स्त्रीवाद म्हणजे काय? | समानता, स्वातंत्र्य आणि वैश्विक मानवमुक्तीची संकल्पना | मराठी लेख
स्त्रीवाद म्हणजे काय? - एक वैश्विक मानवमुक्तीची संकल्पना
"स्त्रीवाद" ही संकल्पना वैश्विक मानवमुक्तीची संकल्पना आहे. या संकल्पनेला शोषण विरहित समाज अभिप्रेत असून त्यासाठी आग्रही असणे म्हणजेच स्त्रीवाद.
आज स्त्रीवादावर खूप टीका होताना आपल्याला दिसून येते. स्त्रियांचे स्वैर वागणे म्हणजे "स्त्रीवाद" असा संकुचित अर्थ काढून या उदात्त विचारधारेचं जाणीवपूर्वक विकृतीकरण करण्याचं, अपप्रचार करण्याचं कारस्थान पुरुषसत्ताक संस्कृतीच्या ठेकेदारांकडून केलं जात आहे.
याचं कारण एकच आहे. ही शोषणावर आधारित समाज व्यवस्था त्यांना टिकवून ठेवायची आहे.
स्त्रीवाद म्हणजे पुरुषांचा द्वेष नव्हे. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने माणूस म्हणून जगण्याचा हक्क मागणे. स्त्रीवाद म्हणजे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि प्रतिष्ठा या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणे.
मातृसत्ताक समाजाचे अस्तित्व
पूर्वीच्या काळात जगभरात कमी-अधिक प्रमाणात मातृसत्ताक समाज अस्तित्वात होता. हे अनेक संशोधक, इतिहासकारांनी संशोधनातून सिद्ध केले आहे. त्या काळात स्त्री ही केंद्रस्थानी होती. कारण जन्माचे रहस्य फक्त आईच्या भोवती होते. शेतीचा शोध स्त्रीने लावला होता. ती निर्माती होती, पालनकर्ती होती.
पुरुषसत्ताक व्यवस्थेची सुरुवात कशी झाली?
कृषी संस्कृतीची सुरुवात झाली. माणूस स्थिर झाला, जमीन, घर, पशुधन ही संपत्ती निर्माण झाली. तेथूनच पुरुषसत्ताक समाज निर्मितीची सुरुवात झाली. आपली संपत्ती आपल्याच रक्तातील वारसाकडे, आपल्या कुटुंबात राहावी हे मूळ कारण होते. आपलाच मुलगा आपला वारस आहे याची खात्री पटण्यासाठी स्त्रीच्या शरीरावर नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले.
यासाठी योनीशुचितेचा नियम कडक करणे गरजेचे होते. या व्यवस्थेचे स्थापन करण्याचे लक्ष साध्य करण्यासाठी स्त्री ही कैद होणे गरजेचे होते. म्हणून तिला सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित करण्यात आले.
अधिकार कसे काढून घेतले गेले?
लग्न करून तिला आता दुसऱ्या घरी जाऊन राहणे भाग पाडले. माहेरचा संबंध तोडला गेला. ती माहेरचीही राहिली नाही आणि सासरचीही पूर्णपणे झाली नाही. तिची प्राण्यांसारखी विक्री होऊ लागली. कन्यादानाच्या नावाखाली तिला वस्तू बनवले गेले.
तिचा आपल्या आई-वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार काढून घेण्यात आला. नवऱ्याच्या संपत्तीवरही तिला अधिकार नव्हता. आपल्या मुलावरचा अधिकारही राहिला नाही. मुलांचा अधिकार नवऱ्याकडे आला. ती फक्त जन्म देऊन पोषण करण्याच्या कामापुरती मर्यादित होऊन राहिली. इथून पुढे तिची अधपतनाकडेच वाटचाल सुरू राहिली.
ग्रंथांच्या आधारे व्यवस्था मजबूत केली
ही व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक ग्रंथ लिहिले गेले. तिला तुच्छ लेखणारे, हीन लेखणारे विचार त्यातून रुजवले गेले. मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रातून तिला दृष्ट, पापी, अपवित्र ठरवले गेले. तिच्या चारित्र्यावरच सगळे प्रश्न उभे केले गेले. ती बुद्धीहीन आहे, ती निर्णय घेऊ शकत नाही, तिला स्वतंत्र अस्तित्व नाही असे शिकवले गेले.
हेच विचार पुढे साहित्य, कथा, पुराण, म्हणी, शिव्या यातून पिढी दर पिढी मनावर बिंबवले गेले. जेणेकरून तिलाच वाटावे की आपण दुय्यम आहोत, आपणच अपवित्र आहोत.
आजचा स्त्रीवाद का गरजेचा आहे?
आज जेव्हा स्त्री शिकते, कमवते, प्रश्न विचारते, तेव्हा तीच पुरुषसत्ताक मानसिकता तिला "स्वैर", "उद्धट", "संस्कृतीहीन" ठरवते. खरं तर ती स्वैर नाही, ती स्वतंत्र होऊ पाहते. तिला आता कोठडीत राहायचे नाही. तिला माणूस म्हणून जगायचे आहे.
म्हणून स्त्रीवाद म्हणजे फक्त स्त्रियांच्या मुक्तीचा विषय नाही. तो संपूर्ण मानवाच्या मुक्तीचा विषय आहे. जोपर्यंत स्त्री गुलाम आहे, तोपर्यंत हा समाज स्वतंत्र होऊ शकत नाही. जोपर्यंत स्त्रीला भोगवस्तू समजले जाते, तोपर्यंत हा समाज सुसंस्कृत होऊ शकत नाही.
स्त्रीवाद म्हणजे शोषक व्यवस्थेच्या विरोधात बंड. स्त्रीवाद म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा आग्रह.
छाया बेले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा