सुशिक्षित कमावत्या स्त्रीशी जुळवून घेण्यासाठी समाज तयार आहे का?

सुशिक्षित कमावत्या स्त्रीशी जुळवून घेण्यासाठी समाज तयार आहे का?

     
    काळाचं चाक सतत फिरतं असतं. त्याच्या या प्रवासात जीवसृष्टीच्या सर्वच स्तरावर 
 अनेक बदल घडून येत असतात. असं म्हणतात की एकेकाळी महाकाय असलेले डायनासोर आज पालीच्या रूपात भिंतीवर सरपटताहेत. 
असा हा काळाचा महिमा आहे.
हे बदल मानवी जीवनात सुद्धा घडत असतात. कधीकाळी माणूस जंगलाचा भाग होता. बाईचं जननी , पालन पोषणकर्ती म्हणून आदरणीय होती. 
त्यामुळे म्होरकेपण बाईच्या हाती होते. ते तिने तिच्यात असलेल्या मातृवृत्तीनुसार सांभाळले. 
काळाच्या ऋतू बदलात पुढे हेच म्होरकेपण  बाप्यांच्या हाती आहे. त्यांनी त्यांच्या वृत्ती नुसार शोषण व्यवस्था प्रस्थापित केली. महिलांना पाळीव प्राण्यांच्या समांतर जीवन जगायला भाग पाडलं.
आजचा काळ पुन्हा स्त्री जीवनाशी संबंधित 
नवे बदल घेऊन दाराशी उभा आहे. मात्र हे बदल पेलण्यासाठी आपला समाज तयार आहे का?
 
     आजच्या स्त्रीया शिक्षण घेऊन , पैसे कमवत आहेत, त्यांना स्वतःची मतं आहेत. ते 
त्या स्पष्टपणे मांडत आहेत. 
स्वतःच्या आयुष्याबद्दल सजगपणे विचार करताहेत . 
आज महिला डॉक्टर आहेत, अधिकारी आहेत, उद्योजिका आहेत, वैज्ञानिक आहेत, कलाकार आहेत, शेतकरी आहेत, शिक्षक आहेत, त्याचबरोबर त्या आई, पत्नी, मुलगी, सून अशा अनेक भूमिका देखील सांभाळताहेत. 
   महामानवांच्या  प्रयत्नाने ‌‍
स्त्रीला शिक्षणाची दारे खुली झाली. संविधानाने तिला बरोबरीचा दर्जा दिला.
त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडू लागल्या आहेत.
 यशाचे अनेक शिखरं पादाक्रांत करत आहेत.
 मात्र तिच्या जीवनात झालेल्या या सर्व बदलांनंतरही, समाज खरोखर सुशिक्षित आणि कमावत्या स्त्रीशी जुळवून घेण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहे का? 
समाजाची स्त्रीशी असलेली वर्तणूक पाहता 
हा प्रश्न वारंवार निर्माण होतो. 

    "कारण स्त्री फक्त कमावू लागली म्हणून समाज आधुनिक झाला असं होत नाही." 

   खरी आधुनिकता तेव्हा दिसते, जेव्हा समाज स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा, तिच्या मतांचा, तिच्या स्वातंत्र्याचा आणि तिच्या निर्णयक्षमतेचा मनापासून स्वीकार करतो. आणि हाच स्वीकार आजही हा स्विकार झालेला दिसून येत नाही.

     गेली शेकडो वर्ष स्त्रीच्या आयुष्याची चौकट समाजाने आधीच आखून ठेवलेली आहे. तिचं शिक्षण मर्यादित, स्वप्नं मर्यादित आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यही मर्यादित करून ठेवलेलं आहे. आतापर्यंत तिचं आयुष्य मुख्यतः संसार, मुलं आणि कुटुंबाभोवती फिरत असे. 
स्त्रीने सहनशील असावं, शांत असावं, त्याग करावा आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून इतरांसाठी जगावं, हीच तिची आदर्श प्रतिमा तयार करण्यात आली होती.  तिच्या माणूसपणाला तिच्या अस्तित्वाला,
व्यक्तिमत्त्वाला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही.
मात्र शिक्षणाने स्त्रीच्या  विश्वात मोठा बदल घडवून आणला. आर्थिक स्वावलंबनाने तिला आत्मविश्वास दिला. तिला स्वतःच्या कष्टाची किंमत समजू लागली. ती फक्त पुरूषांची जबाबदारी राहिली नाही, तर स्वतःच्या आयुष्याची निर्णयकर्ती बनू लागली. तिने स्वतःच्या करिअरचा विचार केला, स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्यायला सुरुवात केली आणि अन्यायाविरुद्ध प्रश्न विचारायला शिकली.
इथूनच समाज आणि स्त्री यांच्यातील संघर्ष सुरू होतो.
  कारण समाजाला कमावती स्त्री काही प्रमाणात स्वीकारता येते, पण स्वतंत्र विचारांची स्त्री अजूनही अस्वस्थ करते. समाजाला तिचं शिक्षण मान्य असतं, पण तिचं स्वतःचं मत सहज मान्य होत नाही. तिचा पगार हवा असतो, मात्र तिच्या स्वातंत्र्याची भीती वाटते.
     आज अनेक घरांमध्ये स्त्री नोकरी करते, आर्थिक हातभार लावते, पण त्याच वेळी घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच टाकली जाते.  सकाळपासून रात्रीपर्यंत ती नोकरी व घरकाम या दोन्ही आघाड्यांवर धावत असते. ऑफिसमध्ये व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि घरी पारंपरिक अपेक्षा. या दोन्हींचा भार ती एकाच वेळी पेलत आहे.
  समाज अजूनही स्त्रीकडून नोकरी करत परिपूर्ण, कुशल गृहिणी असण्याची अपेक्षा करतो.
ती कमवावी, पण घराकडे दुर्लक्ष होता कामा नये. ती यशस्वी असावी, पण तिच्या यशामुळे पुरुषाचा अहंकार दुखावला जाऊ नये. ती आधुनिक असावी, पण परंपरांवर प्रश्न विचारू नयेत. ती आत्मविश्वासू असावी, पण जास्त स्पष्टवक्ती नसावी. या विरोधाभासी अपेक्षांमध्ये अनेक स्त्रिया मानसिकदृष्ट्या थकून जातात.

      विशेषतः जेव्हा स्त्री पुरुषापेक्षा जास्त शिकलेली किंवा जास्त कमावणारी असते, तेव्हा काही नात्यांमध्ये नकळत ताण निर्माण होतो. कारण शतकानुशतकं पुरुषाला “घराचा प्रमुख” म्हणून वाढवलं गेलं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार, आर्थिक नियंत्रण आणि सामाजिक सत्ता ही त्याची नैसर्गिक भूमिका मानली गेली. त्यामुळे समानतेवर आधारित नातं स्वीकारणं अजूनही अनेकांना कठीण जातं.
काही पुरुष स्त्रीच्या यशाकडे प्रेरणा म्हणून पाहतात, पण काहींना ते स्वतःच्या वर्चस्वाला आव्हान वाटतं. म्हणूनच अनेक सुशिक्षित स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही भावनिकदृष्ट्या दडपल्या जातात. त्यांना सतत स्वतःला कमी दाखवण्याचा, स्वतःच्या यशाला मर्यादा घालण्याचा किंवा स्वतःचं मत दाबून ठेवण्याचा दबाव जाणवतो.
अनेक घरांमध्ये आजही स्त्रीच्या करिअरकडे “पर्याय” म्हणून पाहिलं जातं, तर पुरुषाच्या करिअरकडे “गरज” म्हणून.
 स्त्रीची नोकरी घराला पूरक मानली जाते, ती कधीही गरजेची म्हणून बघितलं जात नाही.
स्त्री स्वतःच्या मतावर ठाम राहिली की तिला “अहंकारी” म्हटलं जातं.
  स्वतःच्या आयुष्याबद्दल निर्णय घेतले की “घर मोडणारी” ठरवलं जातं. अन्याय सहन करण्यास नकार दिला की तिला अविचारी , कजाग ठरवलं जातं. 
म्हणजेच स्त्रीने सहन केलं तर ती आदर्श, आणि स्वतःसाठी उभी राहिली तर वाईट  हे वास्तव  अजूनही समाजात मोठ्या प्रमाणावर दिसून येते.
   समाज आधुनिकतेचा स्वीकार करतो, पण तो अनेकदा केवळ बाह्य स्वरूपापुरता मर्यादित असतो. मुलींना उच्च शिक्षण दिलं जातं, परदेशात पाठवलं जातं, मोठ्या पदांवर पोहोचल्यावर त्यांचं कौतुकही केलं जातं; पण लग्नानंतर तिच्या करिअरपेक्षा घराला प्राधान्य देण्याची अपेक्षा अजूनही कायम असते.
तिच्या कमाईचा अभिमान वाटतो, पण ती स्वतःचे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ लागली की अस्वस्थता निर्माण होते.
उशिरा लग्न करणं, लग्न न करण्याचा निर्णय, घटस्फोटानंतर पुन्हा आयुष्य उभं करणं, स्वतःच्या आनंदासाठी जगणं किंवा एकटीने आयुष्य जगण्याची निवड , त्रासदायक नात्यातून बाहेर पडणं. 
या गोष्टी अजूनही समाज सहज स्वीकारू शकलेला नाही. कारण समाजाला स्त्रीच्या कमाईपेक्षा तिच्या स्वायत्ततेची जास्त भीती वाटते.
स्त्रीच्या यशाची किंमतही खूप मोठी असते. प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे संघर्षाची एक न बोलली गेलेली कहाणी असते. सतत स्वतःला सिद्ध करण्याचा दबाव, घर आणि करिअर यांच्यात समतोल राखण्याची झुंज, मुलांच्या संगोपनासाठी आपण जास्त वेळ देऊ शकत नाही याबद्दलची अपराधीपणाची भावना, समाजाच्या अपेक्षा आणि मानसिक थकवा या सगळ्यांशी ती दररोज लढत असते.
पुरुष यशस्वी झाला की त्याच्या कर्तृत्वाचं कौतुक होतं; पण स्त्री यशस्वी झाली की तिच्या घरगुती भूमिकांचं परीक्षण सुरू होतं.
ती चांगली आई आहे का?
घर व्यवस्थित सांभाळते का?
मुलांकडे लक्ष देते का?
इतकं काम करूनही ती “संस्कार” जपते का? टिकवते का?
म्हणजे तिच्या व्यक्तिमत्त्वाचं मूल्यमापन अजूनही केवळ तिच्या यशावर होत नाही; तर पारंपरिक भूमिकांच्या चौकटीत बसवूनच केलं जातं.
      या संपूर्ण चित्रात आशेचे काही सकारात्मक बदलही दिसतात. नव्या पिढीत अनेक पुरुष समानतेचं महत्त्व समजू लागले आहेत. काही जोडपी खर्‍या अर्थाने सहजीवन जगताना दिसतात, जिथे घरकाम, मुलांची जबाबदारी आणि आर्थिक निर्णय हे दोघेही समानतेने घेतात. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं जात आहे. स्त्रिया स्वतःच्या हक्कांविषयी अधिक जागरूक होत आहेत. अनेक स्त्रिया आता भीतीपोटी नातं टिकवण्यापेक्षा आत्मसन्मानाला महत्त्व देऊ लागल्या आहेत.
हा बदल संथ आहे, पण महत्त्वाचा आहे.
तरीही समाजाला अजून मोठ्या मानसिक परिवर्तनाची गरज आहे. स्त्रीचं यश हे पुरुषाचं अपयश नाही, हे समजून घ्यावं लागेल. समानता म्हणजे स्पर्धा नसते; ती परस्पर आदर आणि सहकार्याची प्रक्रिया असते. घर ही फक्त स्त्रीची जबाबदारी नाही आणि आर्थिक जबाबदारी फक्त पुरुषाची नाही. 

   नातं टिकवण्यासाठी प्रेमाइतकाच समजूतदारपणा आणि परस्पर सन्मानही आवश्यक असतो.
   आज समाजाने स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारण्याची गरज आहे — आपल्याला खरोखर सक्षम स्त्री हवी आहे का, की फक्त कमावणारी पण नियंत्रणात राहणारी स्त्री हवी आहे?
कारण अनेकदा समाज स्त्रीच्या शिक्षणाचं समर्थन करतो, पण तिच्या स्वायत्ततेचं नाही.
    तिच्या पगाराचा स्वीकार करतो, पण तिच्या स्पष्ट मतांचा नाही. तिच्या कर्तृत्वाचं कौतुक करतो, पण तिच्या स्वतंत्र अस्तित्वाला सहज स्वीकारत नाही.
     स्त्री बदलली आहे. ती अधिक जागरूक झाली आहे, अधिक सक्षम झाली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. आता ती फक्त सहन करण्यासाठी जगत नाही; ती समजून घेण्याची, सन्मानाने वागवण्याची आणि समानतेने स्वीकारली जाण्याची अपेक्षा करते.

      खरी प्रगती तेव्हाच होईल, जेव्हा स्त्रीला “परवानगी” नव्हे तर “अधिकार” मिळेल. जेव्हा तिच्या कमाईचा नव्हे, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर केला जाईल. जेव्हा नात्यांमध्ये सत्ता नव्हे, तर समानता महत्त्वाची ठरेल. आणि जेव्हा समाज स्त्रीकडे भूमिका म्हणून नव्हे, तर पूर्ण माणूस म्हणून पाहायला शिकेल.
कारण शेवटी स्त्रीला विशेष सवलती नको असतात; तिला फक्त तिच्या अस्तित्वाचा मान हवा असतो.

-छाया

हेही वाचा 


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .