स्त्रियांच्या शोषणावर उभी आहे मानवी कुटुंब व्यवस्था : एक सामाजिक वास्तव | मराठी लेख
स्त्रियांच्या शोषणावर उभी आहे मानवी कुटुंब व्यवस्था : एक सामाजिक वास्तव
अलिकडेच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं भाष्य केले आहे - "महिला या होम मेकर तर आहेतच त्याचबरोबर त्या राष्ट्रनिर्मात्या आहेत.त्यांच्या श्रमाला मुल्य आहे."
उशिरा का होईना देशाच्या न्याय व्यवस्थेने महिलांचं महत्व अधोरेखित केले आहे, हेही नसे थोडके .
मानवी समाजाचा पाया कोणता? असा जर प्रश्न विचारला तर त्याचे सर्वसाधारण उत्तर "कुटुंब" असे दिले जाते. कुटुंब ही केवळ राहण्याची व्यवस्था नाही; ती माणसाला प्रेम, सुरक्षितता, संस्कार, ओळख आणि सामाजिक स्थान, व प्रतिष्ठा देणारी संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीचा पहिला समाज म्हणजे त्याचे कुटुंब. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेला मानवी संस्कृतीचा कणा मानले जाते.
परंतु या कुटुंब व्यवस्थेकडे बारकाईने पाहिले, तर एक अस्वस्थ करणारे वास्तव समोर येते.
कुटुंबव्यवस्था ही शतकानुशतके स्त्रियांच्या त्यागावर, श्रमांवर, सहनशीलतेवर, त्यांच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर व्यवस्था उभी आहे.
हा केवळ स्त्रीवादी विचार नाही तर हे सामाजिक वास्तव आहे.
आज अनेक संवेदनशील पुरुष आणि स्त्रियाही याचा विचार करत आहेत. ही जागरूकता आशेचा किरण आहे असं म्हणायला हरकत नाही.
कुटुंब व्यवस्था आणि पितृसत्ताक रचना
मानवी इतिहासात मातृसत्ताक संस्कृतीचा लय होताना व
कुटुंब व्यवस्थेचा विकास होत असताना मालमत्ता, वारसा आणि वंशपरंपरा यांना महत्त्व प्राप्त झाले. त्यातून पुरुषकेंद्री सामाजिक रचना निर्माण झाली. घरातील प्रमुख, निर्णयकर्ता आणि मालमत्तेचा मालक म्हणून पुरुषाने आपली भूमिका निश्चित करून सत्ता हाती घेतली, तर स्त्रीला घर, मुलांचे संगोपन आणि सेवा यापुरते मर्यादित करण्यात आले.
ही विभागणी नैसर्गिक नव्हती, तर ती सामाजिक विषमतेला पोषक ठरणारी होती. हळूहळू समाजाने तिला परंपरेचे रूप दिले. स्त्रीच्या कर्तृत्वापेक्षा तिच्या समर्पणाचे महत्त्व वाढवले गेले. तिच्या स्वप्नांपेक्षा कुटुंबाची गरज मोठी मानली गेली. कुटुंबाच्या सर्व गरजांची पूर्तता करणे हे काम स्त्रीच्या खांद्यावर टाकले गेले.
अशा प्रकारे स्त्रीची ओळख स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे, तर कोणाची तरी मुलगी, पत्नी किंवा आई म्हणून घडवली गेली. तिचं स्वातंत्र्य व स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आणलं गेलं.
श्रमांची न संपणारी कहाणी
कुटुंब व्यवस्थेतील सर्वात मोठे वास्तव म्हणजे स्त्रियांचे श्रम बेमोल असतात . पहाटेपासून रात्रीपर्यंत चालणारे घरकाम, स्वयंपाक, स्वच्छता, पाणी भरणे, मुलांची काळजी, वृद्धांची सेवा, पाहुणचार, आजारी व्यक्तींची देखभाल—या सर्व कामांना "काम" म्हणूनही अनेकदा मान्यता दिली जात नाही.
एखादी गृहिणी दिवसभर घरासाठी झटत असते, पण संध्याकाळी कोणी विचारते, "तू दिवसभर करतेस तरी काय?" या एका प्रश्नात समाजाची असंवेदनशील मानसिकता दडलेली आहे. ज्या श्रमांवर संपूर्ण कुटुंबाचे जीवन सुरळीत चालते, त्यांना आर्थिक मूल्य नाही. त्यामुळे त्या श्रमांचे महत्त्वही कमी लेखले जाते.
जर घरातील सर्व कामांसाठी बाहेरची माणसे ठेवली, तर त्यासाठी किती मोठा खर्च करावा लागेल याचा विचार कोणी करत नाही.
तीच कामे स्त्री करते, तेव्हा ती तिची जबाबदारी मानली जाते. हेच शोषणाचे सर्वात सूक्ष्म व खोल स्वरूप आहे.
भावनिक श्रमांचे अदृश्य ओझे
स्त्री केवळ घरकाम करत नाही; ती घरातील भावनिक संतुलनही सांभाळत असते. कोण रागावले आहे, कोण नाराज आहे, कोणाला काय हवे आहे, मुलांच्या समस्या काय आहेत, वृद्धांना काय त्रास आहे—या सगळ्यांची काळजी ती घेत असते.
घरातील अनेक नातेसंबंध तिच्या संयमावर टिकून असतात.
स्वतःच्या भावना, अपेक्षा बाजूला ठेवून ती इतरांच्या आनंदासाठी जगत असते. अनेक स्त्रिया आयुष्यभर स्वतःला व्यक्तच करू शकत नाहीत. त्यांना रडण्याची, थकण्याची किंवा हार मानण्याचीही मुभा नसते.
ही भावनिक जबाबदारी कोणत्याही वेतनाशिवाय आणि कोणत्याही मान्यतेशिवाय पार पाडली जाते. त्यामुळे मानसिक थकवा, नैराश्य आणि एकटेपणा अनेक स्त्रियांच्या जीवनाचा भाग बनतो. तो तिच्यासारखाच दुर्लक्षित असतो.
विवाह संस्था आणि स्त्रीचे विस्थापित आयुष्य
विवाह ही कुटुंब व्यवस्थेची मध्यवर्ती संस्था आहे. परंतु विवाहानंतर सर्वाधिक बदल स्त्रीच्या आयुष्यात होतात. ती आपले घर, परिसर, नाती आणि अनेकदा स्वतःची ओळखही मागे सोडून नवीन कुटुंबात प्रवेश करते.
नवीन वातावरणाशी जुळवून घेण्याची अपेक्षा फक्त तिच्याचकडून केली जाते.
तिच्या आवडी-निवडी, करिअर किंवा स्वप्ने तिची नाती यांना दुय्यम स्थान दिले जाते.
समायोजन हा शब्द जणू स्त्रीसाठीच निर्माण झाला आहे, असे वाटावे अशी परिस्थिती अनेक घरांत दिसते.
विवाह हा दोन व्यक्तींचा संबंध असला तरी त्यातील तडजोडींचे ओझे प्रामुख्याने स्त्रीवरच पडते. त्यामुळे कितीही गोंडस नाव दिले तरी
विवाह संस्था शोषणाचंच साधन ठरते .
आर्थिक अवलंबित्व : शोषणाचे प्रभावी साधन
घरासाठी आयुष्य घालवणाऱ्या स्त्रीला अनेकदा स्वतःच्या गरजांसाठीही पैसे मागावे लागतात. तिच्या श्रमांचे मूल्य नसल्याने तिचे योगदानही दुर्लक्षित होते. अनेक स्त्रिया अन्याय सहन करतात, कारण त्यांच्याकडे आर्थिक पर्याय नसतो.
आर्थिक अवलंबित्वामुळे शोषण अधिक मजबूत होते. त्यामुळे स्त्रियांचे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन ठरते याची जाणीव नवीन पिढीत हळूहळू का होईना निर्माण होत आहे ही समाधानाची बाब आहे. नाही तरी स्त्रियां आतापर्यंत स्वतःच्या कर्तृत्वापेक्षा वडील, भाऊ किंवा पती यांच्या सामाजिक-आर्थिक स्थानातूनच स्वतःचे मूल्य शोधत आल्या आहेत.
परंपरा आणि संस्कृतीचे दबाव
भारतीय समाजात स्त्रीच्या त्यागाचे, सहनशीलतेचे आणि समर्पणाचे मोठे गौरवगान केले जाते. "घर टिकवणे" ही जबाबदारी तिच्यावर टाकली जाते. अन्याय सहन करणाऱ्या स्त्रीला आदर्श ठरवले जाते, तर प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीला बंडखोर मानले जाते.
संस्कृतीच्या नावाखाली अनेक रूढी आजही जिवंत आहेत. मुलींच्या स्वातंत्र्यावर बंधने, घरकामाची एकतर्फी जबाबदारी, मुलगा-मुलगी भेदभाव, वारसाहक्कातील असमानता—या सर्व गोष्टींची मुळे परंपरांमध्ये आढळतात.
समाज अनेकदा स्त्रीच्या त्यागाचा सन्मान करतो; पण तिच्या अधिकारांबद्दल मौन बाळगतो. याचाच अर्थ तिला तिच्या सर्व अधिकारापासून वंचित ठेवण्याचं कारस्थान आहे. हे मान्य करायला हवं.
बदलत्या काळातील नवे वास्तव
गेल्या काही दशकांत स्त्रियांच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत. शिक्षण, रोजगार, राजकारण, विज्ञान, साहित्य, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मात्र एक नवीन समस्या निर्माण झाली आहे. नोकरी करणाऱ्या स्त्रीला बाहेरील कामाबरोबरच घराची संपूर्ण जबाबदारीही सांभाळावी लागते. त्यामुळे तिच्यावर दुहेरी ओझे पडते.
समानतेच्या घोषणा होत असल्या तरी घरांमध्ये कामांची विभागणी अजूनही समान झालेली नाही.
त्यामुळे शोषणाचे स्वरूप बदलले आहे .
शोषण संपलेले नाही.
सर्व कुटुंबे शोषणावरच उभी आहेत का?
या प्रश्नाचे उत्तर "होय" किंवा "नाही" इतके सोपे नाही. अनेक कुटुंबांमध्ये प्रेम, आदर, समानता आणि सहकार्य यांचे सुंदर नाते पाहायला मिळते. अनेक पुरुष घरकामात सहभागी होतात, पत्नीच्या स्वप्नांना पाठिंबा देतात आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी समानपणे घेतात. मात्र हे अतिशय दुर्मिळ आहे.
संपूर्ण कुटुंब व्यवस्थेला दोष देणे योग्य ठरणार नाही. समस्या कुटुंब व्यवस्थेत नसून त्या व्यवस्थेत रुजलेल्या असमानतेत आहे. स्त्रीला गुलाम समजणाऱ्या मानसिकतेत आहे. त्या कुटुंबातील सदस्यांच्या संवेदनशीलतेवर आहे.
कुटुंब प्रेमाचे केंद्रही असू शकते आणि शोषणाचे साधनही. हे त्या कुटुंबातील मूल्यांवर अवलंबून असते.
समतेवर आधारित कुटुंब व्यवस्थेची गरज
आजच्या काळात कुटुंब व्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे. घरकाम ही केवळ स्त्रीची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची सामूहिक जबाबदारी आहे, ही जाणीव निर्माण झाली पाहिजे.
स्त्रियांच्या श्रमांना मान्यता मिळाली पाहिजे. निर्णय प्रक्रियेत त्यांचा समान सहभाग असला पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव संपला पाहिजे. परस्पर आदर, संवाद आणि समानता यांवर आधारित नाती निर्माण झाली पाहिजेत.
समता म्हणजे संघर्ष नव्हे; ती सहजीवनाची अधिक न्याय्य पद्धत आहे.
इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे पाहिले, तर मानवी कुटुंब व्यवस्थेला स्त्रियांच्या श्रमांनी, त्यागाने आणि सहनशीलतेने मोठा आधार दिला आहे, हे नाकारता येत नाही. अनेक वेळा हा आधार त्यांच्या स्वातंत्र्याच्या आणि स्वाभिमानाच्या किंमतीवर उभा राहिला आहे.
तथापि, कुटुंब व्यवस्था ही मुळात शोषणासाठी निर्माण झालेली संस्था आहे का ?
याचे उत्तर स्पष्टपणे देता येणार नाही. एवढं मात्र खरं आहे की ती स्त्रीच्या शोषणावर बहरत आलेली आहे.
कुटूंब व्यवस्था मानवी सहजीवनाची गरज आहे. पण जेव्हा समानतेचा अभाव निर्माण होतो, तेव्हा ती शोषणाचे माध्यम बनते.
आज गरज आहे ती स्त्रीच्या त्यागाचे गौरवगान करण्याची नव्हे, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, श्रमांचा आणि अधिकारांचा सन्मान करण्याची. कारण स्त्रीच्या शोषणावर नव्हे, तर स्त्री-पुरुष समानतेवर उभी राहिलेली कुटुंब व्यवस्था हीच खऱ्या अर्थाने सुदृढ, संवेदनशील आणि मानवी समाजाची पायाभरणी करू शकते.
'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी' हे बदलायला हवं.
हेही जरूर वाचा 👇
- छाया बेले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा