साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व : अभिप्राय साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व हा ग्रंथ हाती येऊन बरेच दिवस झाले. ग्रंथ वाचून झाला तरी या श्रेष्ठ कलाकृतीवर कसं आणि काय लिहावं याच विवंचनेत होते. लिहिल्याशिवाय राहवलंही नाही. थोडक्यात जमेल तसा मी माझा अभिप्राय नोंदवला आहे. हा ग्रंथ वाचणंच एक पर्वणी आहे. उत्खनन करून भूईच्या गर्भातून अनभिज्ञ असलेल्या गोष्टी बाहेर काढाव्यात तसं सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य, जीवन याचे उत्खनन करून अमूल्य असा ठेवा वाचका हाती दिला आहे. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महामानवावर लिहिणं किंवा बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणती धरावी असं आहे. अण्णा भाऊंची प्रतिभा त्यांचं कर्तृत्व जगमान्य आहे. अण्णा भाऊंना वाचून त्यातील आपल्या कुवतीनुसार काय घेता येईल ते प्रत्येकाने घ्यायला हवे. आणि प्रत्येकासाठी त्यात खूप काही घेण्यासारखं आहे. अण्णा भाऊंना वाचत असताना किंवा कोणत्याही साहित्यिकाला वाचत असताना वाचकाचा दृष्टिकोन जसा आहे त्या अनुषंगाने अर्थ लावण्याची शक्यता असते. कोणा एका चष्म्यातून कलाकृ...