आधुनिक काळातील अदृश्य दासप्रथा – भाग ४
आधुनिक काळातील अदृश्य दासप्रथा – भाग ४
दैनंदिन जीवनातील नियंत्रणाची अदृश्य साखळी
स्त्रीच्या आयुष्यावर लादलेली बंधनं समाजमान्य झालेली आहेत. किंवा त्यांना समाजमान्यता मिळवून दिली गेली आहे. त्यामुळे ती स्त्री पुरुष सर्वांनी स्विकारले आहे. मी बाई आहे तर माझ्यासाठी असलेले नियम योग्य आहेत, असा महिलांचाही समज असतो. त्यामुळे त्यांना महिलांकडूनही नाकार दिला जात नाही.
यावरून तिच्या आयुष्याची दिशा ठरते. सगळं राजकारण यानुसार चालतं.
आधुनिक समाजात स्त्री सक्षमीकरण, महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य, समानता याबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असली, तरी तिच्या रोजच्या जीवनात सूक्ष्म पातळीवर कार्यरत असलेली नियंत्रणाची यंत्रणा अनेकदा दुर्लक्षित राहते. किंवा ती मुद्दाम दुर्लक्षित केली जाते.
त्यामुळे सगळे उपक्रम वरवरचे ठरतात. मुळातील समस्या तशाच राहतात.
दैनंदिन जीवनातील नियंत्रण हे उघड बंधनांपेक्षा अधिक प्रभावी असतं, कारण ते व्यक्तीची विचारसरणी, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासावर परिणाम करतं. स्त्रियांची स्वायत्तता आणि महिला हक्क, महिला सक्षमीकरण यांचा विचार करताना रोजच्या जगण्यातील नियंत्रणाचे अदृश्य साखळदंडं नष्ट करणं आवश्यक आहे. नाही तर एकीकडे पायात बेड्या घालून परंपरेच्या खुट्याला बांधून ठेवायचं, दुसरीकडे आकाश दाखवायचं असंच काही तरी सुरू आहे.
वेळेचे बंधन व हालचालींवर नियंत्रण
स्त्रीच्या दैनंदिन आयुष्यातील पहिलं नियंत्रण तिच्या वेळेवर आणि हालचालींवर दिसून येतं. तीने कुठं जावं, किती वेळ बाहेर राहावं, कोणासोबत जावं,या गोष्टी अनेकदा तिच्या स्वतःच्या निर्णयावर अवलंबून नसतात.
'मुलगी सातच्या आत घरात असावी' असा नियम अजुनही पाळला जातो. सुनेसाठी तर हे नियम अजूनच कडक होताना दिसतात.
स्त्रीनं एकटीने प्रवास करणं किंवा स्वतंत्रपणे फिरणं म्हणजे गुन्हाच ठरतो.
सुरक्षिततेच्या नावाखाली घालण्यात येणाऱ्या या मर्यादा प्रत्यक्षात तिच्या जगण्याला संकुचित करतात.
या नियंत्रणाचा परिणाम तिच्या शिक्षण, नोकरी आणि सामाजिक सहभागावर होतो. स्त्रीच्या हालचालींना मर्यादा घालून तिच्या आयुष्यातील विकासाच्या शक्यता कमी केल्या जातात. त्यामुळे महिलांची आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने होणारी प्रगतीही खुंटते. आपण विचार केला तर या नियंत्रणाला खरंच काही अर्थ आहे का ?
समाज पुरूष सत्ताक, नियंत्रण करणारी विचारसरणी पुरूष सत्ताक, महिलांना नियंत्रित करून सुरक्षा प्रदान करणारे पुरुष.
स्त्रीच्या अस्तित्वाला खतराही पुरूषकडूनच. किती विरोधाभास आहे हा. इथं महिलांना नियंत्रित करून प्रश्न सुटणार आहे का? की पुरूषांनी माणूस होणं आवश्यक आहे ? याचा विचार करणं आवश्यक आहे.
समाज स्त्रीच्या वर्तनावर अत्यंत बारकाईने नियंत्रण ठेवतो. ती कसं बोलते, कसं चालते, कसं हसते, कसं वागते या प्रत्येक गोष्टीसाठी एक नियमावली लादलेली असते.
खेड्यात मुलीला लग्नाच्या आधी,
'साधं राहा त्यामुळे लोकांच्या डोळ्यात येत नाही'
अशी ताकीद दिली जाते. तिच्या नीटनेटकं राहण्यावरही नियंत्रण केलं जातं.
फिरणं लग्नानंतर, कपडेलत्ते चांगले घालणं लग्नानंतर, हसणं, बोलणं लग्नानंतर असं सांगितलं जातं. जणूकाही लग्नानंतर ती स्वंतत्र होणार आहे असं चित्र निर्माण केलं जातं. लग्नानंतर स्त्रीच्या श्वास घेण्यावरही नियंत्रण येतं,हे तिला सांगितलं जात नाही. हे छलकपट करणारे तिचे तथाकथित आपलेच लोक असतात.
या कारणांमुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा नैसर्गिक विकासच होत नाही. परिणामी, स्त्री सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र अभिव्यक्ती कमकुवत होते.
स्त्रीला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे असा पोकळ भास निर्माण केला जातो,परंतु प्रत्यक्षात तिच्यासमोरचे पर्याय आधीच ठरवलेले असतात.
शिक्षणासाठीचं क्षेत्र तिच्या क्षमतेचा कस वापरून उतूंग भरारी घेता यावी ही निवड तिच्या हातात नसते. मग नोकरी करायची की नाही याचा निर्णय तिच्या हातात नसतो. करायची तर
नोकरीसाठीचे ठराविक ठिकाण , ठराविक क्षेत्र,हे इतर ठरवून देतात.
विवाहासाठी कुटुंबाचा निर्णय,अंतिम निर्णय असतो. सर्वच गोष्टींचा निर्णय तिच्यासाठी दुसरेच घेत असतात.
यामुळे तिच्या स्वायत्ततेचा केवळ आभास निर्माण होतो. ती स्वतःचे निर्णय घेत आहे असं दिसतं, पण ते निर्णय सामाजिक चौकटीत बसणारेच असतात. ही स्थिती आधुनिक दास्याचं सूक्ष्म रूप आहे, जिथे नियंत्रण उघड नसतं, आयुष्य जखडून ठेवणारं असतं.
त्याचबरोबर घरातील कामं स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी, वृद्धांची सेवा या सर्व जबाबदाऱ्या प्रामुख्याने स्त्रीवरच टाकल्या जातात.
या श्रमांना आर्थिक मूल्य दिलं जात नाही, त्यामुळे तिच्या योगदानाची औपचारिक नोंद होत नाही. तिच्या वेळेवर आणि ऊर्जेवर याचा मोठा परिणाम होतो, ज्यामुळे तिच्या वैयक्तिक विकासासाठी , आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक तेवढा वेळ उरत नाही.
ही स्थिती आर्थिक असमानता अधिक दृढ करते आणि स्त्रीच्या आर्थिक स्वायत्ततेला मर्यादित ठेवते.स्त्रिया स्वतःच्या इच्छांपेक्षा कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य देतात. करिअरपेक्षा कुटुंब, स्वप्नांपेक्षा जबाबदाऱ्या या निवडी तिच्या आयुष्याचा भाग बनतात.
यामुळे तिची वैयक्तिक ओळख मागे पडते आणि तिच्या आकांक्षा अपूर्ण राहतात. दीर्घकाळानंतर ती स्वतःच्या इच्छांपासून दूर जाते आणि तिचं अस्तित्व इतरांच्या अपेक्षांमध्येच मर्यादित राहतं.
स्त्री सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे.
घरातील महत्त्वाचे निर्णय,आर्थिक व्यवहार, मुलांचं शिक्षण, मालमत्ता हे अनेकदा पुरुषांकडून घेतले जातात. स्त्रीची मते विचारली जातात, पण अंतिम निर्णय तिचा नसतो.
यामुळे तिच्या अनुभवाला आणि मतांना कमी महत्त्व दिलं जातं. निर्णयप्रक्रियेत दुय्यम स्थान मिळाल्यामुळे तिच्या अस्तित्वाचं गौणत्व निर्माण होतं.
निर्णय घेण्याची क्षमता ही स्वातंत्र्याची मूलभूत अट आहे. तीच जर मर्यादित झाली, तर स्वातंत्र्य केवळ औपचारिक राहते.
वरील सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा होतो की स्त्रीचं जग हळूहळू संकुचित होतं. तिच्या संधी कमी होतात, आत्मविश्वास घटतो आणि निर्णयक्षमता मर्यादित होते.
ही बंधनं इतकी सामान्य वाटतात की अनेकदा ती नैसर्गिक मानली जातात. हेच आधुनिक दास्याचं स्वरूप आहे, जिथे बंधनं दिसत नाहीत, पण ती तिच्या अस्तित्वावर नियंत्रण ठेवतात.
दैनंदिन जीवनातील नियंत्रण हे स्त्रीच्या स्वातंत्र्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ मोठे निर्णय घेण्याची क्षमता नसून, रोजच्या छोट्या निवडी करण्याची मोकळीकही आहे.
ज्या दिवशी स्त्रीला तिच्या वेळेवर, निवडींवर आणि आयुष्यावर पूर्ण अधिकार मिळेल, त्या दिवशीच तिच्या स्वातंत्र्याची खरी सुरुवात होईल.
आपण स्त्रीला खरंच स्वातंत्र्य देतो आहोत, की केवळ त्याचा आभास निर्माण करतो आहोत—हा प्रश्न समाजाने स्वतःला विचारण्याची गरज आहे.
✍️ - छाया
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा