाग्यात बांधून घेतो. बाकी सर्व सांसारिक , सामाजिक बंधनातून मुक्त करतो . हा विठोबा सगळ्यांना आपला वाटला नाही तरच नवल !! मुक्ती हा स्वातंत्र्य हा माणसाचाच नाही तर प्रत्येक जीवाच्या जगण्याचा मुळ अधिकार आहे.
मानव हा मुक्तीसाठीच आसुसलेला असतो ती जिथे मिळेल तिथे तो धाव घेत असतो . सर्व महामानवांनी , संतांनी मानवाच्या मुक्तीसाठी कार्य केलं . माणसाने कैद केलेल्या माणसांना बंधमुक्त करण्यासाठी झटत राहिले . त्यांचा विचारवाटेरून वाटचाल करणाऱ्यांनीही मानवाच्या मुक्तीसाठी खारीचा वाटा उचलणे अपेक्षित आहे.
हा मुक्तीचा विचारच कवीने या संग्रहातून मांडला आहे .
परिवर्तनाची प्रतिक्रांतीची वाट चालताना बसवण्णाला सोबत घेतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नाही. बसवण्णाच्या वरही या संग्रहात सुंदर अभंग आहे.
जात विध्वंसक
विटाळ निर्मूलक
भेद निवारक
बसवण्णा //
अशा ओळींमधून महात्मा बसवण्याच्या व त्यांच्या कार्याची महती उजागर केली आहे
विवेकी, सत्यनिष्ठ माणसाला तुकोबा व्यापून राहिलेला असतो. तुकोबा नावाचा उजेड सोबतीला घेतलेल्यांपासून अंधार हाताचं अंतर राखून असतो .
तुकोबा मानवी जीवनाचा सार सांगतो. नाठाळाच्या माथी काठी हाणतो. विवेक जागा करतो. म्हणून कवी तुकोबाला सदैव स्मरणात ठेवण्याचं आवाहन करतो .
तेजाळता तारा
दीनांच्या दातारा
नित्य अनुसरा
तुकाराम //
तुका ध्यानी धरा
तुका मनी धरा
रात्रंदिन स्मरा
तुकाराम //
तुकोबांवर माय मराठीचा सगळं शब्द धन उधळले तरीही ते कमीच आहे. या संग्रहात तुकोबावर सलग दोन अभंग आले आहेत.
तुका तुझी गाथा या अभंगात तुकोबाचे संपूर्ण जीवन चित्रित केला आहे.
पेटवली तुवा
ज्ञानाची ही धुनी
माया इंद्रायणी
शहारली //
तुझीया गाथेने
सत्य सांगितले
गुपित फोडले
वेदांताचे //
सत्याचा मार्ग सोपा कधीच नसतो . त्यात सगळंच स्वाहा करावं लागतं . एकीकडे सगळी सुखं, दुसरीकडे सत्य .
निवड करण्याची मोकळीक तेवढी आपल्याला असते. तुकोबांनी धनसंपत्ती, मुलं बाळ , पत्नी सुखाचा संसार , एवढंच नाही तर स्वतःचा प्राण एवढी किंमत मोजून सत्य निवडलं .
तुकाराम महाराज या सत्याच्या काटेरी वाटेवरून चालत राहिले. दीनदुबळ्याच्या जीवनातला अंधार हटविला. त्यांना सत्य सांगितलं. म्हणूनच व्यवस्थेला तुकोबा पचनी पडले नाहीत. व्यवस्थेने तुकोबांना संपवले मात्र त्यांचे विचार शेकडो वर्ष लोटली तरीही किरणांचा देह धारण करून अंधारात चाचपडणाऱ्यांना वाट दाखवीत आहेत .
तुकोबांचा छळत करणाऱ्यांना कवीने या अभंगात धारेवर धरले आहे तुकोबांच्या मारेकऱ्यांना थेट यमाच्या हवाली करण्याची भाषा डॉ मारोती कसाब या अभंगातून करतात.
लहुजी लढले
या अभंगात आद्य क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे . डॉ मारोती कसाब यांचा अभंगावर हातात खंडा जास्त आहे सगळेच अभंग प्रभावी झालेले दिसून येतात . महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज , डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे यांच्यावरील महत्त्वपूर्ण अभंग या संग्रहात वाचायला मिळतात .
कवितासंग्रहाचे शीर्षक ' रात्रंदिन असे ' ज्या अभंगारून दिले आहे त्या अभंगात पुन्हा एकदा तुकोबा भेटतात .
डॉ मारोती कसाब हे विद्यार्थी दशी पासून परिवर्तनाच्या वाटेवरील प्रवासी आहेत . त्यांनी अनेक संघटनांच्या माध्यमातून चळवळीत सक्रिय योगदान दिले आहे . व अजूनही देत आहेत .
माणूस ज्या भूमीतून आला आहे तिथला भोवताल त्याच्या शब्दातून उतरून येतोच येतो . ती भूमी जर संघर्षाची असेल तर शब्द शब्द ठिणगी होईल यात शंका नाही. ' रातं दिस असे ' हा संग्रहही असाच आहे त्यातला प्रत्येक शब्द ठिणगी प्रसवतो.
देवळात देव
नाहीच उरला
कुठे तो खपला
सांगा मला //
देवाच्या देखत
होतो अत्याचार
तरी गप्पगार
देवबाप्पा //
देवाचा फायदा
फक्त पुजाऱ्याला
चोर निवाऱ्याला
गाभाऱ्यात //
या ओळी ठीणग्यांचा प्रत्यय देणाऱ्या आहेत. समाजातील दंभाला पकडून सापाचं तोंड ठेचावं तसं ठेचून काढतात .
बदलला जरी वर्ग माझा, जात तीच राहिली
जगताना आजही माझ्या जीवाची थांबली ना काहीली
या भारतीय समाजातील जात वास्तवाची काहिली मांडतात. ही काहिली तोच समजू शकतो ज्याचं आयुष्य जात नावाच्या आरावर होरपळंत आलं आहे .
जात नष्ट करण्यासाठी , माणसाशी माणूस जोडण्यासाठी , बुद्धापासून अनेक महात्म्यांनी संतांनी प्रयत्न केले. मात्र जात काही जात नाही. ती कातडीपेक्षाही घट्ट चिटकून आहे. जात नष्ट करायची तर ही कातडी सोलवटून घ्यावी लागेल किमान जातीचे चटके सोसणाऱ्यांनी तरी. जातीचे तुरुंग तोडण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल . नाही तर ही जात आपल्या सुळ्यांनी पिढी दर पिढी माणसाचं रक्त शोषण करीत आली आहे तशीच पुढेही करीत राहणार .
चला चाल करूया ही कविता लढण्याचं आवाहन करणारी. बळ देणारी , झोपलेल्या समाजाला जागे करणारी आहे.ही विद्रोही कविता नामदेव ढसाळ यांच्या शब्दांची नातं सांगणारी आहे .
कवितेतला प्रियकर या कवितेतून प्रेमाचे दुखरे भाव व्यक्त होताना दिसतात .
पण असं का होतं. प्रेमाला समजून घेण्यात , प्रेमाची व्याख्या करण्यात कुठेतरी गल्लत होते आहे का हे तपासून पाहणे आवश्यक आहे . प्रेमात जपणूक,काळजी,सन्मान तो/ती, सुखी असावं अशी एकमेकांच्या शुभाची कामना असणं हा नात्याचा पाया आहे.
हल्ली ज्याला प्रेम हे नाव दिलं जातंय ते खरोखरच प्रेम आहे का ? मग प्रेमात हे दुःख कुठून येतं ?
गौतम बुद्ध म्हणतात, माणसाच्या इच्छा अपेक्षा हेच त्याच्या दुःखाचं कारण आहे . मग माणसाने प्रेमाच्या मुळाशी हेच आणून पेरले आहे का ? म्हणून तर त्यातून दुःखाचे रोप उगवून आले आहे . आज आजूबाजूला सगळीकडे पाहता प्रेम हा शब्द उच्चारायला सुद्धा भीती वाटावी अशा भयावह गोष्टी घडत आहेत.
अगदी जीव घेण्यापर्यंत. प्रेमात
प्रेम हे इच्छा -अपेक्षा , देणं -घेणं , यापासून मुक्त असायला हवं ही एक जागा व्यवहराच्या चिखलापासून स्वच्छ राखायला हवी .
प्रेम कबिराचे दोहे , तुकोबाची गाथा, प्रेम सुखाचं पसायदान ठरायला हवं . पण तसं न होता ते त्रासदायक ठरत आहे.
खरं तर इथेच काही तरी चुकत आहे म्हणूनच आजकाल नाती , मानवी संबंध एवढे टॉक्सिक होत चालले आहेत.
भावनिक जिव्हाळा हरवून तिथे व्यवहार आल्यामुळे नाती ओस पडत चालली आहेत .
प्रेमाला या कोतेपणापासून वाचवून ठेवायला हवे.
नातं कोणतंही असो अटी शर्ती शिवाय जे असतं तेच प्रेम असतं बाकी सगळी दुनियादारीच !!
दुनियादारीला प्रेमाचं नाव देऊन प्रेम या उदात्त भावनेला व्यवहाराएवढं छोट न करणं ही जबाबदारी संपूर्ण मानवसमुहाची आहे. प्रेमाचं तत्व माणसाठायी उतरायला हवं . प्रेमाशिवाय माणसाचं जीवन वाळवंट होईल.
डॉ. मारोती कसाब यांनी रातंदिन असे या कविता संग्रहात कामगार, कष्टकरी, शेतकरी, तसेच स्त्री प्रश्न सध्याचा असुरक्षित वर्तमान, अशा सगळ्याच विषयाची मांडणी जिव्हाळ्याने , कळवळ्याने केली आहे . अनेक सामाजिक विषय शब्द शब्द लावा होवून उतरले आहेत. समाजाला दिशा देणारा मार्ग दाखवणारा, विद्रोही विचारांची
विवेकी मांडणी करणारी ही कविता आहे. या संग्रहात हळव्या तरल भावनेच्या अनेक कविताही वाचायला मिळतात .
हा संग्रह हाती येऊन बरेच दिवस झाले मात्र व्यापामुळे अभिप्राय देण्यास उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते .
पुढील लिखाणासाठी डॉ मारोती कसाब यांना आभाळभर शुभेच्छा देऊन थांबते .
@छाया बेले
अत्यंत सुंदर, न्यायोचित मांडणी... मनःपूर्वक आभार..!
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा