आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)
आधुनिक दास्याची रूपं (भाग-२)
आजची दासप्रथा भूतकाळातील साखळदंड, बाजारपेठा आणि उघड गुलामगिरीसारखी स्पष्टपणे दिसत नाही. तीने आपलं स्वरूप बदलले आहे.
ती आता रूपाने सूक्ष्म, स्वरूपाने अदृश्य, प्रभावाने अधिक खोलवर गेलेली आहे. आधुनिक समाजात स्त्रीला उघडपणे कैद केलेलं नसतं, पण तिच्या आयुष्याभोवती अशा मर्यादा विणल्या जातात की तिचं स्वातंत्र्य अपूर्ण राहतं.
म्हणूनच या आधुनिक दास्याची ओळख होणं,
ती पटवणं कठीण आहे . कारण ती दैनंदिन जीवनात इतकी मिसळलेली आहे की,
ती अनेकदा नैसर्गिक वाटू लागते.
या 'दास्याची' रचना समजून घेण्यासाठी तिच्या तीन महत्त्वाच्या स्तरांकडे पाहणं आवश्यक आहे.रचनात्मक, सांस्कृतिक आणि मानसिक. हे तीन स्तर वेगवेगळे नसून एकमेकांशी जोडलेले आहेत आणि एकत्रितपणे स्त्रीच्या आयुष्यावर प्रभाव टाकतात.
रचनात्मक (संरचनात्मक) असमानता :
व्यवस्थेतील अदृश्य भिंती
रचनात्मक असमानता म्हणजे समाजातील संस्था, नियम आणि व्यवस्था ज्या पद्धतीने कार्य करतात, त्यात ही विषमता, असमानता उघडपणे दिसत नाही, पण ती स्त्रीच्या विकासावर मर्यादा घालते.
शिक्षणाच्या क्षेत्रात पाहिलं तर अजूनही अनेक ठिकाणी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं जातं, तर मुलींच्या शिक्षणात तडजोड केली जाते. मुलीचं शिक्षण आपल्या घरासाठी काही उपयोगाचं नाही. कारण ती लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार. त्या लोकांना त्याचा फायदा होणार मग कशाला तिच्या शिक्षणावर खर्च करायचा? समाजात अजूनही अशी मानसिकता दिसून येते.
जरी शिक्षण पूर्ण झालं तरी रोजगाराच्या संधींमध्ये स्त्रियांना समान स्थान मिळत नाही. समान कामासाठी कमी वेतन, सुरक्षिततेच्या अभावामुळे काही निवडक क्षेत्रांची निवड करण्याकडे कल असतो , लग्नानंतर नोकरीसाठी परवानगी नकारणे या सगळ्या गोष्टी तिच्या प्रगतीला अडथळा ठरतात. या सगळ्याच परिस्थितीत ती दासप्रथेचीच पुनरावृत्ती दिसून येते. ही अदृश्य स्वरूपातील दासप्रथा म्हणता येईल.
मालमत्तेच्या बाबतीतही स्थिती वेगळी नाही. कायद्याने हक्क असले तरी प्रत्यक्षात जमीन, घर किंवा व्यवसाय यांवर स्त्रियांची मालकी नाही यामुळे कायम त्या आर्थिक सुरक्षिततेत
राहतात. त्याचा परिणाम त्या स्त्रीला परावलंबी जीवन जगावं लागतं. ज्यात तिच्या अस्तित्वाची किंमत शुन्य असते. तिच्या आयुष्याचे सगळेच निर्णय दुसरेच कोणीतरी घेत असतात.
ही सगळी व्यवस्था इतकी खोलवर रुजलेली आहे की, ती अन्याय वाटण्याऐवजी “नियम” वाटू लागते. परिणामी, स्त्रीच्या आयुष्याचे मार्ग आधीच आखले जातात—आणि तिच्या निवडी त्या चौकटीत मर्यादित राहतात.
परंपरेच्या नावाखालील बंधनं व नियंत्रण
सर्वच स्तरावर स्त्रीच्या आयुष्याभोवती अनेक अदृश्य रेषा आखल्या जातात. या रेषा समाजाच्या परंपरा, रूढी आणि मूल्यांच्या माध्यमातून तयार होतात.
“स्त्रीने कसं वागावं” हे अनेकदा तिच्या जन्मापासून ठरवलेलं असतं. तिचा पोषाख , बोलणं, वागणं, शिक्षण , करिअर, तिची स्वप्नं या सगळ्यावर समाजाचं नियंत्रण असतं.
तिच्या निसर्गतः मिळालेल्या स्वातंत्र्याला अनेकदा “संस्कार” आणि “मर्यादा” यांच्या नावाखाली नकार दिला जातो. तिचे पंख छाटून
चौकटीच्या आत कैद केले जाते.
आजच्या आधुनिक काळातही मुलीनं केवळ घर नीट सांभाळावं हीच अपेक्षा केली जाते.
तरूण पिढीतील लग्नाळू मुलांचा बायोडाटात
अशी अपेक्षा स्पष्टपणे सांगितलेली असते
मुलगी घर व्यवस्थित सांभाळणारी व मोठ्याचा आदर करणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी. म्हणजेच अप्रत्यक्षपणे त्यांना पत्नी,सून
म्हणून लाइफ पार्टनर किंवा सहचर, जीवनसाथी नाही तर एक प्रामाणिक सेवक म्हणजेच दास हवा असतो.
एक कर्तबगार, कुशल प्रशासकीय अधिकारी असलेल्या महिलेलाही ती किती कुशल आई, पत्नी, जबाबदार सून आहे यावरून मोजमाप केलं जात. बाहेरच्या कामाव्यतिरिक्त ती घरातील जबाबदारी तेवढ्याच चोखपणे पार पाडाव्यात अशी सक्ती केली जाते.
या सगळ्यातून पुरूष मुक्त असतो.
त्यामुळे ती स्वतःच्या महत्वकांक्षा व समाजाच्या अपेक्षा यामध्ये सतत ओढाताण करून घेत राहते.
या दिर्घ कालीन चौकटींचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ती स्वतःच या मर्यादांना स्वीकार केलेला आहे. त्यामुळे सगळी जबाबदारी माझीच आहे असं समजून ओझं वाहत राहते.
" हे असं का ? " असा प्रश्न ती कधीच विचारत नाही.
त्यामुळे हे सेवकत्वाचं
बंधनं केवळ बाहेरून लादलेलं नाही, तर ते आतूनही तेवढंच दृढ झालंय.
ते तिच्या आतील मानसिक बंधनं झालीत.
आणि ते विचारांवर तिच्या आत्मविश्वासावर खोलवर परिणाम करतात.
तू महिला आहेस, तू हे करू शकत नाहीस, तुझ्यासाठी अमूक गोष्ट वर्ज्य आहे अशा संस्कारामुळे
स्त्रीच्या मनात न्युनगंड निर्माण होतो.
“मी हे करू शकत नाही”, “माझं मत महत्त्वाचं नाही”, “माझ्यासाठी हे योग्य नाही”—अशा भावना तिच्या मनात रुजतात. स्वतःच्या निर्णयांबद्दल अपराधीपणा, अपयशाची भीती, आणि स्वतःला दुय्यम समजण्याची प्रवृत्ती—या गोष्टी तिच्या व्यक्तिमत्त्वाला मर्यादित करतात.
या मानसिकतेमुळे ती स्वतःच्या स्वातंत्र्याचा वापर आपल्या विकासासाठी पूर्णपणे करू शकत नाही.
अनेक वेळा बाह्य बंधनं कमी असली तरी ही आंतरिक बंधनं तिच्या प्रगतीसाठी अडथळा ठरतात. त्यामुळे ही दास्यता अधिक टिकाऊ ठरते. कारण ती नाकारण्याचं धाडस स्त्री करू शकत नाही.
रचनात्मक, सांस्कृतिक आणि मानसिक हे तीन स्तर स्वतंत्र नाहीत; ती एकमेकांशी जोडलेली साखळी आहे.
ते एकमेकांना सतत बळ देतात. रचनात्मक असमानता सांस्कृतिक विचारांना पोषक ठरते, आणि हे सांस्कृतिक विचार हळूहळू मानसिकतेत रुजतात. त्यानंतर ही मानसिकता पुन्हा त्या असमान व्यवस्थेला स्वीकारते, आणि एक दुष्टचक्र असंच सुरू राहतं.
याच चक्रामुळे हे दास्य टिकून राहतं, कारण ते केवळ बाह्य नियंत्रणावर आधारित नाही तर अंतर्गत स्वीकारावरही आधारित आहे.
स्त्रीला स्वतःची ओळख होणं, आत्मभान जागृत होणं, हीच मुक्तीची सुरुवात आहे
आधुनिक दासप्रथा ही उघड गुलामगिरीसारखी नसली, तरी तिचा प्रभाव तितकाच खोल आहे. ती समाजाच्या रचनेत, संस्कृतीत आणि मानसिकतेत विणलेली आहे. त्यामुळे तिचं अस्तित्व नाकारण्यापेक्षा, ते ओळखणं अधिक महत्त्वाचं आहे.
ज्या बंधनांची जाणीव होत नाही,
ती तोडणं सर्वात कठीण असतं.
म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,
"गुलामाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या, तो बंड केल्या शिवाय राहणार नाही."
म्हणूनच या दास्याची ओळख पटवणं हीच मुक्तीची पहिली पायरी आहे.
जोपर्यंत आपण या सूक्ष्म बंधनांना समजून घेत नाही, तोपर्यंत समानतेची लढाई अपूर्ण राहील.
आधुनिक दास्य संपवण्यासाठी केवळ कायदे किंवा संधी पुरेसे नाहीत;
ही व्यवस्था बदलण्यासाठी
विचारांमध्ये, कृतीतून एकत्रित बदल घडवणं आवश्यक आहे.
ज्या दिवशी स्त्रीला तिच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास निर्माण होईल
व समाज तिच्या स्वातंत्र्याला मर्यादा न घालता
प्रोत्साहन देईल . तिच्या माणूसपणाचा स्विकार करेल, सन्मान करेल
त्या दिवशीच या अदृश्य दासप्रथेचा अंत होईल.
सर्व पुरूषांच्या जीवनात एखादी प्रिय स्त्री असते, मुलगी,आई, बहीण,पत्नी, मैत्रीण त्या स्त्रीसाठी तिच्या प्रेमाची उतराई होण्यासाठी ,
हे दास्य संपविण्यासाठी पुरूषांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
-छाया
हेही वाचा -
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा