त्यागमुर्ती माता रमाई: समाजक्रांतीच्या लढ्यातील मौन उपस्थिती
त्यागमूर्ती माता रमाई : समाजक्रांतीच्या इतिहासातील मौन उपस्थिती
भारतीय इतिहास प्रामुख्याने थोर विचारवंत, नेते आणि क्रांतिकारक यांच्या कार्यावर केंद्रित राहिलेला दिसतो. मात्र या इतिहासाच्या पडद्यामागे अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचे योगदान आहे, ज्यांनी स्वतः पुढे न येता, मौनात राहून परिवर्तनाच्या प्रक्रियेला बळ दिले. या दृष्टीने माता रमाई यांचे जीवन विशेष महत्त्वपूर्ण ठरते.
त्यागमुर्ती माता रमाईचा जन्म
जन्म: ७ फेब्रुवारी १८९८, वणंद, दापोली, रत्नागिरी येथे
भीकू धोत्रे आणि रुक्मिणी यांच्या गरीब कुटुंबात झाला . रमाईचे त्यावेळचे नाव रामीबाई होते
रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. थोड्याच दिवसांत वडिलांचेही निधन झाले.
त्यामुळे भावंडांसह त्या मुंबईत त्यांच्या काकांकडे राहू लागल्या.
१९०६ मध्ये, वयाच्या ९ व्या वर्षी, भायखळ्याच्या बाजारात त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तेव्हा बाबासाहेब १५ वर्षांचे असताना लग्न झाले.
माता रमाई यांचे कार्य जरी प्रत्यक्ष राजकीय किंवा सामाजिक नेतृत्वाच्या स्वरूपात दिसले नाही , तरी त्यांच्या त्यागाशिवाय आणि सहनशीलतेशिवाय समाजक्रांतीचा तो प्रवास पूर्णत्वास गेला नसता, असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही .
माता रमाईंचा जन्म सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत झाला. जातीय विषमता, दारिद्र्य आणि सामाजिक उपेक्षा हे त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य घटक होते. विवाहानंतरही ही परिस्थिती फारशी बदलली नाही. उलट, विश्वरत्न , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी सुरू असलेल्या संघर्षामुळे संसारावर आलेली आर्थिक चणचण अधिक तीव्र झाली. अशा परिस्थितीत रमाईंचे आयुष्य म्हणजे सततची जबाबदारी, अभाव यांचा संगम होता. अपत्ये गमविलेल्या मातेचे
दुःखद मातृत्व आणि सहनशीलता हे माता रमाईच्या जीवनाचं वास्तव आहे.
माता रमाईंच्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक पैलू म्हणजे अपत्यवियोग. चार मुलांचा अकाली मृत्यू हा त्यांच्या आयुष्यातील मोठा आघात होता. सामाजिक सुरक्षिततेचा अभाव आणि आरोग्यविषयक सुविधांची कमतरता यामुळे माता रमाईच्या वाट्याला हे दुःख आले असले तरीही रमाईंच्या वागण्यात तक्रार किंवा निराशा दिसून येत नाही. त्यांच्या सहनशीलतेतून अंतर्मुख व्यक्तीमत्वातून सामर्थ्य प्रकट होते, जे तत्कालीन स्त्रीजीवनाच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे ठरते.
सामाजिक कार्याच्या पार्श्वभूमीवरील रमाईची भूमिका,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्य शिक्षण, संशोधन, राजकीय चळवळी आणि सामाजिक सुधारणा यांना वाहिलेले होते. या कार्यासाठी आवश्यक असलेला मानसिक आधार आणि कौटुंबिक स्थैर्य रमाईंच्या उपस्थितीमुळे शक्य झाले. त्यांनी कधीही बाबासाहेबांच्या कार्यावर वैयक्तिक अडचणींचे ओझे टाकले नाही. हा त्याग केवळ वैयक्तिक नातेसंबंधापुरता मर्यादित नसून, तो व्यापक सामाजिक उद्दिष्टांशी निगडित होता. त्यामुळे रमाईंचे योगदान अप्रत्यक्ष असले, तरी त्याचे महत्त्व नाकारता येत नाही.
या दृष्टीने माता रमाईंचे जीवन विशेष अर्थपूर्ण ठरते. त्या काळातील स्त्री ही केवळ गृहकेंद्रित होती, असे सरधोपट विधान रमाईंच्या जीवनामुळे प्रश्नांकित होते. त्यांनी जरी प्रत्यक्ष सार्वजनिक व्यासपीठावर सहभाग घेतला नसला, तरी त्यांच्या भूमिकेमुळे एक महत्त्वाची सामाजिक चळवळ पुढे सरकू शकली. त्यामुळे रमाईंचा त्याग हा स्त्री-अस्मितेच्या नकाराचा नव्हे, तर परिस्थितीशी जाणीवपूर्वक घेतलेल्या भूमिकेचा परिणाम म्हणून पाहावा लागतो.
इतिहासातील स्थान आणि उपेक्षा
इतिहासलेखनात माता रमाईंचा उल्लेख मर्यादित प्रमाणात आढळतो. बहुतेक वेळा त्यांची ओळख ‘महापुरुषाची पत्नी’ एवढ्यापुरतीच राहिली आहे. मात्र आधुनिक इतिहासलेखन आणि सामाजिक चौकटीतून पाहता, ही मर्यादा स्पष्टपणे जाणवते. सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत अशा मौनातील सहभागाचे मूल्यमापन करणे आवश्यक ठरते. रमाईंचे जीवन हे अशाच दुर्लक्षित पण मूलभूत योगदानाचे प्रतीक आहे.
माता रमाई यांचे जीवन म्हणजे त्याग, सहनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचा समन्वय आहे. त्यांनी कोणतेही लिखित विचार मागे ठेवले नाहीत, कोणतेही सार्वजनिक भाषण दिले नाही; तरीही त्यांच्या आयुष्याचा प्रभाव सामाजिक इतिहासावर खोलवर उमटलेला आहे. समाजक्रांती ही केवळ व्यासपीठावर उभ्या असलेल्या व्यक्तींमुळे घडत नाही, तर त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अशा असंख्य स्त्रियांच्या मौनातील सहभागामुळे ती शक्य होते.
या दृष्टीने माता रमाई यांचे स्थान भारतीय सामाजिक इतिहासात अढळ आहे.
- छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा