महिला घरगुती हिंसाचार का सहन करतात?
महिला घरगुती हिंसा का सहन करतात?
साधारणपणे घरगुती हिंसाचार म्हणजे केवळ मारहाण किंवा शारीरिक हिंसा असं समजलं जातं.
मात्र ही केवळ मारहाणीपुरती मर्यादित गोष्ट नाही. ती अनेकदा शब्दांमधून, नजरेतून, मौनातून आणि नियंत्रणातून व्यक्त होत असते. अपमान, संशय, धमक्या, आर्थिक कोंडी, लैंगिक जबरदस्ती आणि सततचा मानसिक ताण
या सगळ्यांची बेरीज म्हणजे घरगुती हिंसा.
अशा परिस्थितीत बाहेरचा समाज वारंवार एकच प्रश्न विचारतो
“इतका त्रास असूनही ती बाई बाहेर का पडत नाही? त्या बाईचीच काही चूक असेल ” असं म्हणत पिडित महिलेला जबाबदार धरलं जातं , कारण महिला ही सॉफ्ट टार्गेट आहे.
खरं तर हा प्रश्न जितका सोपा वाटतो, तितकीच त्यामागची कारणे गुंतागुंतीची, खोलवर रुजलेली आणि व्यवस्थात्मक आहेत.
समाजरचना आणि स्त्रीकडून अपेक्षित मौन याला कारण म्हणजे, तिच्यावर केले जाणारे संस्कार.
आपल्या समाजात स्त्रीला सहनशीलता हा गुण म्हणून शिकवला जातो. त्याग, समर्पण, शांतपणा आणि जुळवून घेणे या गोष्टी स्त्रीत्वाशी जोडल्या जातात.
संसार टिकवणे ही एकट्या स्त्रीची जबाबदारी मानली जाते, पण संसारात होणाऱ्या हिंसेची जबाबदारी मात्र कोणाचीच नसते.
घरगुती हिंसेविषयी समाज तटस्थ राहत नाही, पण तो पीडितेच्या बाजूनेही उभा राहत नाही. मात्र तो स्त्रीला अपराधी ठरवण्यात पुढाकार घेत असतो.
स्त्रीने जर तक्रार केली तर तिलाच प्रश्न विचारले जातात की,
तू काय बोलली?
कशी वागली ?
कुठे चुकली?
हिंसा करणाऱ्याऐवजी तिचाच स्वभाव तपासला जातो. जेव्हा स्त्रीची चूक असेल तेव्हाच हिंसा होते असे समजले जाते.
तिची चूक नाही हे सत्य माहित असेल तरी ते स्विकारले जात नाही. उलट त्या स्त्रीला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले जाते.
त्यामुळे स्त्रीला समजते की अन्यायाच्या विरोधात बोलण्याची किंमत फार मोठी आहे.
त्यामुळे ती चुपचाप सगळं सहन करीत जाते.
घटस्फोट किंवा वेगळं राहणं अजूनही अनेक ठिकाणी तिचंच अपयश मानलं जातं.
“घर मोडलं” हा शिक्का स्त्रीवर बसतो. या बदनामीच्या भीतीमुळे अनेक महिला अपमान आणि मारहाण सहन करूनही मौन स्वीकारतात.
कौटुंबिक संस्कार आणि पिढ्यान्पिढ्यांचा विचारांचा वारसाही याला कारणीभूत आहे.
ज्या घरात मुलगी लहानपणापासून आईला सहन करताना पाहते, तिथे हिंसा असामान्य वाटत नाही. वडिलांचा राग, ओरड, हात उचलणं हे ‘नॉर्मल’ असल्यासारखं वाटू लागतं. पुढे तिच्या आयुष्यातही तीच परिस्थिती आली, तरी ती तीव्रतेने विरोध करत नाही, कारण तिच्यासाठी ते ओळखीचं असतं.
अनेक महिला “मुलांसाठी सहन करते” असं सांगतात. त्यांना वाटतं की वडिलांशिवाय मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मात्र हिंसक घरात वाढणारी मुले भीती, ताण, न्युनगंड , आक्रमकता अपराधभावना घेऊन मोठी होतात.
आईचं मौन मुलांसाठी संरक्षण नसून, त्यांच्या मनावर खोल जखमा करणारा घटक ठरतो.
सासरकडील दबाव हा आणखी एक मोठा अडसर असतो. घराची इज्जत, समाजातली प्रतिमा आणि परंपरा यासाठी स्त्रीच्या वेदनांना दुय्यम ठरवलं जातं. तिला आधार देण्याऐवजी जुळवून घेण्याचा सल्ला दिला जातो.
आर्थिक परावलंबित्व हा घरगुती हिंसा सहन करण्यामागील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. अनेक महिलांकडे स्वतःचं उत्पन्न नसतं किंवा नोकरी करू दिली जात नाही. अशा वेळी घर सोडणं म्हणजे उपासमार, असुरक्षितता आणि अनिश्चित भविष्य स्वीकारणं असतं.
आर्थिक हिंसा अनेकदा दुर्लक्षित राहते. पैसे न देणे, खर्चासाठी पैसे मागितले तर अपमान ही बाब हिंसेच्या परिघात येते.
आर्थिक स्वावलंबन नसल्यामुळे तिच्याकडे पर्यायच उरत नाहीत.
कायदे, व्यवस्था आणि प्रत्यक्ष वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
कायद्याच्या पुस्तकात महिलांच्या संरक्षणासाठी अनेक तरतुदी आहेत, पण प्रत्यक्षात ते सगळे अधिकार महिलांपर्यंत पोहोचत नाहीत. पोलीस तक्रार घेताना अनेकदा “घरगुती मामला” म्हणून दुर्लक्ष करतात. तक्रार केल्यावर होणारी चौकशी, समाजाचा रोष आणि कुटुंबाचा दबाव हे सगळं स्त्रीला परत माघार घ्यायला भाग पाडतं.
न्यायप्रक्रिया दीर्घ, खर्चिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारी आहे. प्रत्येक सुनावणी म्हणजे स्वतःची वेदना पुन्हा पुन्हा उघड करणं. या प्रक्रियेत अनेक महिला लढाईच्या आधीच हार पत्करतात.
राजकीय पातळीवर घरगुती हिंसेकडे अजूनही खाजगी प्रश्न म्हणून पाहिले जाते. निवारा केंद्रे, समुपदेशन आणि पुनर्वसन व्यवस्था अपुऱ्या आहेत. यामागे इच्छाशक्तीचा अभाव स्पष्ट दिसतो.
मानसिक बेड्या आणि भावनिक गुंतवणूक
हिंसा सहन करणारी स्त्री कायम भीतीत असते. तक्रार केली तर हिंसा वाढेल, जीवाला धोका निर्माण होईल, मुले हिरावली जातील . ही भीती तिला स्वतःच्या बाजूने निर्णय घेण्यात अडसर ठरते . काही वेळा हिंसा करणारा अनेकदा माफी मागतो, रडतो, बदलण्याचं आश्वासन देतो. त्या आशेवर स्त्री थांबते. तर जास्त वेळा हिंसा करणारा स्वतःची चूक मान्य न करता
सततचा अपमान आणि दोषारोप यामुळे तिचा आत्मविश्वासही खचतो. हळूहळू तिला स्वतःवरच विश्वास राहात नाही.
महिला घरगुती हिंसा सहन करतात कारण त्या कमजोर नाहीत.
त्या खूप जास्त मजबूत असतात, पण समाज, कुटुंब आणि व्यवस्था त्यांना दुसरा पर्याय देत नाही.
खरा प्रश्न असा नाही की महिला बाहेर का पडत नाहीत ?
खरा प्रश्न असा आहे की, समाज महिलेला अनेक प्रश्न विचारतो,
अजूनही हिंसा करणाऱ्याला जाब का विचारत नाही?
घरगुती हिंसाचार ही खाजगी बाब नसून गंभीर सामाजिक गुन्हा आहे, हे स्वीकारल्याशिवाय बदल होणार नाही व त्यावर उपाय केल्याशिवाय बदल होणार नाही.
@छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा