भारतीय समाजातील स्त्री-शोषण : कारणे व उपाय
भारतीय समाजातील स्त्रियांचे शोषण : कारणे व उपाय लेकमातीचा जलम घालू नको देवराया केले कष्ट जाती वाया लहानपणी आई, आज्जी यांच्या तोंडून अशा ओव्या ऐकलेल्या. त्यातील आर्तता आजही कुठेतरी मनात घर करून आहे. त्याकाळी त्याचा अर्थ कळत नव्हता. हळूहळू जगणं पसरत जातं. भले बुरे अनुभव येतात. कधी इतरांच्या जीवनातील घटना पहायला ऐकायला मिळतात. ते सगळं एक बाई म्हणून स्वतःला जोडून पाहतो. आतमधे एक सहवेदनेची कळ दाटून राहते. कारण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे ! असं तुकोबा म्हणतात. भारतीय समाज आणि स्त्रियांचे शोषण हे जणू एक समीकरणच बनले आहे. हा आपल्या देशात अनेक शतकांपासून चालत आलेला, पण सातत्याने दुर्लक्षित केला गेलेला प्रश्न आहे. देश आज वेगाने आर्थिक प्रगती करत आहे, तांत्रिक क्षेत्रात झेप घेत आहे, चांद्रयान अवकाशात पाठवत आहे, तरीही याच देशातील स्त्रीला मात्र आजही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळ्यांवर शोषणाचा सामना करावा लागतो, ही आपल्या प्रगत...