भारतीय समाज व स्त्री जीवन | मराठी लेख

  भारतीय समाजात स्त्रीजीवन असेच का आहे?

     स्त्रीजीवन म्हणजे केवळ भूमिका पार पाडणे नाही , तर मनात साठत गेलेल्या भावना, न बोललेले प्रश्न आणि रोज स्वतःला सावरत पुढे चालण्याची एक अखंड यात्रा आहे. ती हसते, कारण इतरांना हसणं अपेक्षित असतं. ती सहन करते, कारण तिला लहानपणापासून शिकवले जातं की सहन करणारी स्त्री म्हणजे चांगली स्त्री.
 
     मुलगी म्हणून जन्माला येताना तिच्या वाट्याला खेळण्यांपेक्षा सूचना जास्त येतात. “हळू बोल”, “असं करू नकोस”, “लोक काय म्हणतील? या वाक्यांतूनच ती मोठी होत जाते. तिच्या डोळ्यांत स्वप्नं असतात, प्रश्न असतात; पण ती लवकर शिकते की सगळे प्रश्न विचारायचे नसतात. त्यामुळेच कदाचित ती इतरांपेक्षा लवकर समजूतदार होते.

    तरुणपण हा स्वतःला शोधण्याचा काळ ,
या वयात स्त्रीला स्वतःसाठी काहीतरी करायचं असतं. शिकायचं असतं, उभं राहायचं असतं, स्वतःची ओळख बनवायची असते. पण याच काळात तिच्या आयुष्याबाबत निर्णय घ्यायची घाई सुरू होते. लग्न, संसार, जबाबदाऱ्या ,हे शब्द तिच्या स्वप्नांवर पाणी टाकतात. तरीही ती प्रयत्न करत राहते कधी शांतपणे, कधी मनात लढत, तर कधी आतल्या आत कुढत. बालपण संपता संपता , जीवन नेमकं काय आहे हे कळायच्या आतच तरूणपणात पाय ठेवताच तिला लग्नाच्या बेडीत अडकवले जाते. मग सांसारिक जबाबदाऱ्या येतात. 
मग संसारात स्वतःला बाजूला ठेवून नात्यांना प्राथमिकता देणं आलं.
लग्नानंतर स्त्री अनेक नात्यांत गुंतते. पत्नी म्हणून जोडिदाराला  समजून घेणं, सून म्हणून सासू सासरे यांच्याशी 
जुळवून घेणं, आईपणात स्वतःला विसरणं, हे सगळं ती नवरा मुले यांच्यावरील प्रेमापोटी तर कधी जबाबदारी म्हणून करत जाते. पण हे सगळं करत असताना ती आतून थकत जाते.
घर चालतं, नाती टिकतात, पण तिच्या थकव्याला शब्द मिळत नाहीत. रात्री शांततेत ती कधी स्वतःला विचारतही नाही की 
“आज मी स्वतःसाठी काय केलं?”

  बाईच्या जीवनात येणारा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व !! 
मातृत्व प्रेमासोबत येणारी अस्वस्थताही घेऊन येतं. यावर कधी बोलले जात नाही मात्र हे वास्तव आहे 
मातृत्व हा अनुभव अतिशय सुंदर असतो, पण तो पूर्णपणे सोपा नसतो. बाळासाठी सगळं करताना स्त्री स्वतःला मागे ठेवते. आनंदासोबत चिंता, प्रेमासोबत भीती आणि जबाबदारीसोबत अतिप्रमाणात मानसिक  श्रमला सामोरं जावं लागतं. बाळाची काळजी घेण्यात जरा कुठे कमी पडलो असं वाटताच मनात अपराधीपणाचा भाव दाटून येतो.
या सगळ्यातून ती  स्वतःच स्वतःला सावरते, सगळं पेलत राहते . कारण तिच्याकडून जराही कसूर न होणे अपेक्षित असते. 

 आजच्या स्त्रीचं जीवन बदललेलं  वाटतं असलं तरी तिचा संघर्ष संपलेला नाही.
आजची स्त्री बोलते, लिहिते, प्रश्न विचारते. ती शिकते, कमावते, निर्णय घेते. पण तिच्या वाट्याला येणारा मानसिक ताण कमी झालेला नाही. घर आणि काम यांचा तोल, सुरक्षिततेची चिंता, सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज हे सगळं अजूनही तिच्यासोबत आहे. फरक इतकाच की आता ती शांत राहात नाही. कारण शिक्षणामुळे ती जागृत झाली आहे. ती आज आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे. त्यामुळे ती तिच्या आत्मसन्मानवरचे वार सहन करीत नाही. 
मलाही माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे ती आपल्या कृतीतून दाखवून देत आहे. 
 असं असलं तरी सुद्धा 
स्त्री जीवन म्हणजे तारेवरची कसरत होती आणि आजही आहे. तरीही  दररोज स्वतःला सावरत जगण्याचं  धैर्य उपजतच तिच्या अंगी  आहे. तिच्या शांतपणामागे सहनशक्ती आहे. आणि तिच्या मृदूपणामागे तिची अपार शक्ती आहे.  तिला फक्त त्यागाची मूर्ती न बनवता, तिच्या भावनांसह, स्वप्नांसह, तिच्या मर्यादासह तिच्याकडे 
एक पूर्ण माणूस म्हणून पाहिलं गेलं.तरच समाज खर्‍या अर्थाने पुढे जाईल.

@छाया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .