भारतीय समाजातील स्त्री-शोषण : कारणे व उपाय
भारतीय समाजातील स्त्रियांचे शोषण : कारणे व उपाय
लेकमातीचा जलम
घालू नको देवराया
केले कष्ट जाती वाया
लहानपणी आई, आज्जी यांच्या तोंडून अशा ओव्या ऐकलेल्या. त्यातील आर्तता आजही कुठेतरी मनात घर करून आहे. त्याकाळी त्याचा अर्थ कळत नव्हता. हळूहळू जगणं पसरत जातं. भले बुरे अनुभव येतात.
कधी इतरांच्या जीवनातील घटना पहायला ऐकायला मिळतात. ते सगळं एक बाई म्हणून स्वतःला जोडून पाहतो. आतमधे एक सहवेदनेची कळ दाटून राहते.
कारण जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे !
असं तुकोबा म्हणतात.
भारतीय समाज आणि स्त्रियांचे शोषण हे जणू एक समीकरणच बनले आहे. हा आपल्या देशात अनेक शतकांपासून चालत आलेला, पण सातत्याने दुर्लक्षित केला गेलेला प्रश्न आहे. देश आज वेगाने आर्थिक प्रगती करत आहे, तांत्रिक क्षेत्रात झेप घेत आहे, चांद्रयान अवकाशात पाठवत आहे, तरीही याच देशातील स्त्रीला मात्र आजही सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा विविध पातळ्यांवर शोषणाचा सामना करावा लागतो, ही आपल्या प्रगतीच्या दाव्याला छेद देणारी वस्तुस्थिती आहे.
या शोषणाच्या मुळाशी काही खोलवर रुजलेली कारणे आहेत.
सर्वात पहिले आणि मूळ कारण म्हणजे पितृसत्ताक मानसिकता. भारतीय समाजाच्या मनात खोलवर ही धारणा रुजली आहे की पुरुष हा स्त्रीपेक्षा श्रेष्ठ आहे. पुरुष हा कर्ता, निर्णय घेणारा आणि स्त्री ही दुय्यम, आज्ञा पाळणारी. याच मानसिकतेमुळे स्त्रीला शिक्षण, नोकरी, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवले जाते. तिचे अस्तित्वच दुसऱ्यावर अवलंबून असल्यासारखे मानले जाते.
याला जोड आहे ती आपल्या पारंपरिक सामाजिक आणि सांस्कृतिक नियमांची. आपल्या रूढी, परंपरा अनेकदा स्त्रीच्या स्वायत्ततेलाच बंधन घालतात. स्त्रीने स्वतःच्या आकांक्षा, स्वप्नांपेक्षा घरगुती कर्तव्यांना, कुटुंबाला प्राधान्य द्यावे, हीच अपेक्षा तिच्याकडून केली जाते. तिने शिकून मोठे होण्यापेक्षा चांगली सून, चांगली आई कशी होईल, यालाच महत्त्व दिले जाते.
आर्थिक परावलंबित्व हे शोषणाचे आणखी एक मोठे कारण आहे. भारतीय स्त्रीकडे स्वतःच्या मालकीची संपत्ती नाही. वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळत नाही, सासरच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही. त्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य पुरुषावर अवलंबून राहते. शिक्षण, नोकरीच्या संधी आणि आर्थिक स्रोतांपासून तिला दूर ठेवल्यामुळे ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. आणि जिथे अवलंबित्व आहे, तिथे शोषण आलेच.
शिक्षण आणि जागरुकतेचा अभाव यामुळे हे चक्र अधिक घट्ट होते. अर्धवट शिक्षण किंवा केवळ साक्षरता स्त्रीला तिच्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देत नाही. कायदे काय आहेत, आपल्याला न्याय कसा मागता येईल, हे तिला माहीतच नसते. आणि जागरूकता नसेल तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमतही येत नाही.
या कारणांमुळे स्त्रियांच्या शोषणाचे अनेक चेहरे आपल्याला दिसतात.
यातला सगळ्यात विदारक आणि जवळचा प्रकार म्हणजे घरगुती हिंसा. भारतात आजही लाखो स्त्रिया चार भिंतीआड हिंसाचार सहन करतात. कारण तिच्याकडे जाण्यासाठी दुसरी जागा नसते. माहेरी हक्काने राहता येत नाही आणि सासरीही हक्काचे घर नसते. संपत्तीवर अधिकार नसल्यामुळे ती अपमान, मारहाण, मानसिक छळ सहन करत त्याच घरात राहते. कायदे असूनही सामाजिक दबाव, लोक काय म्हणतील याची भीती आणि सूडाची भीती यामुळे अनेक प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतच नाहीत.
दुसरा मोठा प्रकार म्हणजे लैंगिक छळ. घरापासून ते कामाच्या ठिकाणापर्यंत आणि रस्त्यापासून ते सार्वजनिक वाहतुकीपर्यंत स्त्रीला छेडछाड, पाठलाग, अश्लील शेरे आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांना तोंड द्यावे लागते. तिच्या शरीराकडे एक वस्तू म्हणून पाहण्याची विकृत दृष्टी याला कारणीभूत आहे.
जबरदस्ती विवाह आणि हुंडा ही तर आपल्या समाजाला लागलेली कीड आहे. आजही अनेक ठिकाणी मुलीचे मत न घेता, तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून दिले जाते. लग्नाला पवित्र बंधन न मानता एक आर्थिक व्यवहार मानले जाते. हुंड्यासाठी मुलीचा छळ करणे, तिला जाळणे यासारख्या घटना पितृसत्ताक मानसिकता किती क्रूर आहे हेच दाखवतात.
याहीपुढे जाऊन मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायासारखे अमानवी प्रकार घडतात. गरीब, निराधार महिला आणि अल्पवयीन मुलींना फसवून, विकून त्यांना शरीरविक्रयास भाग पाडले जाते. येथे स्त्रीला माणूस म्हणून नाही तर विकण्यायोग्य वस्तू म्हणून वागवले जाते.
मग यातून बाहेर पडायचा मार्ग काय?
यासाठी केवळ कायदे करून उपयोग नाही, तर दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे.
सर्वात प्रभावी उपाय म्हणजे शिक्षण आणि जागरुकता. केवळ पुस्तकी शिक्षण नाही, तर हक्कांचे शिक्षण. स्त्रीला तिच्या मूलभूत हक्कांची, कायद्यांची माहिती देणे, तिला आत्मविश्वास देणे हे पहिले पाऊल आहे. जेव्हा स्त्री जागरूक होते, तेव्हाच ती शोषणाला आव्हान देऊ शकते.
त्यासोबतच आर्थिक सशक्तीकरण अत्यंत आवश्यक आहे. स्त्रीला शिक्षण, कौशल्य विकास, नोकरीच्या समान संधी आणि आर्थिक स्रोत उपलब्ध करून दिले पाहिजेत. तिच्या नावावर संपत्ती, तिचा आर्थिक निर्णयांमध्ये सहभाग हे तिला आत्मनिर्भर बनवेल आणि परावलंबित्वामुळे होणारे शोषण आपोआप कमी होईल.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पितृसत्ताक मानसिकतेच्या जागी लैंगिक समानता रुजवणे. हे काम फक्त स्त्रियांचे नाही, तर पुरुषांचेही आहे. लहानपणापासूनच मुलगा आणि मुलगी समान आहेत, दोघांनाही समान अधिकार आणि संधी आहेत, हे संस्कार घरातूनच दिले पाहिजेत. अधिक समतेवर आधारित, संवेदनशील समाज घडवण्यासाठी मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे.
आणि शेवटी, कायदे आणि संस्थांचे बळकटीकरण. महिलांसाठी असलेले कायदे केवळ कागदावर न राहता त्यांची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था आणि महिला आयोग यांनी अधिक संवेदनशीलपणे आणि जलदगतीने काम करणे आवश्यक आहे, जेणेकरून पीडितेला त्वरित न्याय मिळेल आणि गुन्हेगाराला जरब बसेल.
थोडक्यात, भारतीय समाजातील स्त्रियांचे शोषण ही एक गुंतागुंतीची, खोलवर रुजलेली समस्या आहे. तिच्याकडे केवळ महिलांचा प्रश्न म्हणून न पाहता एक मानवी प्रश्न म्हणून पाहिले पाहिजे. पितृसत्ताक विचार, जुन्या रूढी, आर्थिक गुलामी आणि अज्ञान या मुळांवर घाव घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, विचारपरिवर्तन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी यांचा एकत्रित, सर्वसमावेशक आणि मानवतावादी दृष्टिकोनच आपल्याला अधिक न्याय्य, सुरक्षित आणि समानतेचा समाज निर्माण करण्यास मदत करेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा