दिपक बोरगावे यांच्या कवितेचे रसग्रहण!!
|| कुठे आहेस तू? ||
अगणित उगवलेल्या
कोवळ्या
रोपटांचा कारवॉं
झाडे वृक्ष अरण्ये
म्हणजे
मानवी संस्कृतीपूर्व
अनाकलनीय
शक्तीचा स्त्रोत
नदी
म्हणजे
प्राणी आणि माणसांची
वाट पाहत राहिलेली प्रवाहिनी
अनादी कालापासून
कृमीकीटकांचा
आपापल्या मित्र-मैत्रिणींशी
झालेला संवाद
म्हणजे
भाषेची सुरुवात.
शेत
म्हणजे
माणसाच्या संस्कृतीचे
युद्ध.
घरे रस्ते नगर
म्हणजे
माणसांच्या नात्यांची
अनागोंदी
साप
म्हणजे
माणसाच्या
मनाचा तळ
थांब. थांब.
कुठे आहेस तू?
कुठलाच
आणि
कोणाचाच पत्ता सापडत नाहीये
म्हणून
हे असे काहीबाही लिहीत बसलो आहे मी.
-दीपक बोरगावे
०-०-०
उत्क्रांतीच्या प्रवासात माणसाने लावलेला सगळ्यात महत्वाचा शोध म्हणजे भाषा . अक्षरभाषा कवींसाठी तर वरदान ठरली. भाषा नसती तर कवीच्या आतल्या जाणिवांची उत्कटता अव्यक्त राहिली असती .
'जे न देखे रवी ते देखे कवी ' असा आत्मगौरव कवीने कसा व्यक्त केला असता ? शव हे कविचे जाळू नका हो / जन्मभरी तो जळतच होता ' शब्दांशिवाय त्याच्या दुःखाची गहराई त्याने कशी व्यक्त केली असती ? 'मुझसे बुरा न कोय ' असं म्हणत लोकांना आपल्या आत डोकावून पहायला भाग पाडणे कदाचित शक्य झाले नसते.
कवी, आपल्या कवितेतून स्वतःशी , जगाशी भूत, भविष्य, वर्तमान या सगळ्यांशी संवादत राहतो . असाच संवाद उत्क्रांतीच्या प्रवासात कुठेतरी हरवलेल्या माणसाशी ' कुठे आहेस तू ? ' या कवितेत डॉ. दिपक बोरगावे साधताना दिसतात .
माणूस कधीकाळी इतर सजीवांसारखाच निसर्गाचा एक भाग होता . त्याच्या तल्लख मेंदूतून निर्माण होत गेलेल्या प्रश्नांनी व त्यावर त्याने शोधलेल्या उत्तरांनी आजचे आधुनिक युग निर्माण केले. माणसाचा हा प्रवास थक्क करणारा नक्कीच आहे . तरीही मनात एक प्रश्न येत राहतो . माणूस एवढा उत्क्रांत नसता झाला तर चाललं नसतं का ? माणसाची ही वाटचाल प्रगतीकडे आहे की अधोगतीकडे हेही कोडं न सोडवता येण्यासारखं. मित्र मैत्रिणींचा आपसातील संवाद ही भाषेची सुरुवात होती तर शेत हे माणसाच्या संस्कृतीचे युद्ध होय .घरं , रस्ते , नगर हे माणसांच्या नात्याची अनागोंदी कवीने घेतलेली नोंद महत्त्वाची आहे . माणसाने जेवढा पसारा वाढवत नेला तेवढा तो आतल्या शांतीला मुकला . त्याचं नैसर्गिकपण हरवलं . मनाचे तळ विखारी होत गेले तर धावणे ही त्यांची अपरिहार्यता झाली . थांबणे त्याच्या हाती राहिलेले नाही . तरीही कवी थांब थांब म्हणून साद घालतो आहे . काही बाही लिहितो आहे.
कदाचित माणूस भानावर येईल या आशेने .
शेवटी तो जागल्या आहे या समाजाचा . त्याला त्याचे काम करावेच लागणार ही सुद्धा अपरिहार्यताच !!
@छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा