वटपौर्णिमा : श्रद्धा, परंपरा व स्त्रीच्या मानसिक गुलामगिरीचा प्रश्न
वटपौर्णिमा : श्रद्धा, परंपरा स्त्रीच्या मानसिक गुलामगिरीचा प्रश्न आज वटपौर्णिमा. अनेक महिला साडी, दागिने, मेहंदी आणि पारंपरिक साजशृंगार करून सकाळी वडाच्या झाडाची पूजा करतात. सात जन्म हाच पती लाभावा आणि त्याचे दीर्घायुष्य लाभावे, या श्रद्धेने त्या वडाला दोरे गुंडाळतात. मात्र हा विधी करताना आपल्या मनात एकदातरी प्रश्न निर्माण होतो का? हे सगळं आपण का करतो आहोत? खरोखरच वडाच्या झाडाला दोरे गुंडाळल्याने पतीचे आरोग्य चांगले राहते का? किंवा सात जन्म हाच पती लाभेल, याचा कोणताही पुरावा आहे का? दुसरा जन्म आहे की नाही, हेच निश्चित माहीत नसताना अशा विश्वासाला आपण अंतिम सत्य कसे मानू शकतो? दररोज नवऱ्याशी खडाजंगी करणाऱ्या, त्याच्याशी विसंवाद असलेल्या स्त्रियाही अत्यंत भक्तिभावाने ही पूजा करतात. मग त्यांच्या पतीलाही तीच पत्नी सात जन्म हवी असेल का? तोही कदाचित मनोमन अशी प्रार्थना करत असेल का की तिची प्रार्थना निष्फळ ठरावी? दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या पुरुषाची पत्नीही त्यालाच पुन्हा सात जन्म पती म्हणून मागत असेल का? असे अनेक प्रश्न मनात येतात. निसर्ग आणि स्त्री यांच्यात स...