//स्त्रीदास्य काल आणि आज//
स्त्रीदास्य - काल आणि आज
भारतीय समाजाला मातृसंस्कृतीचा समृद्ध वारसा लाभला आहे. न्याय, समता आणि शोषणमुक्त व्यवस्थेचा वारसा असूनही या समाजात स्त्रीदास्य अस्तित्वात यावे आणि ते हजारो वर्षे टिकून राहावे ही अतिशय खेदाची बाब आहे. शोषणमुक्त संस्कृतीचे पतन होऊन तिथे भेदावर आणि शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण होणे हीच भारतीय समाजाच्या पतनाची सुरुवात आहे.
मातृसंस्कृतीचा काळ
आदिमानव जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा आपल्या जन्माला फक्त माता कारणीभूत आहे असा त्याचा समज होता. शेतीचा शोध स्त्रीनेच लावलेला असल्याने स्त्रियांमध्ये काहीतरी अलौकिक शक्ती आहे अशी मान्यता होती. त्यामुळे मातृसंस्कृतीत स्त्रियांचे वर्चस्व सर्वांना मान्य होते.
स्त्रीसत्ताक गणव्यवस्थेत स्त्री ही राज्यकर्ती होती. तिला गणिका असे संबोधले जात होते. गणिका म्हणजे गणाची मालकीण, आपल्या जमिनीचे आपल्या कुळात समान वाटप करणारी गणराणी.
आम्रपाली सुद्धा अशीच एक गणराणी होती. ती समानतेच्या आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शासन चालवत असे. त्यामुळेच गौतम बुद्धांनी अनेक राजपुत्रांच्या जेवणाचे निमंत्रण न स्वीकारता आम्रपालीचे निमंत्रण स्वीकारून तिच्या घरी जेवण घेतले.
त्या काळात स्त्री पूजनीय होती. जन्माला येणारी मुले आईच्या नावाने ओळखली जात होती. त्या मुलावर आईचा अधिकार होता. कुटुंबप्रमुखही महिलाच असायची. त्यावेळी माणसामाणसात कुठलाही भेद नव्हता. स्त्री ही जन्मदात्री आणि निर्माती आहे म्हणून आदरणीय होती आणि सगळी सूत्रे व अधिकार तिच्याकडे होते.
या काळातील स्त्रीचे वर्णन करताना डॉ. यशवंत मनोहर यांनी त्यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध या ग्रंथात असे लिहिले आहे, की इ.स. पूर्व तीन हजार वर्षांपर्यंत जगाच्या पाठीवरील स्त्री मुक्त होती. ती पाखरासारखी स्वच्छंदी होती. तिच्या पंखात स्वप्ने होती आणि स्वप्नांपुढे मोकळे असीम आकाश होते. दास्याच्या कोणत्याही बेड्या तिच्या पायात पडल्या नव्हत्या. ती स्वयंप्रकाशित ग्रहासारखी होती.
पितृसत्तेची सुरुवात
पुढे स्त्रीनेच लाकडाने शेती कशी नांगरावी हे दाखवून दिले आणि नांगराचा शोध लागला. पुरुषाचे शेतीवर वर्चस्व प्रस्थापित झाले. त्याचबरोबर मूल जन्माला येण्यात पुरुषाचाही सहभाग असतो याचा बोध माणसाला झाला आणि स्त्रीचे महत्त्व कमी होत गेले.
पुढे विवाह, कुटुंब, धर्म, वर्ण, जाती अशा संस्था निर्माण केल्या गेल्या. आणि हे सगळे टिकवून ठेवण्यासाठी स्त्रीला बंदिस्त आणि गुलाम करून ठेवणे आवश्यक होते. ते साध्य करण्यासाठी स्त्रीचे महत्त्व कमी करून तिला हीन दर्जाची ठरवणे आवश्यक होते. म्हणूनच धर्मशास्त्रे निर्माण केली गेली. साहित्यातून स्त्रीवर अनेक आरोप करीत तिला अनेक बंधनांच्या बेड्यात अडकवले गेले.
मनुस्मृतीतील नियम
उदाहरणासाठी मनुस्मृती मधील स्त्रियांचे धर्म या प्रकरणातील काही नियम येथे देत आहे.
बाल्यावस्थेतील मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईने गृहातील एखादे लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये.
बाल्यावस्थेत पित्याच्या अधीन राहावे, तरुणपणी पतीच्या आज्ञेत असावे व पती मरण पावल्यावर पुत्राच्या अधीन राहावे पण तिने कधीही स्वतंत्र होऊ नये.
पिता, पती किंवा पुत्र यांना सोडून राहण्याची स्त्रीने कधीही इच्छा करू नये.
पती जरी विरुद्ध असला तरी स्त्रीने प्रसन्न मुद्रेने असावे.
पती सदाचारी असो की दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणारा असो की विद्यादि गुणशून्य असो, तो कसा जरी असला तरी साध्वी स्त्रीने देवाप्रमाणे त्याची सतत सेवा करावी.
पती मरण पावल्यानंतर शुभ पुष्पे, मुळे व फळे यांच्या योगाने अल्प आहार करून देहास क्षीण करून सोडावे. परपुरुषाचे नावही घेऊ नये.
याचसोबत पुरुषांसाठी मात्र असा नियम आहे की, पुरुषाने पूर्वी मरण पावलेल्या पत्नीचे अंत्यसंस्कार करून गृहस्थाश्रमासाठी पुत्र असो वा नसो पुनर्विवाह करावा.
स्त्रियांना वेद शिकण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांचे संस्कार वैदिक मंत्राशिवाय करायचे असतात. स्त्रियांना धर्माचे ज्ञान नसते कारण त्यांना वेद शिकण्याचा अधिकार नाही. वैदिक मंत्र उच्चारला तर पाप नष्ट होते, ज्या अर्थी स्त्रिया वैदिक मंत्र उच्चारू शकत नाहीत त्या अर्थी त्या असत्य आणि पापमय स्थितीत राहणाऱ्या आहेत, असे सांगून स्त्रियांना संन्यासवृत्तीचा अधिकारही नाकारला गेला. वेद शिकण्याचा अधिकार कोणी व का नाकारला याचे स्पष्टीकरण मात्र दिलेले नाही.
धर्मशास्त्राच्या पानापानातून स्त्रियांना अपमानित, लाचार बनवणारे आणि त्यांचे माणूसपण नाकारणारे कायदे एवढ्या हीनपणे तयार केले गेले की पशूपेक्षाही हीन दर्जा स्त्रीला देण्यात आला.
मातृसंस्कृतीत ज्या गोष्टींना प्रतिष्ठा होती त्या गोष्टी हीन ठरवल्या गेल्या. मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी योनीरूपात उपासना केली जात होती, त्यास धर्मशास्त्रांनी नरकाचे द्वार ठरवले. तिचे चरित्र, शील आणि पवित्रता सर्व फक्त योनीशुचितेशी जोडून तिच्या अस्तित्वाचा संकोच करण्यात आला.
*ताराबाई शिंदे यांचा प्रतिकार*
या कपटपूर्ण तयार केलेल्या नियमांचा ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथात चांगलाच समाचार घेतला आहे. त्या लिहितात, एकदा सौभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली तोंडे एखाद्या महान खुन्यापेक्षाही महा अपराधीप्रमाणे काळी करून आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे, त्याप्रमाणे बायका मेल्या म्हणजे पुरुषांनी दाढ्या मिशा भादरून जन्मभर अरण्यवासात का राहू नये. एक बायको मेली म्हणजे दहाव्या दिवशी दुसरी करून आणावी असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे.
ताराबाई शिंदे यांनी अठराशे ब्याऐंशी साली व्यवस्थेचे ढोंग अशा शब्दांत उघडे पाडले. ताराबाई शिंदे सारखी एखादीच क्रांतिकारी महिला सोडली तर इतर सगळ्याजणी एकविसाव्या शतकातही हे गुलामीचे गाठोडे विनातक्रार वागवत आहेत.
एकविसाव्या शतकातही बिनदिक्कतपणे आईकडून मुलीकडे चांगल्या संस्कारांची शिदोरी समजून गुलामीच्या बेड्या अडकवल्या जातात. मात्र आपल्याला गुलाम करणारे विचार आपल्याला मुक्ती देऊ शकत नाहीत हे अजूनही स्त्रियांच्या लक्षात येत नाही.
आजची स्थिती
महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज शिक्षणाच्या वाटा मोकळ्या आहेत. मात्र आपण आत्मविकास करू शकलो का हा चिंतनाचा विषय आहे. आपल्यात स्वतंत्र विचार क्षमता विकसित झाली आहे का. आपण स्वतःला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व समजतो का की एखाद्या जात धर्मातील स्त्री समजतो. जाती धर्म स्त्रियांनी निर्माण केले नाहीत. या संस्थांनी स्त्रियांना गुलामच केले, मग या गोष्टीचा एवढा दुराभिमान का बाळगावा याचा स्त्रियांनी विचार करायला हवा.
आर्थिक परावलंबित्व हे गुलामीचे एक महत्त्वाचे कारण आहे. स्वावलंबी होत महिलांनी आत्मसन्मानाच्या जगण्याचा पुरस्कार करायला हवा.
स्त्री ही जन्मत नाही तर घडविली जाते हे सिमोन द बोव्हुआर या लेखिकेचे वाक्य समस्त स्त्री जीवनाचा सार आहे.
हुंडा पद्धत आणि इतर रूढी
स्त्री विरोधी दुष्ट रूढींपैकी एक म्हणजे हुंडा पद्धत. समाजात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे एका विशिष्ट घटकाचे माणूसपण हिरावले जाते. भारतीय समाजात स्त्रीचे जीवन अवघड करण्यासाठी हुंडा पद्धतीला प्रतिष्ठा देऊन संस्कृतीच्या नावाखाली मानव विक्रीच्या बाजाराला प्रतिष्ठा मिळवून दिली.
खरेदी विक्रीच्या व्यवहारात पैसे देऊन खरेदी केलेली गोष्ट मालकाच्या हक्काची होते. मात्र स्त्रीला दुसऱ्याच्या घरी जाण्यासाठी, जिथे ती आपली सगळी हयात खर्ची घालणार असते, तेच लोक तिच्या आई वडिलांकडून पैसे घेतात. यापेक्षा स्त्री जीवनाची प्रतारणा काय असू शकते. आणि यात गैर असे कुणालाच वाटत नाही. मुली सुद्धा आपल्या बापाने जास्त हुंडा दिल्याचा थाट मिरवत असतात. मात्र हा त्यांचा जास्त अपमान आहे हेच त्यांना कळत नाही.
हुंडा कमी म्हणून छळ, रोज माहेरच्यांचा पाणउतारा हे सगळे तिला निमूटपणे ऐकून घ्यावेच लागते. कारण आता माहेर परके झालेले असते. ग्रामीण भागातच नाही तर नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय सुशिक्षितांच्या घरातही उच्चशिक्षित स्त्रियांची हीच अवस्था आहे.
घराबाहेर पडून नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांनाही या पुरुषसत्ताक मानसिकतेला सामोरे जावे लागते. सहकारी किंवा वरिष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेलच असे नाही. तिने ते धुडकावून लावले तर अडवणूक करणे, त्रास देणे, ब्लॅकमेल करणे, टिंगल टवाळी करणे अशा गोष्टी केल्या जातात. हे सगळे का होते तर याच्या मुळाशी तिला भोगवस्तू समजणारी पारंपारिक मानसिकता कारणीभूत आहे.
काही दिवसांपूर्वी मी टू चळवळीद्वारे अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाविषयी बोलण्यास सुरुवात केली. अनेकांच्या मनात बराच काळ घुसमटत राहिलेले यातून बाहेर पडले.
चित्रपट किंवा मालिकांमधून हेच विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. सहन करीत जाणारी, निर्णय न घेणारी आदर्श सून आणि शिकलेली स्त्री वाईट व चारित्र्यहीन दाखवली जाते. खानदान की इज्जत या संकल्पना अधिक मजबूत करून तिच्या पायातील बेड्या मजबूत केल्या जात आहेत. या संकुचित विचारांतून आजही ऑनर किलिंगच्या घटना घडतात.
आधुनिकतेच्या नावाखाली फसवणूक
दुसरा मुद्दा असा की आधुनिकतेच्या नावाखाली स्त्रियांची अशी काही फसवणूक केली जाते आहे की हे महिलांच्याही लक्षात येत नाही. कपड्यांचे उदाहरण घ्या. स्त्रियांचे कपडे घरी तयार होत नाहीत, कंपनीच ते तयार करते. मग फक्त स्त्रियांचेच कपडे स्लीव्हलेस, नेकलेस, बॅकलेस, ऑफ शोल्डर अशा रितीने बनवले जातात की तिचे अंग उघडे पडेल. जे कपडे बनवले जातात त्याची जाहिरात अशी केली जाते की हे कपडे घातले तरच तुमच्या जीवनाला अर्थ आहे. हे पुरुषी व्यवस्थेचे षडयंत्र आपण ओळखायला हवे.
रात्रंदिवस चालणाऱ्या टीव्ही मालिकांमधून हेच काम सुरू आहे. फुल मेकअपमध्ये वावरणाऱ्या स्त्रियांना बघून घरात वावरणारी गृहिणी सुद्धा तशीच दिसण्यासाठी जीवाचे रान करते.
तुम्हाला स्वतःला वाटत असेल की तुम्ही माणूस आहात तर तुम्हाला हे इतरांनाही स्वीकारायला भाग पाडावे लागेल. त्यासाठी कुठल्याही मेकअपची गरज नाही.
कुठल्याही मेकअपचा थर न चढवता आपले नाव अजरामर करणाऱ्या अनेक स्त्रिया होऊन गेल्या. देशाचे राष्ट्रपती पद भूषविणाऱ्या प्रतिभाताई पाटील, किरण बेदी, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला, अतिशय हालाखीच्या परिस्थितीत वाढून देशाला पाच गोल्ड मेडल जिंकून देणारी हिमा दास अशी कितीतरी नावे सांगता येतील.
समारोप
स्त्री पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत. शरीररचना ही वेगळी असणे हे सर्वच प्राणीमात्रांमध्ये प्रजननासाठी निसर्गानेच निर्माण केले आहे. त्यावरून कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरू शकत नाही.
ही दास्यत्वाची आणि स्वामित्वाची भावना नष्ट होऊन पुरुष जेव्हा तिचे माणूसपण मोकळ्या मनाने स्वीकारेल तेव्हा समाजातील अस्वस्थता संपेल आणि एक निकोप, सुदृढ व सुसंस्कृत समाज अस्तित्वात येईल. हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत स्त्रीदास्य टिकून राहील.
संदर्भ
स्त्री पुरुष तुलना - ताराबाई शिंदे
स्त्री आणि हिंदू संस्कृती - आ. ह. साळुंके
श्रीमनुस्मृति
हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती
डॉ. आंबेडकर आणि स्त्रीमुक्तीचे युद्ध - डॉ. यशवंत मनोहर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा