मनघराच्या खिडकीतून / मनाच्या तळघरात घेऊन जाणारी कविता!!


मनाच्या तळघरात घेऊन जाणारी डॉ.रेषा यांची कविता !!

कविता ही आपल्या अस्तित्वाचं गाणं  असते. आपलाल्याच आपल्या असण्याची ग्वाही देते. कविता  अस्तित्वाला फुटलेला झरा असते.
अंतरातील खोलातून सगळंकाठी वाहून वर  घेऊन येते. 
डॉ. रेषा यांची अशीच जगण्याच्या तळातून वर आलेली सखोल अनुभूतीची सच्ची कविता आहे .
  ' मनघराच्या खिडकीतून '   हा कविता संग्रह मला भावलेल्या कविता संग्रहा पैकी एक आहे.
डॉ रेषा यांची कविता वाचकाला  मौनात घेऊन जाते. चिंतन करायला भाग पाडते.

लढते आहे सतत आत्मसन्मानासाठी 
हे युद्धही माझेच माझ्यासाठी आहे 
हेही माहीत आहे मला. 

युगा युगाचा हा लढा कशासाठी ,  कुणासाठी आहे हे कवयित्रीला ठाऊक आहे. हे माहित असणं सुद्धा किती मोलाचं असतं. अशी जाग ज्याला येते तेव्हा जगणं सोपं राहत नाही. तिथूनच खरी लढाई सुरू होते . 
विचारांची ही स्पष्टता  रेषा यांच्या कवितेत दिसून येते.

साऱ्या दिशा आंधळ्या का होतात?
आणि रस्ते अनाथ का होतात ?
स्थितप्रज्ञ माणसाविषयी कुणीच का बोलत नाही ?
साऱ्यांनी कान डोळे बंद केले का?
 साऱ्यांची वाचा गेली का ? 

 कोणत्याही माणसाला ज्याच्या आत कुठेतरी उजेड तेवत आहे त्याला हे प्रश्न पडणे सहाजिक आहे.  जे जीवनात अमुल्य आहे, उपयुक्त आहे . त्यावर फार कमी चर्चा केली जाते. जे निरर्थक आहे ते उचलून धरले जाते . जे निकृष्ट आहे त्याचे कौतुक सोहळे साजरे केले जातात . 
वरील प्रश्न कवयित्रीच्या घालमेल व्यक्त करतात सोबतच 
कवितेच्या प्रांजळपणाची साक्ष देणारेही आहेत.
तू असतास येथे तर 
विचारले असते तुला मी 
 'स्वातंत्र्य ,समता ,बंधुता , 
कोठे आहे जगात ?'

निर्मिकाला विचारलेला हा प्रश्न, विषमतेची गढी ध्वस्त करून समतेचा गाव उभारण्याची आस बाळगणारा आहे. मात्र अजूनही ही कवितेतील समतेची मुल्ये समाजात रुजलेली नाहीत . पुरुष सत्ताक व्यवस्थेने विषमतेची अशी मेख मारून ठेवली आहे की आजचा तथाकथित आधुनिक माणूस त्या मेखेच्या साखळीतून स्वतःची सोडवणूक करून निखळ माणूस व्हायला तयार होत नाही. सगळ्यांच्या हातात दिलेलं श्रेष्ठत्वाचं विषमिश्रीत  चॉकलेट फेकून द्यायला तयार नाही.  हजारो वर्षांच्या उतरंडीचं ओझं मोठ्या अभिमानाने वाहत आहे. एकाच्या पायाखाली  एक असताना ज्याच्या खाली काहीच नाही तो स्त्रीला हीन तुच्छ समजून ही श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या मेखेची जपणूक करतो . सीता, द्रोपदी, अहिल्या या स्त्रियांपासून होत आलेल्या अन्यायाची नेणिवेतून वाहत आलेली सल  व्यवस्थेला प्रश्न करते आहे. 

कष्टात मेंदू सुदृढ ठेवावा
स्वतःच स्वतःला सावरावं 

 जगण्याचं शहाणपण वरील ओळीतून व्यक्त होते . 

बागेतील सारी झाडे 
तुझी होती
त्यांचा आकार तुझा होता
 तू पृथ्वीची दिशा होतीस
आता मन घराच्या खिडकीतून 
पाहते मी तुझा व्हरांडा 
फुलांनी भरलेला 
अंगणातील झेंडूची फुले आणि 
माझी टुकटुक वाट पाहणारी  तू
तू दिशा होतीस पृथ्वीची..

 या शीर्षक  कवितेतून बाईच्या ,  आईच्या रोजच्या समग्र जगण्यातील एकरूपता. तिचं त्यात विरघळून जाणं दर्शवते. 
 ' माझी टुकटुक वाट पाहणारी तू ' ही ओळ आई आणि मुलगी यांच्यातल्या सर्वत्र व सर्वकालिक असा वैश्विक भाव दर्शवणारी एक सुंदर अशी ही कविता आहे आहे .

पूर्वी चंद्र होता
 सूर्य होता
 आणि मीही होते
 जल होते आणि जला जवळ माझी राहुटी 
चंद्र वळला की मीही कुस बदलायची 
त्याच्या डोळ्यात पहात 
सकाळ उजडायची
मग सूर्य कधी देव झाला 
कळलं नाही 
आज त्याला अर्ध्य देताना 
मी जाते अशी माझ्या 
आदीम काळात

या कवितेत कवयित्रीने निसर्ग व माणूस यांच्यातलं अद्वैत ते द्वैतापर्यंतचा प्रवास वर्णित केला आहे.  हे माणसाचं निसर्गापासून दुरावणं नक्कीच सुखावह नाही. निसर्गाच्या अंगा खांद्यावर खेळणाऱ्या माणसाने निसर्गापासून वेगळा होत,  त्याचा उपयोग आपल्या अमर्याद इच्छापूर्तीसाठी करायला सुरुवात केली, तेव्हापासून माणूस अंतरिक सुखाला, आनंदाला पारखा झाला. अपूर्ण झाला. 

असं असलं तरी माणसाच्या नेणिवेच्या  तळाशी निसर्ग व्यापून आहे. म्हणून तर संधी मिळेल तेव्हा माणूस निसर्गाच्या कुशीत जाण्याचा प्रयत्न करतो .  तिथेच  सुखाची अनुभूती मिळते. हेच माणसाचं निसर्ग असणं दर्शवते . डॉक्टर रेषा यांची कविता ही एकरूपता व अलिप्तता दोन्ही दर्शवते.

मानवी विकासाच्या या टप्प्यावर मानव व निसर्ग यांच्यातील दरी अजूनच वाढत आहे .
अगदी पन्नास वर्षे मागे गेलो तरी माणूस बराचसा निसर्गाशी एकरूप होता . तो त्याचे संकेत ओळखू शकत होता. निसर्गाची सांकेतिक भाषा समजू शकत होता . त्याच्या आफाट शक्ती पुढे नतमस्तक होत होता . तर कधी निसर्गाच्या लयीत आपल्या जगण्याची लय मिळविण्याचा प्रयत्न करीत होता.  आजूबाजूला लाल मखमली किडे दिसतात ती मृग जवळ आल्याची खूण आहे हे त्याला माहीत होते . बेडकांच्या ओरडण्यात पाऊस येणार हे समजू शकत होता. नदी ,वारा, पाऊस, सूर्य, ऋतू या सर्वांशी आपलं जगणं सुसंगत करून जगत होता.  निसर्गाच्या तालावर जीवनाचं नृत्य सुरू असायचं.   ते जरी आजच्या इतकं वेगवान नव्हतं , तरी सुखद नक्कीच होतं. ते आवश्यक असल्याची शहाणीव मानवाच्या अंगी होती. 

लाख प्रयत्न नंतरही 
मी  मिटली नाही 
काळ ठोसे मारत राहिला 
जन्मावर व मृत्यूवरही 
शब्द भाषा अस्तित्व यांना 
उपवासाने तोललं
कित्येक डोळ्यांनी निषेध केला

मनाच्या पालवीने 
 संहारावर विजय मिळविला
 जगाने दिलेल्या आहुतीतून
स्वयंपूर्ण अशी सृष्टी निर्माण झाली 
सौंदर्याला कुठे ग्रहण असते ?

जीवन असो की कविता दोन्हींतही जर ताकद असेल, तर ते संहाराच्या खेळानंतरही मागे उरते. काळाच्या वाळवंटी पृष्ठभागावरही फुलून येते. स्वतःवरचा व आपल्या कवितेवरचा दृढ विश्वास कवयित्री 'सौंदर्याला कुठे ग्रहण असते' या कवितेतून व्यक्त करते. हा विश्वास ही कविता सार्थ ठरवते .

जीवनाचा अध्याय नेहमीच खंडित असतो आपणच कळत नाही आपल्याला
जेथे विद्रोहाला फुले येतात 
आणि शरणागतीत असतो विध्वंस 
परोपकार पायदळी तुडविला जातो

डॉक्टर रेषा यांच्या अशा ओळींतून जीवनाचे सखोल चिंतन अधोरेखित होते.  प्रतिमा प्रतिकांनी अलंकृत तेवढीच आशय संपन्न कविता या संग्रहाच्या निमित्ताने वाचनात आली. बऱ्याच कविता  निःशब्द करतात. 
डॉक्टर रेषा यची कविता गहन आशय गर्भित व चिंतन करायला भाग पाडणारी आहे . वाचकाला आपल्या अस्तित्वाचा शोध घ्यायला प्रेरित करणारी आहे. रेषा यांच्या कवितेत स्थितप्रज्ञता दिसून येते. एक दर्जेदार कवितासंग्रह हाती आला याचा मनस्वी आनंद आहे. डॉक्टर रेषा यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा !!

@छाया बेले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .