//स्त्रीदास्य काल आणि आज//
स्त्रीदास्य - काल आणि आज भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. न्याय, समता आणि शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावे आणि ते हजारो वर्षे टिकून राहावे ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर आणि शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणे हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात आहे. मातृसंस्कृतीचा काळ आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे अशी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते. स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला गणिका असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण, आपल्या जमिनीचे आपल्या कुळात समान वाटप करणारी गणराणी. आम्रपाली सुद्धा अशीच एक गणराणी होती. ती समानतेच्या आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचे निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्र...