साहित्य सूर्य अण्णाभाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व | पुस्तक परिचय

साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे - कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व : अभिप्राय

साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व हा ग्रंथ हाती येऊन बरेच दिवस झाले. ग्रंथ वाचून झाला तरी या श्रेष्ठ कलाकृतीवर कसं आणि काय लिहावं याच विवंचनेत होते. लिहिल्याशिवाय राहवलंही नाही. थोडक्यात जमेल तसा मी माझा अभिप्राय नोंदवला आहे. हा ग्रंथ वाचणंच एक पर्वणी आहे. उत्खनन करून भूईच्या गर्भातून अनभिज्ञ असलेल्या गोष्टी बाहेर काढाव्यात तसं सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य, जीवन याचे उत्खनन करून अमूल्य असा ठेवा वाचका हाती दिला आहे.

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे या महामानवावर लिहिणं किंवा बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणती धरावी असं आहे. अण्णा भाऊंची प्रतिभा त्यांचं कर्तृत्व जगमान्य आहे. अण्णा भाऊंना वाचून त्यातील आपल्या कुवतीनुसार काय घेता येईल ते प्रत्येकाने घ्यायला हवे. आणि प्रत्येकासाठी त्यात खूप काही घेण्यासारखं आहे. अण्णा भाऊंना वाचत असताना किंवा कोणत्याही साहित्यिकाला वाचत असताना वाचकाचा दृष्टिकोन जसा आहे त्या अनुषंगाने अर्थ लावण्याची शक्यता असते. कोणा एका चष्म्यातून कलाकृतीकडे पाहिले जाते. हे टाळण्यासाठी व त्या साहित्याचे अनेक पैलू स्पष्ट होण्यासाठी समीक्षकाची दृष्टी असणे आवश्यक असते. याच दृष्टिकोनातून आकारास आलेला व अण्णा भाऊंच्या साहित्यावर वेगवेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारा, त्यांच्या साहित्याचे वेगवेगळे पैलू उजागर करणारा महाग्रंथ साहित्य सूर्य अण्णा भाऊ साठे कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व हा सुरेश कृष्णाजी पाटोळे यांच्या चौकस व जबाबदार लेखणीतून आकारास आलेला महत्त्वाचा ग्रंथ आहे.

आतापर्यंत अण्णा भाऊंवर झालेल्या लिखाणापैकी सर्वात दीर्घ असा हा ग्रंथ आहे. डबल क्राऊन साईज सहाशे अडुसष्ठ पानांच्या या महाग्रंथात सुरेश कृष्णाजी पाटोळे यांनी अण्णा भाऊंच्या लिखाणाची सुरुवात, शाहिरी, लोकनाट्यातील क्रांतिकारी विचार, कथालेखन, कादंबरी विश्व, लेखनसूत्र, कादंबरीतील व्यक्तिचित्रण असे अण्णा भाऊंच्या साहित्यातील कितीतरी बारकावे टिपले आहेत.

त्रेपन्न प्रकरण असलेल्या या महाग्रंथात लेखकाने अण्णा भाऊंचे कर्तृत्व, साहित्य व जीवन यावर अतिशय सखोल अभ्यास, चिंतन व मनन करून निर्मिती केली आहे. सुरेश कृष्णाजी पाटोळे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्याचा एकेक पैलू अतिशय चिकित्सकपणे उलगडून दाखवला आहे. लेखकाकडे असलेली डोळस दृष्टी, साहित्य व साहित्यिक यांच्याविषयी असलेला कळवळा, कलेविषयी आत्मीयता, साहित्याकडे पाहण्याचा विस्तृत दृष्टिकोन, चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व प्रतिभा या कारणाने हा ग्रंथ अण्णा भाऊंवर लिहिल्या गेलेल्या आत्तापर्यंतच्या ग्रंथात सर्वोच्च स्थानावर असावा अशा उंचीचा आहे. लेखक म्हणतात, अण्णा भाऊ माझ्यासाठी परके नाहीत. त्यांना मी माझे गुरु म्हणून स्वीकारले आहे. या प्रपंचात गोडवा किती आहे, रुसवा-फुगवा, वेदना, आनंद, दुःख किती आहे हे मी सोसलंय. व्याकूळ झालोय. प्रसंगी हंबरलोय सुद्धा. मनोगतातील ही वाक्यं बरंच काही सांगून जातात. हा ग्रंथ साकार करण्यासाठी लेखकाला अडचणींचे डोंगर पार करावे लागले आहेत. त्यावर मात करून त्यांनी हा प्रपंच तडीस नेला आहे.

पहिल्या प्रकरणात लेखकांनी अण्णा भाऊंच्या शाहिरीचा आढावा घेतला आहे. त्याआधी ग्रामीण लोकसंस्कृती, लोकगीते व शाहिरी याच्या इतिहासाची धावती मांडणी लेखकाने केली आहे. लोककला, शाहिरी या विषयाची अनेक मान्यवरांची अभ्यासपूर्ण मते संदर्भादाखल दिली आहेत. याबरोबरच अण्णा भाऊंच्या पोवाड्यातील काही महत्त्वाचे अंशही दिले आहेत. त्यात अण्णा भाऊंच्या जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पोवाड्यांपैकी एक असलेला स्टालिनग्राडचा पोवाडा वाचायला मिळतो. सोबत या पोवाड्याची रोमहर्षक जन्मकथा ही वाचायला मिळते. एकूणच अण्णा भाऊंच्या साहित्य प्रवासाच्या सुरुवातीपासूनचे तपशील लेखकाने या ग्रंथातून उपलब्ध करून दिले आहेत.

लोकनाट्यातून क्रांतिकारी विचार या प्रकरणात सुरेश पाटोळे यांनी प्रबोधनकारी विचारावर प्रकाश टाकला आहे. अण्णा भाऊंना प्रत्येकजण आपल्या विचाराच्या कोंडवाड्यात कोंडण्याचा प्रयत्न करीत असतो, मात्र सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंच्या मानवतावादी विचारांचा गाभा काढून वाचकांसमोर ठेवला आहे. लेखक म्हणतात, अण्णा भाऊंच्या मनातील समाजव्यवस्था अन्यायविरहित अशी आहे. इथे कोणीच कोणावर अन्याय करणार नाही. अत्याचार करणार नाही. एकमेकांचं शोषण केलं जाणार नाही. लुबाडणूक, फसवाफसवी, लाचखोरी, काळाबाजार, साठेबाजी, भ्रष्टाचार आणि नफेखोरी यांना अजिबात वाव नसेल. स्वार्थ, लालसा याला थारा नसेल. श्रमाला प्रतिष्ठा, माणसाला योग्य तो न्याय, स्वातंत्र्य, बंधुभावाची वागणूक. लोकव्यवहार आणि राजसत्तेला नीतिमत्तेचा आधार असेल. लोकमंगलकारी समताधिष्ठित समाजव्यवस्था अशी मंगल स्वप्नं राज्यव्यवस्थेत स्थापन व्हावीत असं ते सारं क्रांतिकारी धाटणीत येतं. अशी मांडणी करीत लेखक अण्णा भाऊंचं विचारसत्व वाचकाला उलगडून दाखवतात.

अण्णा भाऊंचे कथालेखन या प्रकरणात लेखक सुरेश पाटोळे यांनी अण्णा भाऊंच्या कथालेखनाचा बारकाईने आढावा घेतला आहे. अण्णा भाऊंच्या कलात्मक, विनोदी कथा, दुःखांत कथा, चरित्रात्मक कथा, गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा, अंधश्रद्धेविरुद्धच्या कथा, प्रेमकथा, कौटुंबिक जीवनावरील कथा, तमाशा कलावंतांच्या जीवनावरच्या कथा, आंबेडकरी विचाराने प्रभावित झालेल्या कथा अशा सर्व प्रकारातील कथाविश्वाचा आढावा घेताना अण्णा भाऊंच्या लिखाणाचे वैशिष्ट्य सांगत त्यातील गुणांची अतिशय प्रभावी मांडणी लेखकाने केली आहे.

अण्णा भाऊंच्या कादंबरी लेखनावर प्रकाश टाकताना लेखक म्हणतात, अण्णा भाऊंच्या कादंबरी लेखनाला कला मूल्याचा जसा मेळ आहे तसेच माणसाच्या माणूसपणाचा शोध घेत त्याला माणूस म्हणून कसं जगता येईल याची मांडणी ते करतात. समाजव्यवस्थेतील विषमता, कटू सत्य याविषयी आपल्या मनात असणारी चीडही कादंबरीचा आत्मा बनते. वाचकांच्या आत्म्यात ते विषय, आशय, पात्र, निसर्ग, गुण-अवगुण सारंच आतल्या कोपऱ्यात, मस्तकात घर करून जातात. सुरेश पाटोळे वाचकांना अण्णा भाऊंच्या साहित्याकडे बघण्याचा व समजून घेण्याचा नवा दृष्टिकोन देतात. सगळे पडदे बाजूला सारून अण्णा भाऊंच्या साहित्यातील वास्तवदर्शन लख्खपणे उघडं करून दाखविले आहे.

अण्णा भाऊंच्या नायिका या विषयाची मांडणी करताना लेखक म्हणतात, स्त्रियांचे हक्क, स्वाभिमान, समता यासाठी अण्णा भाऊंची लेखणी झिजते. अण्णा भाऊंचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, तसेच स्वतःची स्त्रीविषयक असलेली श्रद्धा, दृढ विश्वास, स्वाभिमान, आदर इत्यादीचा लेखनातून प्रत्यय येतो. अण्णा भाऊंच्या नायिका समतेचा विचार, हक्कासाठी, शीलाच्या रक्षणासाठी, अन्यायाविरुद्ध खंबीरपणे व आक्रमकपणे लढा देताना दिसतात.

नेमका सुसूत्र आकृतीबंध लेखन कसं असतं याचं उदाहरण म्हणजे अण्णा भाऊंच्या शाहिरीपासून कादंबऱ्यांपर्यंत सारंच नव्या होऊ पाहणाऱ्या लेखकासाठी नक्कीच अभ्यासण्यायोग्य, दिशादर्शक आहे. या शब्दात लेखक सुरेश पाटोळे अण्णा भाऊंचं लेखनसूत्र स्पष्ट करतात. ही नवलेखकांसाठी महत्त्वाची व मार्गदर्शक सूचना ठरते. त्याचबरोबर आचार्य अत्रे, गो. वि. करंदीकर, प्रा. केशव मेश्राम, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सदा कऱ्हाडे या मान्यवरांचे अण्णा भाऊंच्या साहित्यावरील चिंतन वाचायला मिळतं.

अण्णा भाऊंच्या साहित्याचे बारकावे टिपत असताना त्यांच्या लेखनातील वर्णनशैलीबद्दल लेखक लिहितात, अण्णा भाऊंच्या वर्णनशैलीमुळे त्यांच्या साऱ्याच कथा-कादंबऱ्या समृद्ध झाल्या आहेत. त्यावरून शैलीत शब्दसाजणी, आशयघनता यांनी वर्णनाचंही वर्णन करावं असंच आहे.

कथा-कादंबरीतील व्यक्तिचित्रण हा एक महत्त्वाचा भाग त्याला अण्णा भाऊंनी इतका समृद्ध केला की वाचता वाचता ती व्यक्ती आपल्यासमोर उभी राहिली की काय असंच वाटतं. लेखकांनी अण्णा भाऊंच्या कादंबरीतील व्यक्तिचित्रणाविषयी केलेलं भाष्य अतिशय बोलकं व अण्णा भाऊंच्या पात्रांचे गुणविशेष नेमकेपणाने टिपणारे आहे. संदर्भासाठी अनेक कथा व कादंबऱ्यातील व्यक्तिवर्णनं दिली आहेत. बकाजी, रंगू तेली, आबी, अटकळ मधील मैना, बिलोरी, भोमक्या, मूर्ती इत्यादी.

अण्णा भाऊंच्या साहित्यातील गुणरत्नांची वैशिष्ट्ये लेखकाने अतिशय सुंदर रीतीने उलगडून दाखवली आहेत. प्रतिमा, उपमा, निसर्गचित्रण, संघर्षमय वर्णन या प्रकरणांमधून नजरेत भरणारे घटक सुरेश पाटोळे यांनी उजागर करून दाखवले आहेत.

मानवी स्वभावाचं रेखाटन मध्ये लेखक म्हणतात, अण्णा भाऊंनी माणसाकडे बघताना डोळे उघडे ठेवले. बुद्धी शाबूत ठेवून त्यांना त्यांच्या स्वभावानुसार रूप कथा-कादंबरी सोबत इतरही वाङ्मय प्रकारात स्थान दिले आहे. माणसाचे गुण, सद्गुण, दुर्गुण, नीती, वृत्ती-प्रवृत्ती, कृती या साऱ्यांना अण्णा भाऊंनी वाङ्मयीन महत्त्व दिले आहे.

अण्णा भाऊंच्या स्वभावातील कृतज्ञ भावावर भाष्य करताना उपेक्षितांच्या उत्कर्षासाठी झटणाऱ्या साऱ्यांनाच कृतज्ञतेतून त्यांनी सलाम केलाय असं लेखक का म्हणतात याचा उलगडा ग्रंथ वाचत असताना होतो.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गवाणकर यांच्या मैत्रीवर विशेष प्रकाश टाकणारे महत्त्वाचे प्रकरणही यात आहे. हे प्रकरण वाचत असताना साहित्यसम्राटाच्या आतला माणूस उलगडत जातो व मानव कल्याणाचे उत्तुंग ध्येय उराशी बाळगणाऱ्या या मित्रांच्या मैत्रीपुढे मन नतमस्तक होतं तर त्याचा वेदनादायी शेवट चटका लावून जातो.

या साहित्यसम्राटाच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल मराठी साहित्यविश्वाने घेतली नाही याची सडेतोड मांडणी श्रेष्ठत्व नाकारण्याची मनोवृत्ती या प्रकरणातून सुरेश पाटोळे यांनी केली आहे. वर्णव्यवस्थेत संत तुकाराम महाराजांपासून महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आदी बहुजन नायकांवर कसा अन्याय केला आहे याचे अनेक दाखले देत परखड मांडणी केली आहे. अण्णा भाऊ त्या संदर्भात या प्रकरणाच्या शेवटी लेखक म्हणतात, ज्यांचं श्रेष्ठत्व इथल्या तथाकथितांनी नाकारलं अशा या साहित्यिकाच्या नावे संमेलनं भरवली जातात. हा त्यांच्या कर्तृत्वाचा पुरावा आहे. हे सिद्ध झाले आहे. कोंबडं झाकलं तरी दिवस उगवायचा राहत नाही, ही म्हण खरीच म्हणावी लागेल.

ग्रंथाच्या शेवटी अण्णा भाऊ वादाचा नव्हे दावा करण्याचा विषय आहे असं सांगून लोकांनी महामानवांना कोणत्याही वादाच्या जाती-धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून त्यांना उन्नत शिखरावरून खेचून खाली आणू नका असं कळकळीचं आवाहन सुरेश पाटोळे यांनी केलं आहे. हा महाग्रंथ सुरेश पाटोळे यांनी साहित्यरत्नाच्या एकेका जीवन पैलूवर प्रकाश टाकून त्याचं बारकाईने विश्लेषण केलं आहे.

हा ग्रंथ वाचत असताना लेखकाने अफाट परिश्रम घेतल्याचे लक्षात येतं. अण्णा भाऊंच्या संपूर्ण कार्याचं व जीवनाचा सखोल अभ्यास, चिंतन, संशोधन करून सुरेश पाटोळे यांनी या ग्रंथाची निर्मिती केली आहे. अण्णा भाऊंवर आजवर झालेल्या लिखाणामध्ये सर्वश्रेष्ठ तसेच मैलाचा दगड ठरावा असा हा ग्रंथ आहे. लेखक, अभ्यासक, संशोधक, त्याचबरोबर जे अण्णा भाऊंना समजून घेण्याची आस बाळगतात त्या सर्वांना मार्गदर्शन करणारा हा महत्त्वपूर्ण महाग्रंथ आहे.

डॉ. कीर्तिपाल गायकवाड यांचा प्रस्तावना रूपात लाभलेला महत्त्वाचा अभिप्राय व अमित गोरखे यांचे शुभेच्छापत्र स्वरूपात असलेला अभिप्राय यातून या मान्यवरांनी ग्रंथाचे थोडक्यात तरीही समर्पक असे विश्लेषण केले आहे. त्याचबरोबर ग्रंथाच्या आतील रेखाटने ग्रंथाच्या उंचीस साजेशी आहेत.

गुरुवर्य, अण्णा भाऊ साठे हा सापडलेला खजिना तुमच्या पोतडीतलाच आहे. तो तुमचाच आहे. मी त्याची लूट करून तुमच्या चरणी अर्पण करतो, आशीर्वाद द्यावा. ही या ग्रंथाची अर्पण पत्रिका. यातील लेखकाची गुरुंवरील श्रद्धा व कृतज्ञता भाव वाचकाच्या काळजाला भिडणारा आहे.

अपार परिश्रम घेऊन हा ग्रंथ निर्माण केल्याबद्दल लेखक सुरेश पाटोळे यांचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर अण्णा भाऊंवरील दस्तऐवजाचा हा अमूल्य ठेवा समाजाला दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. हा महत्त्वपूर्ण असा महाग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा असं माझं ठाम मत आहे.

छाया बेले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .