नात्यांमध्ये स्त्री स्वतःला का हरवून बसते? सामाजिक वास्तव आणि आत्मसन्मानाचा प्रश्न.
नात्यांमध्ये स्त्री स्वतःला का हरवून बसते? सामाजिक वास्तव आणि आत्मसन्मानाचा प्रश्न
कविताच्या बुटीकमध्ये सहज जाणं झालं. तिथे तिच्या परिचयातील एक बाई टिकल्या-बांगड्या घ्यायला आली होती. चेहऱ्यावर उदासीनता, मानसिक आणि शारीरिक थकवा स्पष्ट दिसत होता.
कविताने सवयीने विषय काढला, “नवरा खूप प्रेम करतो वाटतं, म्हणून आमची आठवण येत नाही?”
ती बाई हसलीही नाही. “कशाचं काय… संसाराच्या व्यापातून सुटकाच होत नाही,” एवढंच म्हणाली आणि निघून गेली.
हा प्रसंग साधा होता, पण तो अनेक स्त्रियांच्या आयुष्याचं चित्र होतं. घर, मुलं, नवरा, जबाबदाऱ्या — या सगळ्यात स्वतःचं अस्तित्व हरवून बसलेल्या स्त्रिया आपल्या आसपास आहेत. पण त्यांचं हरवणं समाजाला दिसत नाही.
स्त्री नात्यात स्वतःला का हरवते?
नातं जपताना स्त्री अनेकदा स्वतःलाच हरवून बसते. ही सुरुवात कोवळ्या वयातील भावनांतून होते. लग्नानंतर नवीन आयुष्यात जुळवून घेण्यासाठी ती स्वतःवर सगळं ओझं घेत जाते. हळूहळू जबाबदाऱ्या वाढतात आणि ती त्यात हरवून जाते.
लहानपणापासून तिला शिकवलं जातं . प्रेम म्हणजे त्याग. घर टिकवायचं असेल तर शांत राहावं, मोठं मन ठेवावं, समजूतदार व्हावं. या शिकवणीमुळे ती स्वतःच्या इच्छा, अपेक्षा आणि स्वप्नं बाजूला ठेवायला शिकते. तिला वाटतं की नातं टिकणं हेच तिचं यश आहे.
समाजाने स्त्रीसाठी एक चौकट तयार केली आहे . सहनशील, शांत, समजूतदार आणि नेहमी समर्पित. या चौकटीबाहेर गेली की तिच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं जातं. “ही इतकी स्वार्थी कशी?” “घर सांभाळता येत नाही का?” अशा प्रश्नांमुळे तिच्या मनात अपराधीपणा निर्माण होतो. परिणामी ती पुन्हा स्वतःलाच दोष देते.
आर्थिक अवलंबित्वही तिच्या हरवण्याचं मोठं कारण असतं. आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यास स्वतःचा आवाज उठवणं कठीण होतं. त्यामुळे ती अन्याय सहन करते. हळूहळू तिच्या आवडी-निवडी, तिची ओळख धूसर होत जाते.
स्वतःला हरवण्याची चिन्हे अशा प्रकारे दिसून येतात.
निर्णय घेताना सतत भीती वाटते.
स्वतःसाठी वेळ काढताना अपराधी वाटते.
इतरांबरोबर ती सतत स्वतःलाच दोष देते. माझ्यात उणीव आहे. मलाच काही नीट येत नाही असा विचार करते.
यामुळे तिच्या आतलीआनंदाची भावना कमी होत जाते. तिचं जगणं रुक्ष होत जातं.
आयुष्य यांत्रिक वाटू लागतं.
ही चिन्हं दिसू लागली तर तो
फक्त थकवा नसतो .ती ओळख हरवण्याची प्रक्रिया असते.
स्वतःला परत कसं शोधायचं? तर
“नाही” म्हणायला शिकणं हा पहिला टप्पा आहे. नकार देणं म्हणजे नातं तोडणं नाही; तो आत्मसन्मान जपण्याचा मार्ग आहे.
स्वतःसाठी वेळ राखून ठेवणं आवश्यक आहे. स्वतःच्या भावनांना मान्यता देणं गरजेचं आहे. आवश्यक असेल तर समुपदेशन घेणंही लाजिरवाणं नाही.
स्त्रीसाठी आर्थिक स्वावलंबन अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तिच्या निर्णयक्षमतेला बळ देतं आणि आत्मविश्वास वाढवतं.
नातं जपणं चुकीचं नाही, पण त्यासाठी स्वतःचं अस्तित्व नष्ट करणं आवश्यक नाही. प्रेम आणि आत्मसन्मान एकत्र नांदू शकतात.
भारतीय समाजात खरं तर विद्रोहाची परंपरा खूप जुनी आहे.
स्वतःचा शोध घेण्यासाठी अक्कमहादेवीने राणीपदाचा त्याग केला. संत जनाबाईंनी भक्तीवर बंदी आल्यावर
पंढरीच्या पेठे मांडियेला पाल
मनगटावर तेल घाला तुम्ही
असं ठणकावत
विद्रोह केला. आपल्या परंपरेत अशा अनेक स्त्रिया आहेत.
ज्यांनी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी समाजाला प्रश्न विचारले.
आजही तोच प्रश्न आहे . घर सांभाळणं चुकीचं नाही, पण शोषण सहन करणं का? समाजमान्य गुलामीला नकार देण्याची ताकद स्त्रीनेच दाखवावी लागेल.
नात्यांमध्ये स्त्री स्वतःला हरवते ते तिच्या कमकुवतपणामुळे नाही, तर सामाजिक रचनेमुळे. पण ती स्वतःला पुन्हा शोधू शकते . ठामपणे, सजगपणे आणि सन्मानाने.
सन्मानाने जगणं हा तिचा माणूस म्हणून अधिकार आहे.
आणि स्वतःवर प्रेम करणंही . हीच खरी तिच्या विकासाची सुरुवात आहे.
संबंधित लेख :
महिलांच्या विटंबनेचे बदलते स्वरूप
@छाया
अप्रतिम लेख ताई छान मांडणी केली आहे आपण.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏☺️
हटवामनापासून आभार 🙏🙏☺️
हटवा