कवयित्री अरुणा दिवेगावकर यांचा पारबतावरील अभिप्राय!!


एका बैठकीत पारबता वाचून संपली. आमच्या आया -आज्जी - काकी- मामी - मावशीची ही कहाणी. छाया तू पारबताची कथा अस्सल बोली भाषेत सांगताना भाषेची लय कुठे बिघडू दिली नाहीस. पारबताची गोष्ट मनाला भिडत जाते. वाचताना समोर दृश्य दिसत रहातात . चलचित्र पाहिल्या सारखे! 
जातपितृसत्ताकतेच्या उतरंडीत स्त्री नेहमीच तळाला राहिली आहे . त्यात ती स्त्री सोशिक असेल तर तिचे हाल कुत्रेही खात नाहीत . हे वारंवार प्रत्ययास येते . पारबता त्या स्त्रियांचे प्रतिनिधित्व करते. 
मला इतक्यात लग्न करायचे नाही हे ती माहेरी जन्मदात्यांना सांगू शकत ना माझ्याने अशी कष्टाची कामे होणार नाहीत हे सासरी स्वतःच्या हक्काच्या नवर्‍याला सांगू शकत . सतत स्वतःला सिद्ध करण्यासाठी उरफुटेस्तोवर धावणे ही जणू सटवाईने लिहीलेली रेखाच! त्यात वंशाचा दिवा दिला नाही ही बोचरी सल आयुष्यभर काट्यासारखी संपूर्ण अस्तित्वाला पोखरत लावायला लावणारा भवताल . स्त्रियांचा जन्म चूल आणि मूल यासाठीच ही समाजव्यवस्थेने घालून दिलेली चौकट अजूनही भक्कम उभी आहे. शिकल्या सवरलेल्या स्त्रिया या चौकटीवर धडका देत आहेत , अजून ही चौकट मोडायला तयार नाही. 
पारबता सारख्या बायांमधे तीही ताकद नव्हती. पारबता शिकलेली असली तरी ती कुठलंच बंड करु शकली नाही कारण परिस्थिती फास अशा पद्धतीने तिच्या भोवती आवळत गेला की हातपाय सोडा मनालाही हलायला जागा नव्हती.  
या पितृसत्ताक समाजात स्त्री देखील स्त्रीची शत्रू म्हणूनच उभी असते हे तू कोंडाच्या पात्रातून दाखवून दिलेस. हे पात्र म्हणजे पुरुषी व्यवस्थेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी दुसर्‍या स्त्रीच्या अस्तित्वाला संपवायला देखील मागेपुढे न पाहणारे प्यादेच आहे.
 छाया तुझ्या लेखणीने साकारलेली पारबता वाचणार्‍यांच्या मनाची पकड घेत आहे. हे सगळे असले तरी काहीतरी निसटलं आहे हे वाटलं . सावू हे पात्र बालपण वगळता फारच त्रोटकपणे समोर येते. तिच्या शिक्षणाचा कुठेच उल्लेख नाही . दुसरे म्हणजे पारबताच्या नणंदा यांचाही यात उल्लेख फारच त्रोटक आहे त्यांची लग्न लवकर झाली असली तरी त्या माहेरपणाला येतच असतील ना ? त्यांच्या सोबतचे पारबताचे संबंध कसे होते ह्याचा कांदबरीभर एकदाही उल्लेख नाही. फक्त शेवटी तिची नणंद म्हणते की , ती आम्हाला आईसारखी होती.
हे वगळता कादंबरी वाचनीय झाली आहे . तुझे मनापासून अभिनंदन 🌸❤️

- अरुणा दिवेगावकर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .