आलं आभाळ भरून | मराठी कविता
लई दिसानं आभाळ आज आलया भरून थेंब थेंब झेलायाला धरा ओटी पसरून काळजाची पायघडी केली प्राणांची आरास पापण्याच्या परिघात व्यापलेला तुझा ध्यास इथे जीव ईवलाले उभे कधीचे झुरून तुझ्या थेंबानं बिजाचे आले कोंब तरारून नेसला हिरवा शालू सौभाग्याचं लेणं ल्याली वयातल्या पोरीवाणी धरा न्हातीधुती झाली दिलं सपनाचं दान ओटी भरून नभानं तिच्या कुशीत रुजलं नवं उद्याचं जगणं छाया बेले