कोरी खातेवही | मराठी कविता

कोरी खातेवही 
मीही नसेन कधीतरी
या जगात 
एखादा श्वास ठरेलच 
अखेरचा माझा

जे तुमच्या नावे करता येईल असं 
माझ्या नावावर तर काहीच नाही
माझ्या शिवाय 
आणि तुमच्या शिवाय..

मावळतीच्या सुर्याकडे बघून 
जीवनाला त्याच्या हवाली करून 
झोपी जाते उद्याला ग्रहित न धरता 
त्याआधी कोरी खातेवही 
सोपविणार आहे  तुमच्याकडे 

ज्यात कोणतीही नोंद असणार नाही 
कुणाकडून काही घेतल्याची 
मी लाभार्थी नाही 
कोणत्याच जातीची, धर्माची, व्यवस्थेची 
किंवा काही उसनवारीही 
नाही घेतली कुणाकडून 
 
नाही मिळाली कुठेही वैधता 
माझ्या मानवी प्रतिष्ठेला 

जिने गर्भात वाढवलं त्या आईचे 
आणि ज्याने वाढू देण्याची मुभा दिली 
गाईच्या वासराला करावं 
एवढं प्रेमही केलं त्या जन्मदात्याचे 
ऋण आहेतच या श्वासावर 

बाकी कागदीय, 
रक्तीय, नात्यांचे सगळे 
व्यवहार खोटेच निघाल्यावर 
विषाचा प्याला ओठाशी नेला 
पुन्हा सांडला 
मोडलेला खेळ पुन्हा मांडला 
हे सांडताना मांडताना एकटीच होते

लुटलं  ज्यानं त्यानं 
नात्याचा हवाला देत 
त्या लुटी नंतर कोलमडताना,
सावरताना,जगण्याशी लढताना एकटीच होते 


माझ्या लेकरांनो, 
हे सगळं सांगण्याच कारण एवढंच की,
माझ्या नंतर 
 सांगू नये कुणी माझ्याशी जवळीक 
जात, धर्म, नात्याच्या आधारे 
माझ्या चितेवर पडू नयेत 
इतर कोणतीही फुले 
तुमच्या अश्रू शिवाय 

माझे उन्हाळे, पावसाळे 
वादळं माझीच होती
शेवटी उगाच गर्दी नको माणसांची 

@छाया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .