‘पारबता’ विरूध्द नियतीने मांडलेला खेळ - भीमराव रायभोळे, मुंबई

   ‘पारबता’ विरूध्द नियतीने मांडलेला खेळ !!


यशोदीप पब्लिकेशन (पुणे) यांनी प्रकाशित केलेली ‘छाया बेले’ या लेखिकेची ‘पारबता’ नावाची कादंबरी वाचली. ही कादंबरी स्त्री शोषणावर आधारित असून या कादंबरीला वास्तवाचा पदर असल्याचे जाणवते. छाया बेले यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. (कादंबरीचं शेवटचं पान पहा), त्यामुळे माझ्यासारख्या नवख्या लेखकाने या कादंबरीवर भाष्य करावं हे जरी मला पटलं नाही, तरीही लिहिल्यावाचुन राहावलंदेखील नाही !
लेखिकेची लिहिण्याची शैली, सुख-दु:खाचे प्रसंग रेखाटण्याचं कसब, कथानक योग्य मार्गाने पुढे जाईल याची घेतलेली काळजी, प्रसंगानुरूप ग्रामीण म्हणींचा केलेला वापर आणि त्या परिसरातील त्यांनी वापरलेली ग्रामीण भाषा ह्या कादंबरीची खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच ही कादंबरी दर्जेदार नि वाचनीय झाली आहे. ह्या कादंबरीचं कथानक उदगीर-लातूर भागात घडल्याचं जाणवतं. ‘पारबता’ ह्या कादंबरीतील नायिकेने लेखिकेच्या काळजात खोल जखम केल्याचं जाणवतं. त्यामुळे नायिकेने जरी प्रत्यक्षात हालअपेष्टा, यातना भोगल्या, नि शेवटी त्यामुळेच तिने अखेरचा श्वास घेतला. तिचं दु:ख आणि वेदना लेखिकेला सतत छळतात, म्हणूनच की काय लेखिका म्हणते, “तुमच्या भोवतालच्या पारबताला जगण्याचे बळ द्याल. तिच्या वाट्याला कादंबरीतील पारबताचं दु:ख येणार येणार नाही अशी काळजी प्रत्येकाने घ्यावी.” 
खरं तर पारबतानं जे दु:ख भोगलं त्याला इथली स्त्रीचं शोषण करणारी समाज व्यवस्था कारणीभूत आहे. कालानुरूप यात काहीअंशी बदल झाला असला, तरी इथल्या पुरूषसत्ताक समाजाची आजही तीच मानसिकता आहे. ग्रामीण भागात ही मानसिकता मोठ्या प्रमाणात आजही टिकून आहे. आजही कित्येक पारबता मानसिक छळाला सामोरं जावून जीवघेणं जीवन जगत आहेत. अशी उदाहरणे आहेत की सासरच्या जाचाला कंटाळून त्यांनी आयुष्य संपविलं आहे. मुलगी दहा-बारा वर्षाची झाली की, एकदाचं तिचं लग्न करून मोकळं व्हायचं, हा येथील व्यवस्थेचा भाग आहे, मग तिच्यासाठी निवडलेलं स्थळ योग्य आहे की अयोग्य, नवरा तिच्या वयाचा आहे की, आरदपराया आहे, शिक्षित आहे की अडाणी आहे, ही व्यवस्था पाहात नाही. हेच पारबताच्या बाबतीत घडलं आहे. लग्नाच्या नंतर ती माय-बापाच्या कुटुंबाचा भाग नाही म्हणून जो काही तिला त्रास होत आहे, तिचं दु:ख आहे ते तिनेच भोगलं पाहिजे ही आईवडिलांची मानसिकता तर आहेच, तिच्या प्रति त्यांची उदासिनता देखील आहे, कारण ते देखील या व्यवस्थेचे घटक आहेत. नायिकेचे आई-वडील किंवा भाऊ दोन दोन वर्ष पाहण्यास येत नाहीत अशी त्यांच्याकडे ती खंत व्यक्त करते. तिच्यामागे तिला पाठबळ देणारे कोणी नाही हे सासरी समजलं की ते तिचा छळ करणारच ! पारबताच्या वडिलांना कोणी स्थळ सुचवतं आणि त्याची शहानिशा न करताच तिचं वय परिपक्व नसूनही त्यांनी तिचं लग्न केलं. मग तिच्या वाट्याला आलं ते जीवघेणं जीवन. सासरमध्ये- घरात आणि शेतात गुलामाप्रमाणे राबराब वागूनही क्षुल्ल्क कारणासाठी नवरा आणि सासरा तिच्यावर अमानुष अत्याचार करतात. स्त्रीच्या वाट्याला मानहानी, शिवीगाळ, यातना येतात त्याचं दुसरं कारण आहे स्त्रीयांना मुलगा न होणं. हेच पारबताच्या जीवघेण्या दु:खाचं अजून एक आणि मुख्य कारण आहे. आणि ती ही मानहानी मुकाट्याने सहन करते, हे देखील पारबताच्या दु:खाला कारणीभूत आहे असे वाटते. जिला मुलगा झाला त्या स्त्रीला जो मान मिळतो . तोच सुंदर, चारित्र्यवान, सोसीक पारबताला मिळत नाही, कारण तिने मुलीला जन्म दिलेला असतो. “पोरगं झालं असतं तर गेलो असतो बगायला, पोरगी झाल्याय, तिला काय बघायला जावं ?” सासऱ्याचं हे म्हणणं बाळंतीन पारबताच्या काळजाला छिद्र पाडतं. पारबताला घर, नवरा, सासरा, जनावरे आणि शेत हे सर्व आपलं वाटतं. आपल्या माघारी घराचं, जनावरांचं, नवऱ्याचं नि सासऱ्याचं काय होईल या काळजीने ती माहेरी राहणं पसंत करीत नाही, मात्र सासरा किंवा नवरा यांच्यासाठी असते ती केवळ मन नसलेलं-राबणारं यंत्र. पायात चप्पल नाही, हातात काकनं नाहीत किंवा अंगावर चांगल लुगडं नाही. यापेक्षा अजून तिची काय दैना असावी ? नवरा रक्तपितीमुळे जर्जर असतानादेखील ती त्याला नाकारत नाही, तर त्याचा इलाज करण्यासाठी धडपडते ह्याला तर तोड नाही. त्याला सोडून स्वतंत्र जीवन जगावं असं तिच्या मनाला शिवत नाही. ती त्याला दुरूस्त करते, आणि तो कृतघ्नतेने तिला न सांगता दुसरी बाई घरात घेऊन येते. पारबताने तिने जे दु:ख भोगलं, यातना, अत्याचार, मानहानी कुरकुर न करता, आपल्या आईवडिलांना न सांगता सहन केली त्याला सीमा नाही, शेवटी हा ही प्रश्न उरतो की तिने एवढ्या हालअपेष्ठा का सहन केल्या. मारोती कसाब यांनी लिहिल्याप्रमाणे मलाही असं वाटतं की, पारबताचा अतिसोशिकपणा देखील तिच्या दु:खाला कारणीभूत ठरला. माणूस एवढा सोशिक का असावा हे मात्र पारबताच सांगू शकली असती. खरं पाहिलं तर पारबताचा हा जीवनसंघर्ष नव्हताच नियतीने तिच्याविरोधात मांडलेला खेळ होता ! पारबताचे दु:ख हे जरी प्रातिनिधिक असलं, तरी या कादंबरीच्या निमित्ताने लेखिका छाया बेले यांनी समस्त स्त्री जातीचे प्रश्‌न आणि दु:ख उजागर केले आहेत, अतिसोसिकपणा किंवा अतिविद्राहीपणा टाळून जणू मध्यम मार्ग चालण्याचा त्यांनी या कादंबरीद्वारे संदेश दिला आहे. वाचक नक्कीच या कादंबरीचे स्वागत करतील. समाजातील वाईट रुढी, परंपरा, येथील वंचितांचे, शोशिकांचे प्रश्नावर त्या यापुढे लिहित राहतील असी आशा बाळगतो !

भीमराव रायभोळे , मुंबई 

पारबता - कादंबरी 
लेखिका - छाया बेले 
प्रकाशन - यशोदीप पब्लिकेशन्स, पुणे.
पृष्ठे -२४०
किंमत -₹३५०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .