संघर्षाच्या धगधगत्या वाटेवरील प्रवासाची कहाणी — ‘तीन निर्झर’


संघर्षाच्या धगधगत्या वाटेवरील प्रवासाची कहाणी — ‘तीन निर्झर’
      दारिद्र्य, जात, स्त्रीत्व हे वागवत जगण्याचा रोजचा संघर्ष या विळख्यात अडकून असतानाही आशेचा धागा पकडून जीवनाला प्रकाशमान करण्याची जिद्द बाळगण्याची कहाणी म्हणजे ‘तीन निर्झर’.
    सुभा लोंढे यांचं आत्मचरित्र ‘तीन निर्झर’ वाचत असताना प्रत्येक प्रसंग मनाला अस्वस्थ करतो. त्याचबरोबर ही कहाणी , नाउमेद झालेल्यांना जगण्याची उमेदही देते. परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या माणसांची कहाणीच पुस्तक रूपाने लेखिकेने मांडली आहे.
    सुभा लोंढे यांचं हे आत्मचरित्र केवळ जीवनातील घटनांची नोंद नाही, तर ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या जिद्दीच्या प्रवासाची नोंद आहे. मुलगी शिकली पाहिजे हा विचार समाजमनाच्या पाठीवर उमटण्याच्याही आधीच्या काळात आजी-आजोबांनी आपली नात शिकली पाहिजे हा घेतलेला ध्यास आजच्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाच्या संकुचितपणावर चपराक आहे.
    ‘तीन निर्झर’ या आत्मचरित्राचं वैशिष्ट्य म्हणजे लेखिकेने स्वतःच्या जीवनाकडे केवळ स्वतःच्या दुःखाच्या नजरेतून पाहिलेलं नाही. आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या माणसांकडेही तितक्याच संवेदनशीलतेने पाहिलं आहे.
 या आत्मचरित्रातील ‘माय’, ‘बापू’ आणि ‘सीता’ हे तीन निर्झर लेखिकेच्या जीवनाला आकार देणारे तीन प्रवाह आहेत. या तिन्ही प्रवाहांतून माया, ममता ,माणुसकी, करुणा, वाहताना दिसते.

     ‘
    ‘तीन निर्झर’ हे शीर्षक आत्मचरित्राच्या आशयाला अत्यंत समर्पक आहे. निर्झर म्हणजे सतत वाहणारा झरा. या आत्मचरित्रातही मायेचा, माणुसकीचा  प्रवाह सतत वाहताना दिसतो.

    पहिला निर्झर म्हणजे ‘माय’. बायना माय म्हणजे मायेचा अखंड वाहता झरा.

दुसरा निर्झर म्हणजे ‘बापू’. केरबापू म्हणजे करुणा, विवेक आणि माणुसकीचा झरा.

तिसरा निर्झर सीता, म्हणजे दुःखाचा डोंगर वागवत असूनही आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी तिच्या पाठीशी उभी राहणाऱ्या स्त्रीच्या जिद्दीचा झरा.
   या तीन व्यक्तींच्या जीवनातून वाहणारे हे तीन प्रवाह शेवटी लेखिकेच्या जीवनाला आकार देतात. म्हणून ‘तीन निर्झर’ हे शीर्षक केवळ सुंदर नाही, तर आत्मचरित्राच्या आशयाचे प्रतिनिधित्व करणारे आहे.
पहिला निर्झर — माय
‘तीन निर्झर’ यापैकी पहिला निर्झर म्हणजे ‘माय’.
लेखिकेची आजी बायनामाय.
“माझी माय गव्हाळ रंगाची. मजबूत बांधण्याची मध्यम उंचीची असलेली स्त्री होती माय म्हणजे माझ्या वडिलांची आई, माझी आजी.
मायीचे माझ्यावर जिवापाड प्रेम होते. साधी भोळी माय मलाही तितकीच प्रिय होती.
माझे वडील वारल्या पासून सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तिला आर्थिक व मानसिक आधार देणारी माय मोठी धीराची बाई.
तरुण मुलगा अकाली निघून गेला. सुनेच्या कपाळी वैधव्य आले. तिचे पांढरे  कपाळ पाहून, स्वतः सौभाग्यवती असूनही तिने पूर्ण बारा महिने स्वतःच्या कपाळी कुंकवाचे बोटही लावले नाही.”
आजीवरील पहिल्या भागाची ही सुरुवातच आजीच्या प्रेमळपणाची व संवेदनशीलपणाची साक्ष देणारी आहे.
    काही माणसं जीवन अंतःकरणातून, प्रामाणिकपणे जगत असतात. सुखदुःखाला समान भावाने जवळ करतात. तशीच ही मायसुद्धा आहे, हळवी तरीही सुपाएवढं काळीज असलेली.
मुलगा वारल्यानंतर सुनेची व नातीची जबाबदारी आपल्यावर घेते. दोघींनाही जीवापाड सांभाळते. त्या दोघींचा सांभाळ करणं हेच जीवनाचे ध्येय ठरवून घेते. मुलाच्या वाट्याची सगळी माया ती नातीवर ओतून देते.
पदराच्या गाठीत कधी भुईमुगाच्या शेंगा बांधून आणायची, तर कधी म्हसोबा, रानगोबाच्या समोरचा नारळ नैवेद्य घेऊन यायची;  नातीच्या हातावर ठेवून, ‘खा माय’ म्हणायची.
या  प्रसंगातून लेखिकेने दाखवलेला मायेचा 
 झरा तो वाचकाच्या मनाला भिडतो. 
माय अशिक्षित असली तरी बुद्धीने परिपक्व होती. अंधश्रद्धेपासून दूर होती.
‘रानगा व हडळ भूत यावर मायीचा अजिबात विश्वास नव्हता. देवावर मात्र तिची आढळ श्रद्धा होती ' असं लेखिका म्हणते.
   या संस्कारात लेखिकेची जडणघडण होत राहते.
बायना मायीला रामायण, महाभारत तोंडपाठ होते. अनेक म्हणी, अभंग मुखोद्गद असल्यामुळे नेमक्या वेळी ती अचूकपणे त्याचा दाखला देत असायची. लहानग्या सुभाला याचं बाळकडू मिळत होतं.
बाईच्या मनात समाजानेच भीती पेरून ठेवलेली असते; मात्र वेळ पडल्यास ती दाखवून देते की, पुरुषापेक्षा कुठेही कमी नाही. हे बायना मायीने सिद्ध केले.
बायनामाय शेतकऱ्याची पिकं राखणीला घेत असायची. डोळ्यात बोट घातले तरी दिसू नये अशा अंधारात रात्रभर रानात जागली करायची. सुभालाही ती आपल्या सोबत घेऊन जायची.
रात्रीच्या जागलीवर असताना लहान सुभा अंधारात एखाद्या झाडाला बघून भूत म्हणायची, तेव्हा बायना माय तिला कुशीत घ्यायची व सकाळी झोपेतून उठल्यावर,
‘बघ ते झुरपाड हाय, तू त्यालाच भूत मनलीच नव्ह’
असं सांगून  सुभाच्या मनातील भीती काढून टाकायची.
या प्रसंगातून बायना मायीचा केवळ प्रेमळ स्वभावच दिसत नाही, तर मुलांच्या मनात भीती निर्माण करण्याऐवजी ती भीती समजावून दूर करण्याची तिची विवेकबुद्धीही दिसून येते.
लेखिकेने ग्रामीण जीवनाचे चित्रण अचूकपणे व अतिशय नेमकेपणाने केले आहे. 
शेती, तिथलं जगणं, भोवताल, सुंदररीत्या रेघाटला आहे.
   एका रात्री शेतावर जागल करीत असताना चोर येतात व बापूच्या पायावर जोरात काठी मारतात. तेव्हा बापू व माय यांच्यात झालेला संवाद दारिद्र्याची दाहकता प्रकट करणारा आहे.
वेदनेने विव्हळत बापू मायीला म्हणतो,
“आग बायने पीकं राकणीला घेणं बंद कर, नायीतर एखादी दिवशी हकनाक मरावं लागेल आपल्याला, आपल्याबरोबर या पोरीलाबी.”
त्यावर बायना माय म्हणते,
“राकंण घेणं बंद करून पोटावर काय बीब्बे घालावे काय? शेतकऱ्याच्या शेतात राबताव, त्यांच्या पुढं पुढं करताव, तेव्हा खायला मिळतंय.”
हे बोलणं इथल्या विषमतावादी समाजव्यवस्थेची चिरफाड करणारं आहे.
सगळेच या भूमीचे लेकरं असूनही एक उपाशी, एक तुपाशी अशी परिस्थिती आहे. एकाकडे शेकडो एकर जमीन तर दुसरा भूमिहीन, ज्याच्याकडे जगण्याचंही साधन नाही.
त्यांनी सधन लोकांच्या पुढे पुढे करण्यात आयुष्य घालवायचं हे खरंतर अमानवी आहे. मात्र यात कोणाला काही गैर वाटत नाही.
नैसर्गिक साधने एका कडे खूप जास्त, दुसऱ्याकडे काहीच नाही अशी विभागणी निसर्गाने केली नाही तर हे माणसांनी दुसऱ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर केलेलं अतिक्रमण आहे. त्यामुळे कित्येक जीवांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो याचं ज्वलंत उदाहरण, दस्तऐवज म्हणजे ‘तीन निर्झर’ होय.
या संघर्षमय जगण्यातील एक मायेचा झरा असलेली बायनामाय काहीच दिवसाच्या आजारात या जगाचा निरोप घेते. 
त्यावेळी आपण जवळ नसल्याची सल लेखिकेच्या मनात राहून गेलेली दिसून येते.
‘जाऊ देवाजीच्या गावा । देव देईल विसावा ॥’
हा अभंग बायनामायीच्या जीवनास तंतोतंत लागू पडतो असे लेखिका म्हणते. कारण जिवंतपणी तिला थोडाही विसावा मिळालेला नसतो.अख्खं आयुष्य रात्रंदिवस ती कष्टात असते.
म्हणूनच बायना माय ही या आत्मचरित्रातील केवळ एक व्यक्तिरेखा राहत नाही; ती त्या काळातील कष्टकरी स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा बनते.

दुसरा निर्झर — बापू

दुसरा निर्झर बापू. सुभाच्या वडिलांचे वडील. म्हणजेच लेखिकेचे आजोबा. केरबा कांबळे, सगळेजण त्यांना केरबापू म्हणायचे.
एकुलता एक मुलगा निवृत्ती मोतीपुड्याचा ताप मेंदूत गेल्यामुळे एक महिन्याच्या आजारात जगाचा निरोप घेतो. त्यावेळी सुभा केवळ चार वर्षांची होती. केरबापूवर दुःखाचा डोंगर कोसळला. तो पूर्णपणे खचून गेला.
सगळे येऊन त्याला धीर देतात, समजावतात. सुभा सारखी रडत असते. तेव्हा केरबापू आपल्या दुःखावर दगड ठेवून पुन्हा कंबर बांधून उभा राहतो.
सुभाचा जन्मदाता लहान असताना या जगाचा निरोप घेतो. त्यामुळे  केरबापूकडे बापपण येतं. त्यानेही ते अतिशय निष्ठेने निभावले आहे.
 काही ठळक घटनातून ते दिसून येते.
सुभाच्या शिक्षणाच्या संदर्भातील बापूची भूमिका या आत्मचरित्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.
चौथीनंतर सुभाला शाळेत जाण्यास सीता मनाई करते. या मनाईचं कारण दारिद्र्य. सुभा कामं करील तर अधिकचे चार दाणे घरात येतील. पोट भरण्यासाठी तेवढाच आधार होईल, असा विचार करून सीता शुभाच्या शिक्षणाला मनाई करीत होती.
तेव्हा बापू सुभाच्या शिक्षणाच्या आड येऊ नको, माझ्या मुलाची इच्छा होती सुभाला शाळा शिकवायची, तिला शिकू दे, असं सांगून सुभाच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा करतो.
   केरबापूचा महात्मा फुले किंवा इतर कोणत्याही स्त्री उद्धारकाशी दूरपर्यंत संबंध नाही.  त्यानं कधी यांना कुणाला वाचलं, ना ऐकलं, तरीही आपल्या नातीनं शिकावं, ज्ञान संपादन करावं, हा प्रकाशमय विचार त्याच्या मनात त्या काळात आला ज्या काळात मुलीच्या शिक्षणाचा विचारही कुणाच्या मनाला शिवत नव्हता.
हातावरचं पोट, वर्ण व्यवस्थेने लादलेलं सामाजिक मागासलेपण, कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू एवढ्या सगळ्या अडचणीतही केरबापू सुभाच्या शिक्षणाच्या आड कोणतीही बाधा येऊ देत नव्हता.
असेच कनवाळू, विवेकी, मातृहृयी पुरुषच स्त्री उद्धारकर्ते ठरतात. भले ते एक स्त्री जीवनाचा उद्धारकर्ते का असेना.
बापूच्या व्यक्तिरेखेतील माणुसकीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू सुभाच्या आजाराच्या प्रसंगातून समोर येतो.
एका दिवशी घरात कोणी नसता केरबापू शुभ्याच्या बाजेवर येऊन बसतो. तिचे पाय मांडीवर घेऊन तिच्या पायावर हात फिरवत म्हणतो,
“माय सुभा, तुझं कायी वाकड तिकडं पाऊल पडलं असेल तर सांग. मी तुला घेऊन माळीनगरला विठाई कडं जाईन, तू रिकामी झालीस की त्या बाळाला पंढरपूरच्या आश्रमात ठेवू. नंतर आपण गावाला येऊ, कुणाला काय बी कळायचं नाही बघ, पर माझ्या जीवाला असा घोर लावून हातरूनाला पडून राहू नको.”
यावर शुभा म्हणते,
“बापू, इतका विश्वास नाही का माझ्यावर, मला तू असेच ओळखलेस का?”
या शोभाच्या वाक्यावर बापू म्हणतो,
“माय, तुझ्यावर विश्वास तर लई हाय, पर  तरुण वय आहे तुझं, म्हणून माझ्या मनात असा विचार आला बघ. याचं वाईट वाटून घेऊ नको. मी तुझ्या काळजीनंच बोललो बघ माय.”
बापूमधली ही समज, करुणा, मानवता बघून वाचक नतमस्तक होतो. बापूने जीवनाचं ज्ञान कोणत्या विद्यापीठातून घेतलं असावं, असा प्रश्न पडतो.
बापूला नैतिक-अनैतिक, घरची इज्जत यापेक्षा नातीचं जीवन महत्त्वाचं होतं.
बापूच्या व्यक्तिरेखेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सुभाच्या लग्नाची घटना.
    लेखिकेचे पती आत्माराम लोंढे हे सुभा चौथीत असताना तिच्या गावी शिक्षकाची नोकरी करीत असतात. सुभाची शाळा, अभ्यास व्यवस्थित व्हावा म्हणून बापू त्यांना आपल्या घरी येऊन राहायला सांगतो. आत्माराम लोंढे आपल्या पत्नीसह बापूच्या घरी येऊन राहतात. त्यांचं सुभाच्या शाळा व अभ्यासावर लक्ष असतं.
पुढील शिक्षणासाठी ती लातूरला जाते. तेव्हा लोंढे सर तिला दर महिन्याला वीस रुपये पाठवत असतात. सुभा मन लावून अभ्यास करते.
दहावीनंतर जेव्हा तिला डीएडला प्रवेश मिळतो, तेव्हा लोंढे हे तिच्या पहिल्या वर्षाचा खर्च भागविण्यापर्यंत मदत करतात. मात्र दुसरं वर्ष सुरू व्हायच्या आधी ते एक अट घालतात, “तू माझ्याशी लग्न केलं तर मी तुझ्या शेवटच्या वर्षाचा खर्च करीन नाही तर नाही.”
सुभा ते बापूला सांगते. तेव्हा बापू स्पष्ट नकार देतो.
“माझ्या नातीला नोकरी लागली की मी तुझे सगळे पैसे परत करीन; मात्र लग्नाचा विचार मनातून काढून टाक,” असं लोंढे यांची विनवणी करतो.
त्यानंतर लेखिकेची आई सीता मुलीच्या शिक्षणात अडथळा येऊ नये असा विचार करून तीन मुलं असलेल्या आत्माराम लोंढे यांच्याशी भावकीला व बापूला न कळवता चुपचाप सुभाचं लग्न लावून देते.
ही घटना केवळ एका मुलीच्या लग्नाची घटना म्हणून न पाहता, शिक्षण, आर्थिक परावलंबित्व आणि स्त्रीच्या भवितव्याचा प्रश्न म्हणून पाहावा लागतो.
ही गोष्ट भावकीपर्यंत येते, तेव्हा काही उचापती करणारे लोक बापूच्या घरी येतात व म्हणतात,
“तुझ्या सुनेने आम्हाला न सांगता आमचा विचार न घेता परस्पर लेकीचं लग्न लावून दिले. आम्ही तुझं घर वाळीत टाकू,” अशी धमकी देतात.
तेव्हा बापूने घेतलेली भूमिका आदर्श कुटुंबप्रमुख कसा असतो किंवा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
त्यावेळी बापू त्या लोकांना सांगतो,
“हे बघा गड्यांनो माझ्या सुनानं तिच्या लेकीचं लगीन करून दिलं आसल तर तिनं काहीबी वावगं केलं नाही, अगर कुठला मोठा गुन्हा केला नाही.”
यावर भावकी आडून राहते की, तिनं भावकीला विचारलं नाही.
त्यावर बापूचे बोल सर्व समाजाला विचार करायला भाग पाडणारे आहेत.
“अरे बाबा काय विचारायचं होतं भावकीला? भावकीतल्या कुणी पाट्यावरची चटणी तरी दिली का त्या पोरीला? ती भावकी आत्ताच तिच्या लग्नाचा भार उचलणार होती का? मनं भावकीला का विचारलं नाही.
मला वाळीत टाकायचं तर खुशाल टाका. माझं मडं कुणी पाटील नाही तर कुलकर्णी घेऊन जातील मसनात.”
असं बोलून बापू सगळ्यांची तोंड बंद करतो.
या प्रसंगातून बापूची व्यक्तिरेखा एका वेगळ्याच उंचीवर जाते. कुटुंबासाठी प्रेमळ, पण समाजाच्या अवाजवी हस्तक्षेपापुढे मान न झुकवणारा हा बापू खरा बाप माणूस होता.
असा हा बापू चालता बोलता जगाचा निरोप घेतो.

तिसरा निर्झर — सीता
सीता दहा वर्षाची असताना सीताचे वडील वारले. प्रेमळ स्वभावाच्या बायना माय व बापूला, गीता म्हणजेच सीताची आई, आपली परिस्थिती सांगून सीताला तुमची सून करून घ्या अशी विनंती करते. व सीता बापूच्या घरात सून म्हणून येते.
निवृत्ती पहिलवान गडी धष्टपुष्ट शरीर, भरपूर उंची, सावळा रंग, ओठावर भरदार मिशा, तगडा रांगडा गडी. तालमीतून आल्यावर तीन लिटर दुधाची चरवी रीकामी करायची असा निवृत्ती.
सीता मात्र खूप किरकोळ बांधायची, सावळा रंग, मध्यम उंचीची. स्वभाव मात्र फटकळ. लाकूड मोडल्याप्रमाणे कडाकडा बोलायची. त्यामुळे नवरा तिला खूप मारायचा.
या वर्णनातून लेखिकेने केवळ दोन व्यक्तींचं शारीरिक चित्रण केलेलं नाही, तर त्या संसारातील विषमतेचीही जाणीव करून दिली आहे.
लग्नानंतर सुभाच्या आधी सीताला दोन अपत्ये झाली. एक मुलगा व एक मुलगी. मुलगी दोन वर्षात वारली. मुलगा दहा वर्षाचा असताना वारला.
सुभा तिसरे अपत्य. पहिले दोन अपत्य दगावल्याने वडिलांचा सभावर जास्तच जीव होता. तो शेतावर जागलीलाही तिला सोबतच घेऊन जायचा.
सुभानंतर एक मुलगी झाली, मात्र तीही एक वर्षाच्या आतच वारली.
सीता व निवृत्तीचा संसार सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर झोके घेत सुरू होता. त्यातच अचानक निवृत्तीचं आजारपणात जग सोडून जाणं.
नवऱ्याच्या निधनानंतर जन्माला आलेल्या मुलाचाही मृत्यू.
या एका मागे एक आलेल्या संकटाने सीता पूर्णपणे मोडून पडते. भान हरपून जाते. आता मी कशाला जगू? साप चावून आपणही मरावं या विचाराने दिवस दिवस वारूळात हात घालून बसते.
मात्र त्याही दुःखावर मात करून कंबर बांधून उभी राहते व आपल्या मुलीला शिकविण्यासाठी कष्टाचा डोंगर उपसते.
चार जीव एकमेकाला आधार देत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत उजेडाचे स्वप्न पाहण्याची ही कहाणी आहे.
वर्ण व्यवस्थेनं लादलेलं शूद्रत्व, दारिद्र्य व नियतीने लादलेला दुःखाचा डोंगर वागवीत प्रेमाचा झरा आटू न देता जगणाऱ्या लोकांची ही कहाणी होय.
सीतेच्या व्यक्तिरेखेतील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे तिच्या मुलीच्या शिक्षणासाठीची धडपड.
शुभाला पुढील शिक्षणासाठी होस्टेलवर जायचे असते. त्यावेळी सीता वीस रुपयांसाठी सावकाराच्या दारात एक महिना चकरा मारते.
त्यावेळी तो सावकार ‘उद्या ये, परवा ये’ असं म्हणून वीस रुपये कर्ज देण्यास टाळाटाळ करतो. शेवटी, “तुझ्या मुलीला माझ्यासोबत पाठव, मी हॉस्टेलवर नेऊन सोडतो,” असं म्हणतो.
सीता हे घरी येऊन सांगते. सुभाच्या दूरदृष्टीमुळे पुढील अघटीत टळते.
ही घटना मानवी समाज, वर्णव्यवस्था याची काळी बाजू प्रकट करते.
आपल्या आश्रयाला आलेल्या असाहाय, हतबल जीवाला शिकार समजून लचके तोडण्याचा मानस ठेवणे ही माणसाच्या जगाचा विकृत चेहरा आहे.
त्यात भारतीय वर्णव्यवस्थेत दलित स्त्री सर्वात दुर्बल घटक. त्यामुळे तिच्यावर बळाचा वापर करून उपभोग घेण्याची मानसिकता राहिलेली आहे.
शुभाच्या शिक्षणासाठी पैशाची गरज असते तेव्हा सीता सावकाराकडून आलेल्या वाईट अनुभवानंतर एका नातेवाईकाकडे मदत मागायला जाते. तेव्हा तेही काहीतरी गहाण ठेवा असं सांगतात.
ज्यांना आपली माणसं असं म्हटलं जातं ते अडचणीच्या वेळी खरं रूप दाखवून देतात.
नवऱ्याने घेतलेले पितळी भांडे त्यांच्याकडं गहाण ठेवून सीता वीस रुपयांचं कर्ज घेते व शुभाला पुढील शिक्षणासाठी पाठवून देते.
सीतेच्या व्यक्तिरेखेतून लेखिकेने दुःख सहन करणाऱ्या स्त्रीची केवळ हतबलता दाखवलेली नाही, तर दुःखावर मात करून उभी राहण्याची ताकदही दाखवली आहे.
सामाजिक वास्तवाचे भेदक चित्रण
‘तीन निर्झर’चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे आत्मचरित्र वैयक्तिक अनुभव सांगत असताना सामाजिक वास्तवापासून दूर जात नाही.
दारिद्र्य, वर्णव्यवस्था, भूमिहीनता, स्त्रीजीवन, मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सावकारशाही, भावकीची मानसिकता आणि सामाजिक विषमता यांचे अनेक पदर या आत्मचरित्रातून उलगडत जातात.
एकीकडे शेकडो एकर जमीन असलेला सधन वर्ग आणि दुसरीकडे हातावर पोट असलेला भूमिहीन वर्ग, ही विषमता लेखिकेच्या अनुभवातून समोर येते.
नैसर्गिक साधने एका कडे खूप जास्त दुसऱ्याकडे काहीच नाही अशी विभागणी निसर्गाने केली नाही. हे माणसांनी दुसऱ्यांच्या जगण्याच्या अधिकारावर केलेला अतिक्रमण आहे. त्यामुळे कित्येक जीवांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो, याचं ज्वलंत उदाहरण, दस्तऐवज म्हणजे ‘तीन निर्झर’ होय.
स्त्रीच्या वाट्याला येणारा संघर्षही या पुस्तकात वेगवेगळ्या रूपाने दिसतो. बायना माय कष्ट करते, सीता दुःख सहन करते, सुभा शिक्षणासाठी संघर्ष करते.
विशेष म्हणजे या संघर्षात शिक्षण हा केवळ नोकरी मिळविण्याचा मार्ग राहत नाही; तो अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग ठरतो.

भाषाशैली आणि ग्रामीण जीवनाचे चित्रण
लेखिकेने  अचूकपणे व अतिशय नेमकेपणाने केले आहे. म्हणी, वाक्प्रचार, अभंग याचाही छान वापर केला आहे.त्याचबरोबर
शेती, तिथलं जगणं, भोवताल सुंदर रीत्या रेघाटला आहे.
या आत्मचरित्रातील बोलीभाषेचा वापर हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. ‘राकण’, ‘पोरीलाबी’, ‘लई’, ‘काय बी’, ‘माय’ अशा शब्दांतून ग्रामीण जीवनाचा अस्सल पोत जाणवतो.
संवाद हे या लेखनाचे आणखी एक प्रभावी अंग आहे. बापू-मायीचा संवाद असो किंवा बापूच्या तोंडून बाहेर पडलेले भावकीला सुनावणारे शब्द असोत, ते प्रसंगाला केवळ जिवंत करत नाहीत, तर त्या व्यक्तींचा स्वभावही उलगडतात.
लेखिकेने मोठमोठे सिद्धांत मांडण्यापेक्षा प्रसंगांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव वाचकासमोर ठेवले आहे. त्यामुळे वाचक स्वतः त्या वास्तवाचा अर्थ लावतो.
   ‘तीन निर्झर’ वाचताना हा प्रश्न सतत पडतो की हे केवळ आत्मचरित्र आहे का?
उत्तर नकारार्थीच द्यावं लागतं.
कारण लेखिकेच्या वैयक्तिक जीवनाची कथा सांगताना एका विशिष्ट काळातील ग्रामीण, दलित, गरीब आणि संघर्षमय समाजजीवनाचे चित्रण या आत्मचरित्रातून होते.
एका कुटुंबाची कहाणी वाचताना अनेक कुटुंबांची कहाणी त्यात दिसते.
सुभाच्या  शिक्षणाचा संघर्ष वाचताना असंख्य मुलींच्या शिक्षणासाठीच्या संघर्षाची आठवण होते.
 सीतेच्या दुःखातून अनेक स्त्रियांचं दुःख दिसतं.
 बापूच्या भूमिकेतून माणुसकी अजून जिवंत असल्याचा विश्वास निर्माण होतो.
बायना मायीच्या मायेच्या झऱ्यातून जगण्याची उमेद मिळते.
म्हणूनच ‘तीन निर्झर’ हे वैयक्तिक जीवनाचं आत्मकथन असलं तरी त्याला सामाजिक दस्तऐवजाचं महत्त्व प्राप्त होतं.

   या आत्मचरित्राची मोठी ताकद म्हणजे त्यातील अनुभवांची अस्सलता आणि प्रसंगांची दाहकता. मात्र  आत्मकथनात वैयक्तिक अनुभवांची तीव्रता अधिक असल्यामुळे काही प्रसंगातून  व्यापक सामाजिक संदर्भापेक्षा व्यक्तिगत दुःख अधिक पुढे येतं, असं काही ठिकाणी जाणवू शकतं.
तरीही हे या आत्मचरित्राचं मूलभूत महत्त्व कमी करत नाही. उलट वैयक्तिक अनुभवातून सामाजिक वास्तवाकडे जाण्याची हीच प्रक्रिया ‘तीन निर्झर’ला वेगळं स्थान देते.

    अपार कष्टाचा दुःखाचा कहर सोसत असताना सीताच्या मनातील लेकीविषयीचा मायेचा पाझर कोरडा झाला की काय, असा शेवट वाचताना लक्षात येतं. सीताचा शेवट वृद्धाश्रमात झाला याचं दुःखही लेखिकेच्या मनात घर करून आहे.
लेखिकेच्या तरूण मुलाचा मृत्यू ही घटना मनाला चटका लावून जाते.

 ‘तीन निर्झर’ हे केवळ जीवनातील घटनांची नोंद नाही, तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उभ्या राहिलेल्या जिद्दीच्या प्रवासाची नोंद आहे.
ही संघर्षाच्या धगधगत्या वाटेवरील प्रवासाची कहाणी आहे—मायेच्या, माणुसकीच्या जगण्याच्या जिद्दीच्या तीन निर्झरांची कहाणी आहे असं पुन्हा एकदा म्हणावंसं वाटतं !! 

@छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .