ती खूप ( शांत ?) आहे ,का ? | मराठी लेख

ती खूप  शांत आहे 
   "ती खूप शांत स्वभावाची आहे , कोणीही काहीही बोललं तरीही हसून पुढे जाते..  "  
एखाद्या  स्त्री विषयी आपण अनेकदा अशी वाक्ये ऐकत असतो. विशेषतः सासरी. 
घरातील सुनेला घालून पाडून बोललं जातं, वरून अशी वाक्ये ऐकवली जातात. 
   तर  खरंच असं असेल का? 
जिच्या विषयी मुद्दाम असं  विखारी बोललं जातं तीला वाईट वाटत नसेल ?
ती माणूस आहे तर तिला वाईट वाटत नाही हे आपण कसं गृहीत धरणं खरंच योग्य आहे ?
जी गोष्ट तिला वाईट वाटण्यासारखी आहे ती कदाचित तिच्या कित्येक रात्रीची झोप काढून घेईल, अनेक दिवस , अनेक महिने, वर्ष किंवा संपूर्ण आयुष्यभर  गोष्ट तिच्या मनात घोळत राहू शकते याचा विचारही कोणी करत नाही . 

   शांत दिसणारी स्त्री आतून इतकी थकलेलीही असु शकते . 
किंवा तिला सहन करणंच शिकविलेलं असल्याने ती सहन करीत जाते मात्र वर वर 
शांत दिसणारी स्त्री खरंच शांत असते का?
  स्त्री मनाचा आतला संघर्ष, थकवा, सहनशीलतेचा आपण आपल्या सोयीनुसार  अर्थ लावलेला असतो. 
मात्र तिच्या न दिसणाऱ्या वेदनांचा कधी आढावा घेतला आहे का?
ती शांत असते.जास्त बोलत नाही.तक्रार करत नाही.खूप समजूतदार आहे .
असं म्हणून सगळेच तिला सहज गृहीत धरतात. 

 शांत दिसणारी स्त्री खरंच शांत आहे की
 तिने  फक्त जगण्यासाठी  ही शिकलेली एक सवय आहे ? याचा विचार आपण कधीच करत नाही.
 अनेक स्त्रिया बाहेरून स्थिर, संयमी आणि मजबूत दिसतात,
पण आतून त्या खूप थकलेल्या असतात.
फक्त त्या आपला थकवा शांत चेहऱ्यामागे दडवून ठेवलेला असतो. त्यांना दुसरा पर्याय नसतो. 
शांतपणा म्हणजे नेहमी ताकद असते असेही नाही. या मागे मनावर झालेले संस्कारही असतात. 
स्त्रीला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते . 
तुझी बाईची जात आहे सहन कर. त्यामुळे आयुष्य सोपं होतं. ती ते शिकत जाते . आजुबाजुला सगळ्या बायका हेच करत असतात. 
घर, नाती जपायची असतील,
समाजात चांगली बाई म्हणून नाव कमवायचं असेल तर बाईने सगळं सहन करायचं असतं हे सांगितलं जातं . 
बाईनं अंधारात  रडून मन मोकळं करायचं आणि बाहेर समजलं जातं.
तक्रार करणं म्हणजे “नाटक” ठरतं. नाही तर मग अगोचर, भांडकुदळ स्वैर अशी बिरुदे लावली जातात. 
  हे हळूहळू  स्त्रीच्या मनात खोलवर बसते.
मग ती गप्प राहून सहन करणं शिकते . 
बोलण्यापेक्षा सहन करणं सोपं आहे. असा तिचा समज होतो. तिच्या या सहन करण्याला चांगूलपणाचं चंदेरी वेष्टण गुंडाळलं जातं . 
आणि मग कायम ती शांतच राहायला लागते . 
स्वतःच्या भावनां,  राग , आपल्या मनाच्या गरजा दडपून टाकायला शिकते. 
वर्षानुवर्षे हे असं सुरू राहतं मग मनाचा थकवा वाढायला लागतो .
हा  थकवा एका दिवसात निर्माण होत नाही.
तो वर्षानुवर्षे शरिर मनात साठत जातो. सतत जबाबदाऱ्या नीट पार पाडण्याची , प्रत्येकासाठी उपलब्ध राहण्याची शिकवण दिलेली असते. 
स्वतःसाठी काही मागणं किंवा स्वतःसाठी विश्रांती घेणं हे सुद्धा अपराध आहे असंच तिला वाटतं. वाटणारा अपराधभाव यात ही स्वतःला हरवत जाते. स्वतःला मागे ठेवते. 
ती सगळ्यांसाठी उपलब्ध असते,पण स्वतःसाठी नसते.
    हसत राहणं, समजूतदार असणं,सगळं निभावून नेणं , हेच तिचं ओळखपत्र बनतं.
ती बोलत का नाही तर , कारण कधी ती स्वतःसाठी 
कधी बोललीच तर 'एवढा काय डोंगर कोसळला '
किंवा  इतकं काय झालं? असं म्हणून तिचं डोंगराएवढं दुःख राई करून दाखवलं जातं. 
ती  जेव्हा रडली तेव्हा  “सगळ्यांच्याच आयुष्यात त्रास असतो” असं ऐकवलं जातं.
मग हळूहळू तिला कळतं, आपल्या भावना इथे स्वीकारल्या जात नाहीत.म्हणून ती गप्प बसते.
ती स्वतःला समजावते राहू दे, बोलून काय उपयोग? आणि ही शांतता हळूहळू तिचं कवच बनते.शांत दिसणं म्हणजे वेदना नाहीत असं नाही शांत स्त्री  सतत खूप ओझी झेलत असते . 
अपेक्षा , नाकारलं जाण्याची भीती,  एकटे पडण्याची भीती यामुळे ती सहन करीत जाते. 
ती ओरडत नाही म्हणून तिला वेदना नाहीत असं समजू नये.
कधी कधी या सहन केलेल्या गोष्टींची आतल्या आत संघर्ष सुरू असतो . 
आणि बाहेर शांत दिसणारी स्त्री हळूहळू, कोणालाच न कळता.आतून तुटत असते 
ही तिच्या सहनशीलतेची किंमत असते. 
समाज स्त्रीच्या सहनशीलतेचं कौतुक करतो,
पण तिच्या थकव्याकडे दुर्लक्ष करतो.सतत देत राहणं,स्वतःला बाजूला ठेवणं,हे आदर्श मानलं जातं.पण या आदर्शाची किंमत
स्त्रीच्या मनाला शरिराला मोजावी लागते. तशी ती एक दिवस नाते कुटूंब यांनाही मोजावी लागते. तिचं कोरडं होणं हे सगळीकडे उतरतं. 
तेव्हा तिला सल्ल्यांची गरज नसते,
“असं कर”, “तसं विचार कर” ऐवजी 
कोणी तरी तिच्या शांततेकडे पाहून
इतकंच म्हणावं 
“मला कळतंय…तू सहन करून,  आतून खूप थकली आहेस.तुला वाटतं ते मोकळेपणाने बोल..
तुझा थकवा खरा आहे
तुझ्या भावना योग्य आहेत
नेहमीच शांत राहणं जरूरी  नाही. हो थोडीशी अगोचर , भांडकुदळ सोड तुझा आवाज स्वैर तुला शिक्षा होणार नाही. ऐकून घेतले जाईल.. " 
असं कोणी तरी म्हणायला हवे. 
 हे बोलणं  तिच्या मनावरचा मोठा भार हलका करू शकतं.
शांत दिसणारी स्त्री ही नेहमीच समाधानी असते असं नाही. कधी कधी ती फक्त सहन करत असते. तिची शांतता हा तिचा कोष  असतो .
जगाशी संघर्ष करावा लागू नये म्हणून विणलेला.‌
आणि म्हणूनच अशा स्त्रीकडे पाहताना
तिच्या शांततेच्या पलीकडे पाहणं आपल्याला शिकावं लागेल.
तेव्हाच आपल्यातील माणूसपण समृद्ध आहे असं म्हणता येईल. 

- छाया.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .