वटपौर्णिमा : श्रद्धा, परंपरा व स्त्रीच्या मानसिक गुलामगिरीचा प्रश्न
वटपौर्णिमा : श्रद्धा, परंपरा स्त्रीच्या मानसिक गुलामगिरीचा प्रश्न
आज वटपौर्णिमा. अनेक महिला साडी, दागिने, मेहंदी आणि पारंपरिक साजशृंगार करून सकाळी वडाच्या झाडाची पूजा करतात. सात जन्म हाच पती लाभावा आणि त्याचे दीर्घायुष्य लाभावे, या श्रद्धेने त्या वडाला दोरे गुंडाळतात.
मात्र हा विधी करताना आपल्या मनात एकदातरी प्रश्न निर्माण होतो का? हे सगळं आपण का करतो आहोत?
खरोखरच वडाच्या झाडाला दोरे गुंडाळल्याने पतीचे आरोग्य चांगले राहते का? किंवा सात जन्म हाच पती लाभेल, याचा कोणताही पुरावा आहे का? दुसरा जन्म आहे की नाही, हेच निश्चित माहीत नसताना अशा विश्वासाला आपण अंतिम सत्य कसे मानू शकतो?
दररोज नवऱ्याशी खडाजंगी करणाऱ्या, त्याच्याशी विसंवाद असलेल्या स्त्रियाही अत्यंत भक्तिभावाने ही पूजा करतात. मग त्यांच्या पतीलाही तीच पत्नी सात जन्म हवी असेल का? तोही कदाचित मनोमन अशी प्रार्थना करत असेल का की तिची प्रार्थना निष्फळ ठरावी? दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या पुरुषाची पत्नीही त्यालाच पुन्हा सात जन्म पती म्हणून मागत असेल का? असे अनेक प्रश्न मनात येतात.
निसर्ग आणि स्त्री यांच्यात सृजनाची समान शक्ती आहे. म्हणूनच स्त्रीला झाडे, फुले, निसर्ग यांचे सहज आकर्षण असते. जपणूक करणे हा तिचा स्वभाव आहे. काही अभ्यासकांच्या मते, शेतीच्या प्रारंभिक विकासात स्त्रियांची महत्त्वाची भूमिका होती. ती कायम झाडे, फुले, पाने, निसर्ग यांच्या सहवासात रमलेली असते.
परंतु इतिहासाच्या प्रवासात स्त्रीच्या या गुणांनाच तिच्या बंधनांचे साधन बनवले गेले. तिच्या प्रेम, त्याग, ममता आणि संवेदनशीलतेचा उपयोग करून तिलाच दुय्यम स्थान देण्यात आले आणि पुरुषसत्तेला अधिक महत्त्व प्राप्त करून देण्यात आले.
वटपौर्णिमेच्या कथेत सावित्री यमाकडे वडिलांचे राज्य, सासऱ्याची दृष्टी आणि पतीचा जीव मागते. पण ती स्वतःचे, आपल्या आईचे, बहिणीचे, मैत्रिणीचे किंवा इतर कोणत्याही स्त्रीच्या कल्याणाचे वरदान का मागत नाही? ही कथा ज्या मूल्यांची जपणूक करते, त्यांचाही चिकित्सक विचार होणे आवश्यक आहे.
आपल्या अनेक परंपरा स्त्रीच्या पातिव्रत्याशी जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक वेळी तिने काही ना काही विधी करून आपली निष्ठा सिद्ध करावी, अशी अपेक्षा ठेवली गेली. जर तिने हे केले नाही तर घरातील माणसे आणि समाज तिच्याकडे संशयाने पाहतो. त्यामुळे अनेक स्त्रिया श्रद्धेपेक्षा सामाजिक दबावामुळे या परंपरा पाळतात. संस्कृतीची जपणूक या गोंडस नावाखाली त्या नकळत स्वतःवरच लादलेल्या जोखडाचे ओझे वाहत राहतात.
खरे तर कोणत्याही नात्याचा पाया विधींवर नसतो. परस्परांवरील प्रेम, विश्वास, आदर, समजूतदारपणा, सुख-दुःखात साथ, एकमेकांच्या प्रगतीसाठी उभे राहणे, नात्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा परस्पर सन्मान करणे—हीच नात्याची खरी ताकद असते. निष्ठा सिद्ध करण्यासाठी बाह्य दिखाव्याची किंवा अशा विधींची गरज नसते.
इतिहासात मातृप्रधान समाजरचना अस्तित्वात असल्याचे अनेक अभ्यासक मांडतात. त्यानंतर पुरुषसत्ताक व्यवस्था अधिक बळकट होत गेली. त्या प्रक्रियेत स्त्रीच्या भूमिकेला कमी लेखणाऱ्या अनेक कथा, रूढी आणि सामाजिक नियम निर्माण झाले. पुराणातील नायकांच्या तोंडी विचार घालून अनेक कथांना धार्मिक स्वरूप देण्यात आले. स्त्रीला पापी, दुय्यम आणि पुरुषावर अवलंबून असल्याची मानसिकता समाजात खोलवर रुजवली गेली. स्त्रीच्या सृजनशक्तीचे महत्त्व कमी करण्यात आले. मासिक पाळीसारख्या नैसर्गिक आणि सृजनाशी निगडित प्रक्रियेलाही अमंगल ठरवले गेले. सतीप्रथेसारख्या अमानुष प्रथा उदयास आल्या आणि स्त्रियांच्या शिक्षणावरही बंधने घालण्यात आली.
कारण अज्ञानी माणूस गुलाम राहतो; पण ज्ञान आत्मभान जागवते. आत्मभान जागले की अन्यायाविरुद्ध प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच ज्ञानापासून वंचित ठेवणे ही शोषणाची एक पद्धत होती. ज्यांच्या विचारांमुळे स्थापित व्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांच्यावर कठोर सामाजिक आणि धार्मिक बंधने लादली गेली. रूढी आणि परंपरा या अनेकदा अशाच बंधनांच्या वाहक ठरल्या. आपण त्यांचे पालन करताना नकळत स्वतःच्याच विरोधात उभे राहतो.
या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करत महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. शिक्षणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल झाले, तरी मानसिक गुलामगिरी पूर्णपणे संपली आहे, असे म्हणणे कठीण आहे. आजही अनेक सुशिक्षित स्त्रिया या परंपरांचे अत्यंत काटेकोर पालन करतात. शिक्षण मिळाले, नोकऱ्या मिळाल्या, आर्थिक स्वावलंबन वाढले; पण विचारांचे स्वातंत्र्य आणि रूढींचे चिकित्सक परीक्षण करण्याची तयारी अजूनही व्यापक प्रमाणात दिसत नाही.
संस्कृती जपणे आणि अन्यायकारक परंपरा टिकवणे यात मूलभूत फरक आहे. प्रत्येक परंपरेचे मूल्यांकन विवेकाने झाले पाहिजे. जी परंपरा माणसाचे स्वातंत्र्य, समानता आणि सन्मान वाढवते ती स्वीकारावी; जी शोषण टिकवते, तिला प्रश्न विचारले पाहिजेत. परंपरा टिकवण्यापेक्षा न्याय, समता आणि मानवी मूल्ये टिकवणे अधिक महत्त्वाचे आहे.
आज ज्ञानाचा प्रकाश आपल्या दारी आला आहे. आता डोळे उघडे ठेवून पाहण्याची, विचार करण्याची आणि योग्य-अयोग्याचा निर्णय स्वतःच्या विवेकाने घेण्याची वेळ आली आहे. एवढ्या दीर्घकाळ मनावर रुजलेले संस्कार एका दिवसात बदलणार नाहीत. पण प्रत्येक परिवर्तनाची सुरुवात एका प्रश्नापासूनच होत असते. चुकीच्या गोष्टींना नकार देण्याचे धैर्य आपण दाखवले, तरच शोषणमुक्त आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य होईल.
वटपौर्णिमा साजरी करायचीच असेल, तर प्रत्येक महिलेने वडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा वडाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करावे. निसर्गसंवर्धन, पर्यावरणरक्षण आणि समानतेचा संदेश देणारी ही परंपरा अधिक अर्थपूर्ण ठरू शकते. श्रद्धा ही विवेकाच्या प्रकाशात उभी राहिली, तरच समाज अधिक न्याय्य, समतावादी आणि मानवी बनेल.
— छाया बेले
हेही वाचा 👇
स्त्रीयांच्या शोषणावर आधारित मानवी कुटुंब व्यवस्था
भारतीय समाजात स्त्रीजीवन असेच का आहे?
वैवाहिक जीवनातील अपेक्षा व वास्तव
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा