जोगतीण – एका आईची वेदना आणि मुलीच्या शिक्षणाची शपथ
जोगतीण
आज चंदा पाय आपटीतच घरात शिरली. हातातली दप्तराची पिशवी फेकून तोंड फुगवून खोपटाच्या कोनाड्यात जाऊन बसली. तिच्या चेहऱ्यावर राग, अपमान अजून बरंच काही मिसळलेले भाव दिसत होते
अंबा दारात बसून सुपात मातेरं घेऊन पाकडत बसली होती.
चंदाचा असा अवतार बघून
अंबानं हातातलं मातेऱ्याचं सुप बाजूला ठेवून दिलं व म्हणाली.
" काय झालं गं का फुगलीस ? "
चंदा काहीच बोलली नाही. आईकडे एकदा डोळे वटारून बघितली व पुन्हा दुसरीकडे तोंड फिरवून बसली. चंदा आणि आंबा दोघीच एकमेकीचं जग. दुसऱ्या जगाशी त्यांच काही देणं घेणं नव्हतं. दोघी (आनंदी ?) होत्या आपल्या झोपडीत.
चंदाला आज काय झालं कुणास ठावूक शाळेतून आल्यापासून फुगून बसली होती.
अंबानं हातातलं काम बाजूला ठेवून चंदाजवळ येवून तिच्या डोक्यावरून हात फिरवून चेहरा कुरवाळत विचारलं,
" काय झालं गं ? सांग की मला कोन काई बोल्लं का? भांडण झालं का कुणासंग ? "
आईचा चेहऱ्यावरून फिरणारा हात झटकत चंदा म्हणाली
" शाळेतल्या सगळ्या पोरींचे केस लांबसडक हैत अन् तू माजे केस कापत ऱ्हातीस.माझ्या डोक्यावर बोटभर सुद्धा केस ठेवत नाहीस. का ? मला शाळत सगळे व्हंडी म्हणून चिडवत ऱ्हातात
चंदाच वयच प्रश्न पडण्याचं.आतले बाहेरचे अनेक प्रश्न तिलाही पडत होते.
ते तिने आईला अनेकदा विचारलेही होते. आईनं त्याची उत्तरंही दिली होती.
मात्र तिच्या मनाचं समाधान होत नव्हतं.
तिचे सगळेच प्रश्न अनुत्तरीत होते.
असंच एकदा मुलींनी प्रश्न विचारला होता.
' तू फक्त आईचंच नाव का लावतेस ? '
तोच प्रश्न घरी आल्यावर चंदाने अंबाला विचारला वरून म्हणाली,
" माझा बाबा कोणय ?"
तेव्हा अंबाने
" तुझा बाप देवय . तू देवाची लेक हायीस " असं उत्तर देवून वेळ मारून नेली होती.
अन् पलिकडे तोंड करून डोळे पुसल्याचही चंदानं बघितलं होतं.
मात्र तेव्हा कशाचाही अर्थ तिला कळला नव्हता.
आता चंदा आठवीत गेली होती.
तिच्या मनात प्रश्नांची अनेक वादळं उठू लागली होती.
शाळेत सगळे तिच्याशी तिरस्काराने वागत .तिला कोणीही मिसळून घेत नसत.
चंदा मनातून दुखावली जात होती व स्वतःच सगळ्या पासून दूर राहू लागली होती.
आज का कोणास ठावूक सगळ्यांना खेळताना बघून तिलाही खेळावसं वाटलं .
त्या घोळक्याजवळ जाऊन " मला बी घ्या की रं खेळात " म्हणाली.
तेव्हा खालच्या आळीच्या दिन्यानं " ये व्हंडे जा तिकडं बस. आमच्यात येत जावू नगं ."
असं म्हणून डाफरला व इतर मुलं फिदीफिदी हसत होती.
चंदाला खूप वाईट वाटलं.ती हिरमुसली व दुर जावून बसली.
आईचा तिला खूप राग आला होता.
'घरी गेल्यावर आईला बोलणारच नाई .जेवायचीबी नाई.
माझे केस वाढवल्या शिवाय मी तिला एक शब्दही बोलणार नाही.'
असं काहीबाही मनाशी ठरवत होती.
शाळा सुटताच पोरं आनंदानं नाचत शाळेच्या बाहेर पडली.
चंदा मात्र मनातून धुमसत होती. आज तिला सगळ्याच गोष्टींचा राग येत होता.
बियाण्याच्या पिशवीपासून तयार केलेल्या हातातील दप्तराचा, तिच्या जुनकट ,मळकट कपड्यांचा, पायाखाली पोळणाऱ्या फुफाट्याचा , आजुबाजुला गलका करणाऱ्या पाखरांचा , तिला स्वतःचाही खूप राग येत होता. झोपडीत पाय टाकताच तिने तो हातातली पिशवी फेकून व्यक्त केला.
अचानक केसांविषयी विचारल्यानं अंबा गोंधळून गेली. काय उत्तर द्यावं तिला कळेना.
जुन्या जखमा पुन्हा भळभळू लागल्या.
पंधरा वर्षांपासूनचा काळ तिच्या डोळ्याखालून सर्रकन गेला. अंगावरून एखादा भलामोठा साप वळवळत जावा तसं झालं.
चंदाला समजावावं तरी कसं ?
मी सांगितलेलं तिला कळल तरी कसं? कधीतरी सांगावच लागणारय . आताच सांगून टाकावं असा विचार करून अंबा शब्दांची जुळवाजुळव करू लागली.
दिवस मावळला होता बाहेर अंधार पडू लागला होता.
या क्षणी सुर्यालाही थांबावसं वाटलं नसावं.म्हणून त्यानेही काढता पाय घेतला होता.
" चंदा अशी जवळ बस माझ्या, आज तुला सगळं सांगते. "अंबा चंदाला जवळ घेत म्हणाली.
अंबाचा आवाज घोगरा झाला होता. तिच्या घशात काही तरी अडकल्याचगत झालं होतं. ही वेळ तिच्या साठी खूप अवघड होती. लेकीसाठी तिला पुन्हा एकदा स्वतःला सोलून घ्यावं लागणार होतं.
चंदा आईजवळ सरकून बसली.
अंबा आपलं भोगणं चंदाला सांगू लागली.
" चंदा पधंरा वर्स झाली या गोष्टीला . मी तुझ्या वयाची होते.माज्या मायबापाचं हातावरलं पोट. त्यात साताठ लेकरांच लटांबर.घरात काई नस्लं म्हंजी कधी लोकायच्या शेतातलं ओरबाडून आणायचं तर कधी पाला शिजवून खाऊ घालयची.कधी कधी तर पानी पिऊन झोपायचो. अंगाला धड कपडा नाही. पोटाला अन्न नाही.
आठ दिसाला माय सगळ्याला नदिवर नेवून जनावरं धुतल्या गत धुवून आणायची.
अशीच एक दिवस नदीवर घेऊन गेली. एकेकाला अंगाला डोस्क्याला माती लावून रगडून चोळून धुवून बाजूला काढीत होती.
फनीनं उवा काढीत होती.
मी मोठी असल्यानं नदीच्या दोन्ही बाजूला झाडाझुडपाचा आडोसा बघून आंधोळ करून वर आले.
तेवढ्यात गावातली एक म्हतारी मला बघून म्हणाली,
" भिवरे पोरीला चिमण्या आल्यात , लगीन करायचं बग भिगीनं
भिगीनं."
"कशानं करावंजी पाटलीनबाई ,इतं पोट भराय दीक न्हाई. लगीन सोप्प हाय का ?"
"आगं गाव करील मदत लई थोडी"
म्हातारी बोलत बोलत चिखल तुडवीत निघून गेली.
माय उवा काढण्यात दंग झाली. सगळे पोरं तनकिडे धरून खेळत होते. कोणी पाण्याच्या ढवात चाटूमाशांच्या मागं लागलं होतं तर कोणी वल्ली वाळू पायावर घेऊन , ' चिमणी चिमणी खोपा दे' म्हनून खोपा करण्यात दंग होतं.
मधूनच माय सगळ्याच्या नावानं बोंब ठोकीत होती.
" ऐ....इकडं या रं,तुमचं मडं बशीवलं .ए गंग्या ,धोंड्या, सटव्या,मसन्या...धिवून काडू द्या रं भिगीनं.
अजून कुर्डूचा पाला खुडून घेयाचा हाय , काटक्या गोळा करायच्या हाईत.
मारीच्या आरोळीनं सगळे गोळा झाले.
ती एकेकाला बुचकळून वर काढत होती.
तिचा आवतार बगून मी भेदरले होते .
मायीचा राग माझ्याकडं फिरुने म्हनून मी म्हनलं
"माय म्या कुर्डूचा पाला खुडून घेऊ का? "
तशी माय माझ्या वर खेकसली ,
" लई कामाची हाईस म्हाईत हाय मला .बस हितं डोस्क्यातला बाऊ काढू दे. "
म्या हिरमुसली होवून गवतावर बसले.
माझ्या बाजूला एक बाई कवड्याची माळ, लाकडाचे देव, परडी असं काईबाई धुवीत बसली होती.
तिच्या कपाळाभर कुंकू होतं.केसाच्या जटा वळलेल्या होत्या . कोपरापस्तर हिरवे काकणं . तिचा आवतार बघून मनात भ्याले मी.
तेवढ्यात माय ढवातून वर आली.
हे सगळं चंदाला सांगत असताना अंबाचा अधुनमधून गळा दाटून येत होता ती स्वतःला सावरुन पुन्हा बोलत होती.
मायीनं माझ्या झिपऱ्या खसकन वढून मला जवळ बसविली.
" येवढी मोठी घोडी झालीस, तुला झिपऱ्या नीट करता येईना. नुसत्या जटा वळल्यात केसाच्या."
माय केसात फनी घालून ओढणार तेवढ्यात त्या बाईनं येवून तिचा हात धरला अन् म्हणाली
" थांब भिवराबाय पोरिच्या केसाला फनी लावू नगं ."
माय गोंधळून तिच्याकडं बगत होती .
पुढे ती बाई बोलू लाली-
" देवीमायची किरपा झाली तुझ्यावर ,तुजी लेक आवडली तिला, हे सकून धाडलाय तिनं . म्हणून तुज्या पोराच्या केसाच्या जटा वळल्यात."
ती बाई बोलत होती.
" तुमचं बोलणं मला कायबी कळना व बाई "
माय तिच्या तोंडाकडं बघत होती
" तुला कळायचं बी न्हाई .तुज्या पोरीच्या हातनं सेवा घडावी असी इच्चा हाय तिची.तुजी पोरगी देवीला दान कर.मायबाई तुला बरकत देईल तुझ्या लेकराबाळावर सावली धरील.
तिची आज्ञा मोडलीस तर वाटोळं करून टाकील. घरादाराचा खप्पा बुडल ध्यानात ठीव " असं बोलून झपाझप पावलं टाकीत निघून गेली.
दुसऱ्या दिवशी दिवस निघायला एका भक्ताला घेऊन घरी आली
मायबापाला बरीच भिती घातली. थोडी लालूच दाखवली.
देवीच्या निवदात हिचा वाटा ऱ्हाईल. देविला मिळालेल्या कपड्यालत्यात हिचा हिस्सा राहील. देवी तुम्हाला बरकत देईल.तुमच्या लेकराबाळाला चार घास मिळतील.गरिबीनं गांजलेल्या मायबापाला बरंच वाटलं. माज्या लग्नाचा घोर मिटला. माझा आधारच होणार होता घराला.
त्यांनी माझी देवीजवळ बसून पुजा केली. कोपरापस्तर काकनं भरले.हातात माळपरडी दिली. त्या दिवसापासून,
देवीचा जग ( वेगवेगळे देवीच्या मुखवट्याचे एकत्रीकरण करुन एका ऊथळ परडीत मांडलेले असते त्याला देवीचं जग म्हणतात ) ते डोक्यावर घेऊन कमरेला भंडार्याची पिशवी आणि काखेत सुती म्हणजेच तुणतुणं अडकवून. ते मला देवीच्या नावानं भीक मागायला घेऊन फिरत होते.
सोबतचा पुरूष (जोगता) गळ्यात चौंडके अडकून सोबत असायचा. घरोघरी, गावोगावी जावुन माजुकरी भिक्षा मागत फिरायचो.
गोंधळातही घेऊन जात होते.
घरात चार दाणे येवू लागले. लेकरांच्या दाताव्हटाची गाठभेट पडू लागली.मायबापाला बरं वाटू लागलं.
एक दिवस असंच डोंगरावर देवीच्या देवळात निवदं गोळा करायला मला घेऊन गेले पहाटेला गेलो तर दिवस मावळायला गेला." मी हे निवदानं दान भरलेलं टोपलं घेऊन जाते, राहिलेले तुम्ही घेऊन या." असं म्हणून ती बाई निघून गेली .अंधार पडू लागला तशी मला भीती वाटू लागली. त्या भक्ताचीच जास्त भीती वाटत होती .त्याचा पांढराफट्ट गारगोटी वाणी डोळा, वाढलेल्या झिपऱ्या ,अगडबंब देह बघून मला कापरं भरलं होतं. आणि तो एका डोळ्याने माझ्याकडं टक लावून बघत होता. "मामा जाऊ का घराकडं" मी भीत भीत विचारलं तर त्याने तारवटलेला एक डोळा माझ्यावर रोखून म्हणाला "जेवणयेळ टळूस्तर मायीचा दिवा सांभाळीत बसावं लागतं. आत्ताच कुठं निघाली घरला ? " त्याचा तो भेसूर आवाज ऐकून मी अजून जास्तच भ्याले. गप्प बसून राहिले. अंगाला दरदरून घाम फुटला होता. थरथर कापत तशीच बसले देवळात कुणीतरी यावं असं मनातून देवीला इंनवीत होते . कशाचं काय बेसूर भगत अन काळाकुट्ट अंधार दोघंच माझ्या सोबतीला होते. जेवणयेळ टळून गेली होती. म्या देवीचा दिवा सांभाळीत बसले होते. भगत एका धोंड्या वर बसून चीलीम फुकित होता .त्याचा एक डोळा ताठरून लालबुंद झाला होता. त्या एका डोळ्याने माझ्यावरच टक धरली होती.देवी पुढचा दिवा विझला .सगळीकडे अंधार दाटला .माझ्या काळजाची धडधड वाढली . मी त्याला काडिपेटी मागितली.
"गरज नाही आता. जाऊ घराकडे ते निवदं घेऊन ये इकडं "
असं म्हणताच मी दुरडी घेऊन त्याच्याकडं गेले.
"चला मला भीती वाटते अंधाराची." मी असताना काय भिती आहे तुला." असं म्हणून त्याने मला जवळ ओढलं.मी दचकून बाजूला सरकले. तशी त्यांन मला अजून जवळ ओढून घट्ट आवळून धरली. देवीच्या दरबारातच मेलेल्या जनावराचा मास जसं भुकेल्या कुत्र्यांनं तोडून खावं तसं तो मला तोडीत होता. मी लई तळमळ केली गं सुटका करून घेण्यासाठी. देवीचा धावाबी केला. " एखादा साप येऊन चाऊदे माय याला"
म्हणून नवस बी बोलले. पर काही फायदा झाला नाही. लई वेदना झाल्या.
अंबाचा गळा दाटून तिला बोलवेना.
पोट भरल्यावर कुत्र मुर्दाडापासून दूर जावं तसा दूर झाला.
आणि म्हणला,
"चल आज तुला देवी पावली, हक्काची दासी झालीस , माय तुझं सगळं ऐकल इथून पुढे. जे म्हणशील ते देईल तुला. चल तुझे माय बाप बहीण भाऊ उपाशी बसले असतील. तुझी वाट बघत." त्यांन निवदाची दुरडी डोक्यावर घेतली .मी त्याच्यामागं माझंच मढ ओढीत निघाले. निवदाची दुर्डी आमच्या झोपडीच्या दारातून मायीला दिली. पोरीला जेवू घाला पोटभर. आज लय सेवा केली तीनं देवीमायीची. असं म्हणून अंधारात ढांगा टाकत निघून गेला. सगळे चिल्हे पिल्ले निवदाच्या दुरडी वर तुटून पडले. माय बाप त्यांना सावरायचं मागं लागली. मी तिथंच कुडाजवळ अंगाच मुटकुळं करून पडून राहिले. दुसऱ्या दिवशी जोगतीन आली आणि म्हणली आता तू पावन झालीस. देवी मायीला आता तुझी सेवा मान्य होईल. देवी माय तुला आपल्या पदराखाली ठेवलं. भाग्यवान आहेस.
ह्या जन्मात देवी मायची सेवा करायची संधी मिळाली तुला. तुझी जन्माच्या फेऱ्यातून सुटका होईल . आता तुला आपल्या पायाजवळ जागा देईल. बराच वेळ ती बडबडत राहिली.
माय कौतुकानं बघत होती. त्या लोकांनी सगळ्या गावची दासी करून सगळ्यांच्या वापराची वस्तू करून ठेवली.
सगळ्या गावाने भोगली.अन् तुला माझ्या पदरात घातली. तुझा जन्म झाला त्याच दिवशी ह्या लोकांनी तुझं भविष्य ठरवून टाकलं. माझ्या जागी तुला जोगतीण करायचं.
पर मी हे होऊ देणार नाही.
तुला अजून एक सांगू का चंदा, ती मोठी जोगतीन अन् मी आमी एकदा असंच भीक मागत शेजारच्या गावात फिरत होतो . तिथं भीम जयंतीत एक माणूस भाषणात सांगत होता,
" ' शिक्षण हे वाघिणीचं दुध आहे, ते पिणारा गुरगुरल्या शिवाय राहत नाही '
असं बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे . पोरांनो, अर्धी भाकर कमी खा पण शिक्षण घ्या. त्या शिवाय आपला उद्धार होणे शक्य नाही. गरीबी, अंधश्रद्धा हे आपल्या समाजाला लागलेली कीड आहे आणि ती शिक्षणानेच नष्ट होईल "
म्या रस्त्यावर थांबून त्याचं भाषण ऐकलं होतं. तू जन्मालीस तेव्हा ठरवून टाकलं की मी माझ्या पोरीला माझ्यासारखं जगू देणार नाही. तिला शाळेत घालणार खूप शिकविणार, मास्तरीन करणार "
इतका वेळ डोळ्यातून वाहणारे अश्रू पुशीत आंबा बोलली. चंपाच्या डोळ्यातूनही अश्रू वाहत होते दोघी मायलेकींनी आपल्या दुःखाला वाट करून दिली .
होती आंबाच बोलणं सगळं चँपला समजलं नसलं तरी आईची वेदना जशीच्या तशी तिच्या काळजापर्यंत पोहोचली होती.चंपा जाऊन आंबाला बिलगली.
"आई तू म्हणशील ते सगळं करीन..." चंदा पाणावलेल्या डोळ्यांनी आईकडं बघत म्हणाली.
" तू शिकून मास्तरीन व्हावी एवढी माझी इच्छा आहे. करशील ना पुरी? " हे बोलताना चंपाचा गळा दाटून आला होता.
चंदा आंबाची आई होऊन तिला कुरवाळीत राहिली. माय-लेकीच्या मनातील दुःखाचा मळभ अश्रूचा रूपाने वाहून गेला. सगळं हलकं झालं होतं.
"आता कोणताही प्रश्न विचारणार नाही मी तुला." चंदा आईचा हात हातात घेऊन म्हणाली.
पहाटेचा तांबडा प्रकाश उशेची चाहूल देत होता. चम्पा आणि आंबा एकमेकींना बिलगून उषेची वाट पाहात पडून राहिल्या.
@छाया
अधिक वाचा :
आयु .छायाताई बेले ..आपण मांडलेला हा " जोगतीण " हा विषय मी माझ्या आयुष्यात अगदी जवळुन पाहीलेला म्हणण्यापेक्षा अनुभवलेला आहे. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात हा समाजाला लागलेला कलंक आहे ..देवाच्या नावाखाली आपल्या सोयीनुसार एका स्त्री "देवदासी म्हणजेच जोगतीण " देवाला सोडायच आणि सर्व गावाने तिचा सोयीनुसार भोग घ्यायचा ... आणि वरतुन म्हणायच की ही देवीची सेवा आहे ...
उत्तर द्याहटवाहा विषय मांडून समाजातील अनिष्ठ रूठी परंपरा कशा वर्षानुवर्षे चालत आल्या तळागाळातील समाजाला कशा वेदना सहन करायला भाग पाडल जायच हा ज्वलंत प्रश्न आहे ...
ऊच्चवर्णीय लोकांमध्ये देवदासी का नाहीत ..ब्राम्हण समाजातील एकही स्त्री जोगतीण (आरादी) का नाही . कारण त्यांनी शिक्षणाला महत्व दिलेल आहे ..
छायाताई तुझ मनापासुन खुप खुप कौतुक आहे की असा ज्वलंत विषय तु वाचकांना दिलास ..
अशाच वेगवेगळ्या विषयांवर तु लिहीत रहा समाज प्रबोधन करत रहा ..
पुनःश्च खुप खुप शुभेच्छा ...
मनापासून आभार 🙏🙏
हटवा