आधुनिक दास्याचे अदृश्य स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीची अपूर्ण मुक्ती (भाग ३)



 आधुनिक दास्याचे स्वरूप : आर्थिक वास्तव आणि स्त्रीचं अपूर्ण स्वातंत्र्य (भाग ३)


 
        स्त्रीच्या स्वातंत्र्याचा विचार करताना आपण अनेकदा शिक्षण, पैसे कमावणे,या घटकांवर भर देतो; स्त्री कमावते आहे, पण ती खरोखरच आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का?
सखोलपणे विचार केला, निरिक्षण केले तर या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असंच येईल.
या प्रश्नाच्या उत्तरात आधुनिक दास्यप्रथेचं एक अत्यंत सूक्ष्म, अदृश्य रूप दडलेलं आहे.


 आर्थिक स्वातंत्र्य की अदृश्य दास्य?

आजची स्त्री उघड गुलामगिरीत नाही, परंतु तिच्या आर्थिक स्वातंत्र्यावर असलेल्या मर्यादा तिच्या या दास्य उघड करतात.
निर्णय घेण्याच्या अधिकारावर असलेली बंधनं अस्तित्वाला अप्रत्यक्षरीत्या नियंत्रित करतात.
हे नाकारून चालणार नाही. आजची महिला पुर्णपणे मुक्त आहे असं म्हणण्यात केवळ दांभिकपणाच दिसून येतो.

 कामाच्या संधी आणि सामाजिक वास्तव

सामान्यपणे महिलांच्या बाबतीत कामाच्या संधीत क्षमतेपेक्षा परिस्थितीचा प्रभाव दिसून येतो. महिलांना कमी समजण्याची मानसिकता दिसून येते.
आधुनिक समाजात स्त्रिया शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे येत आहेत, विविध कौशल्यं आत्मसात करत आहेत. विविध क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करत आहेत. अगदी आपल्या देशाचं पंतप्रधानपद, राष्ट्रपती पदही महिलांनी भुषवलं आहे.
देशाचा कारभार अतिशय कुशलतेने व खंबीरपणे सांभाळला आहे. यातून दिसून येते की, महिलाची क्षमता रत्तीभरही कमी नाही.
तरीही त्यांच्या कामाच्या संधी अनेकदा त्यांच्या पात्रतेवर नव्हे, तर सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितींवर अवलंबून असतात.
कुटुंबातील अपेक्षा, सुरक्षिततेचे प्रश्न, सामाजिक दबाव आणि पारंपरिक विचारसरणी यामुळे अनेक स्त्रियांना इच्छित क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत नाही.
“घर सांभाळणं हीच स्त्रीची प्राथमिक जबाबदारी आहे” हा विचार अजूनही अनेक कुटुंबांत दृढपणे रुजलेला आहे.
त्यामुळे स्त्रीच्या करिअरकडे दुय्यम दृष्टीने पाहिलं जातं.

 ग्रामीण स्त्रियांचे अदृश्य श्रम

ग्रामीण भागात ही स्थिती अधिक तीव्रतेने दिसून येते. स्त्रिया शेती, पशुपालन आणि घरगुती कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर योगदान देतात; परंतु त्यांच्या या श्रमांना औपचारिक मान्यता मिळत नाही.
त्या “कामगार” म्हणून नोंदवल्या जात नाहीत, परिणामी त्यांच्या श्रमाचं मूल्य मिळत नाही.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, स्त्री काम करते, पण तिच्या कामाला ओळख आणि योग्य मूल्य मिळत नाही.

 समान श्रम, असमान मोबदला 

या बाबतीत अजून एक विषमता दिसून येते ती म्हणजे समान श्रम, असमान मोबदला.
कामाच्या संधी मिळाल्यानंतरही स्त्रीला समान मोबदला मिळतोच असं नाही.
अनेक ठिकाणी समान काम आणि कौशल्य असूनही स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन दिलं जातं.
ही केवळ आर्थिक विषमता नसून ती सामाजिक मानसिकतेचं प्रतिबिंब आहे.
यामुळे तिच्या आर्थिक प्रगतीवर मर्यादा येतात. कमी उत्पन्नामुळे तिच्या बचतीच्या संधी कमी होतात, आर्थिक सुरक्षितता कमी होते.
भविष्यासाठी नियोजन करणं कठीण होतं. परिणामी, ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याऐवजी अवलंबित्वाच्या चक्रात अडकते.

 असंघटित क्षेत्रातील असुरक्षितता

भारतातील मोठ्या प्रमाणावर स्त्रिया असंघटित क्षेत्रात कार्यरत आहेत.
घरकाम, शेती, लघुउद्योग, दैनंदिन मजुरी इत्यादी.
या क्षेत्रांमध्ये कामाच्या अटी, नियम अनिश्चित असतात.
निश्चित वेतनाची हमी नसते.
सामाजिक सुरक्षा योजनांचा अभाव असतो.
कामाची सातत्यता नसते.
या परिस्थितीत स्त्रीचं आर्थिक आयुष्य अनिश्चिततेवर आधारलेलं असतं.
उद्याच्या उत्पन्नाची खात्री नसल्यामुळे तिच्या जीवनात स्थैर्य निर्माण होत नाही.

 मालमत्ता हक्क आणि आर्थिक सुरक्षितता

मालमत्ता म्हणजे केवळ संपत्ती नव्हे, तर दीर्घकालीन सुरक्षिततेचा आधार आहे.
कायद्याने स्त्रियांना मालमत्तेवर समान हक्क दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र तो मिळत नाही.
जमीन, घर किंवा व्यवसाय यांमध्ये स्त्रियांची मालकी नगण्य प्रमाणात आढळते.
अनेक वेळा वारसाहक्क मिळाल्यानंतरही स्त्रिया तो स्वीकारत नाहीत.
कधी सामाजिक दबावामुळे, तर कधी कौटुंबिक संबंध टिकवण्यासाठी.
यामुळे स्त्री आर्थिकदृष्ट्या असुरक्षित राहते.


 उत्पन्न असूनही निर्णयस्वातंत्र्याचा अभाव 

आर्थिक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे कमाईवर अधिकार.
अनेक स्त्रिया नोकरी करतात, छोटे मोठे उद्योग व्यवसाय करतात.
मात्र, त्या उत्पन्नाचा वापर कसा करायचा यावर त्यांचा पूर्ण अधिकार नसतो.
घरातील आर्थिक निर्णय अनेकदा पुरुषांच्या हातात असतात.
स्त्रीची कमाई कुटुंबासाठी वापरली जाते, तिच्या वैयक्तिक गरजांना प्राधान्य दिलं जात नाही.
ती कमावते, पण निर्णय तिचे नसतात.

 आर्थिक साक्षरतेचा अभाव 

महिला पैसे जरी कमवत असल्यातरी, त्याचं नियोजन, गुंतवणूक यात त्या सहभागी होत नाहीत.
आर्थिक नियोजन हे पुरूषांच्या हातात असतं.
त्यांना वारंवार असं सांगितलं जातं की, “यातलं तुला काय कळतं.”
त्या या गोष्टीला खरं समजून या गोष्टीपासून दूर राहतात.
आर्थिक स्वातंत्र्य केवळ उत्पन्नावर अवलंबून नसतं, तर ते आर्थिक ज्ञानावरही अवलंबून असतं.


 अपूर्ण स्वातंत्र्याचं वास्तव 

वरील सर्व घटकांचा एकत्रित परिणाम असा होतो की स्त्रीचं आर्थिक स्वातंत्र्य अपूर्ण राहतं.
ती स्वतःचे निर्णय पूर्णपणे घेऊ शकत नाही
आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून राहते
अन्याय होण्याची शक्यता वाढते
आत्मविश्वास कमी होतो
म्हणजेच, आर्थिक असमानता ही केवळ पैशाची समस्या नसून ती स्त्रीच्या अस्तित्वावर परिणाम करणारी समस्या आहे.

शेवटी, 
स्वातंत्र्याचा अर्थ केवळ उत्पन्न मिळवणं इतका मर्यादित नाही.
तर त्या उत्पन्नावर तिचं नियंत्रण असणं, त्याचा योग्य वापर करण्याची क्षमता आणि त्या माध्यमातून स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याची ताकद यांवर आधारित आहे.
जोपर्यंत स्त्रीला ही सर्वांगीण आर्थिक क्षमता प्राप्त होत नाही, तोपर्यंत तिचं स्वातंत्र्य अपूर्ण आहे.
स्त्री पैसे कमवते म्हणजे ती आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे असा अर्थ होतं नाही.
पैसा तिच्या निर्णयक्षमतेचा, स्वाभिमानाचा आणि अस्तित्वाचा आधार, व पाया ठरायला हवा.
ज्या दिवशी स्त्रीला तिच्या कमाईवर पूर्ण अधिकार मिळेल,
ज्या दिवशी ती आर्थिकदृष्ट्या कुणावरही अवलंबून राहणार नाही,
त्या दिवशीच तिच्या स्वातंत्र्याची खरी सुरुवात होईल.
आर्थिक स्वातंत्र्याशिवाय समानता ही अपूर्ण राहते,
आणि आर्थिक सक्षमीकरणाशिवाय मुक्ती अधुरीच राहते.


✍️ - छाया

हेही वाचा -





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .