प्रिय बाबा ! - मराठी कविता
मलाही वाटतंय रं
तुझ्यावर लिहावी कविता
न कळत्या वयात
जेवढा मोठ्ठा वाटायचास
तेवढं मोठेपण द्यावं तुला
शेंदूर लावलेले
न लावलेले सगळे देव
करावेत खुजे तुझ्याहून
तुझ्याच पायावर वाहावी
सगळी श्रद्धा
अन् आठवलं,
भुमी कन्येचं गायीसह दान
तिचं हरण,
अग्निपरीक्षा,
समाजरुपी परिटानं
केलेलं कारस्थान,
तिचं बेघर होणं ,
दो जीवासह वनवास,
भुईत गडपणं,
मग , शिळा झालेली अहिल्या,
द्रोपदीचं वस्त्रहरण
या सगळ्याच वेळात
बाप अनुपस्थित
तेव्हापासून आजपर्यंत
कितीतरी सीतांनी
विहिरी बारवात आसरा घेतला
द्रोपदीचं होत राहिले विटंबन
त्यांची फर्याद अनसुनी राहिली
बाप असतानाही
आजतागायत
तू सम्राट तेव्हाही आताही
थांबवू शकला असतास शोषण
तसं घडलं नाही
काळाच्या कोणत्याही तुकड्यावर
त्या आणि मी केवळ
बेसावध क्षणांची
अनाहूत परिणिती
असंच वाटत आलंय मला नेहमी
त्याच सीताचक्रात गरगरत
नाही देऊ शकत तुला देवपण
मला क्षमा कर ...
डोक्यावरून फिरलेला हात
नाही विसरले... तरीही !!
- छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा