वाटाड्या बायका | मराठी कविता
त्या पणतीच्या आकाराच्या वाटाड्या बायका फिरत असतात अंधाऱ्या गल्ली बोळातून हातात एकेक दिवा घेऊन दिसताच किलकिले दार शिरतात आत जमलं मेंदू पर्यंत खणतात मेंदू, पेटवतात ज्योत पुसतात देहखुणा सुबक अक्षरात लिहितात माणूस वाटमारी करायला पुढे आलेल्या परिचित अपरिचित हातावर ठेवतात उजेड काळाच्या टोकापासून निघालेल्या त्या बायका गातात दुर्बोध गाणी न्याय समता मानवमुक्तीची त्या बायका विध्वंसक गणल्या गेल्यात करतात निद्रानाश घडवतात स्फोट पेरतात दाह... अनेक कलमाखाली ठरतात अपराधी दुषणाचे हार सांभाळत त्या चालत राहतात... उजेड होऊन उजेड देत.. @छाया बेले.