स्त्री शोषणाच्या उदात्तीकरणाची उफराटी रीत | पितृसत्ताक व्यवस्थेचं वास्तव .
स्त्री शोषणाच्या उदात्तीकरणाची उफराटी रीत | पितृसत्ताक व्यवस्थेचं वास्तव
संस्कृती की मुखवटा?
भारतीय समाजात स्त्रीशोषण, पितृसत्ताक व्यवस्था आणि संस्कृतीच्या नावाखाली चालणाऱ्या अनेक गोष्टी आजही खोलवर रुजलेल्या आहेत. समाजामधे अशा अनेक गोष्टी असतात ज्या मुळे एका विशिष्ट घटकांच माणूसपण हिरावलं जातं, मात्र त्या गोष्टी ज्यांच्या हिताशी संबंधीत आहेत ते लोक या गोष्टी कशा चांगल्या आहेत असा डांगोरा कायम पिटत राहतात. तर कधी त्यावर संस्कृती नावाचं पांघरूण घालून सराईतपणे लपवल्या जातात. खरं तर संस्कृती ही माणसाला माणूसपण बहाल करणारी असावी आणि अशाच जीवनपद्धतीला संस्कृती म्हणायला हवं. मात्र होत उलटंच — आपल्याला सोईस्कर असणाऱ्या गोष्टीनां संस्कृती म्हणून खपवलं जातं.
संस्कृती जर प्रश्न विचारू देत नसेल, तर ती संस्कृती नसून नियंत्रणाचं साधन आहे.
स्त्रीशोषणाचं उदात्तीकरण
अगदी त्या शोषितलाही शोषणाच्या सांगाड्यावर चढवलेला थरच खरा वाटायला लागतो. हेच स्त्री जीवन आणि स्त्रीशोषणाच्या वास्तवात वर्षांनूवर्ष सुरू आहे. तिच्या हिताच्या विरोधात असणाऱ्या अनेक गोष्टी कशा श्रेष्ठ आहेत असं सांगून त्याचं उदात्तीकरण केलं जातं. थोडक्यात तिच्या गुलामीच उदात्तीकरण व्यवस्थेन केलेलं आहे.
जेव्हा अन्यायाला “परंपरा” म्हटलं जातं, तेव्हा तो अधिक धोकादायक होतो.
आवाज दाबण्याची पद्धत
एखाद्या पुरुषांने चारचौघात परखडपणे आपले विचार मांडले तर त्याची वाहवा होते. मात्र त्याच ठिकाणी जर स्त्री असेल तर तिला टिकेला तोंड द्यावे लागते. समाज अगदी तिच्या चारित्र्यवर शिंतोडे उडवण्यापर्यंत मजल मारतो. याचाच अर्थ असा होतो की बाईने अन्याया विरोधात कधीच आवाज उठवता कामा नये. जर ती बोलायला शिकली तर तिच्या वर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडेल, तिच्या विरोधात बनवल्या गेलेल्या जाचक नियमांना नकार देईल आणि तिला गुलाम बनवण्यासाठी वर्षेनुवर्ष उभी केलेली तटबंदी ती ध्वस्त करून टाकेल. हे जर होवू द्यायचं नसेल तर तिच्या भोवती भ्रमाचं जाळं विणून ठेवायची तरतूद त्यांनी आधीच करून ठेवलेली आहे.
स्त्रीचा आवाज हा धोकादायक नाही, तर तो व्यवस्थेला अस्वस्थ करणारा आहे.
शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं राजकारण :
तिने कसं असायला हवं हे दुसऱ्याच कुणीतरी ठरवलेलं असतं किंवा तिचं खरं स्वरूप तिलाही कळू नये अशा स्थितीत झाकून ठेवलेलं असतं. ती जेवढी अज्ञानी तेवढी चांगली गुलाम होईल हा हेतू साध्य करण्यासाठी तिला शिक्षणापासून वंचित ठेवून चुल व मुल यात अडकवून तिच्या कडून ढोरकष्ट करून घेऊन, अजून तिच्याच डोक्यावर उपकाराचे ओझे लादून, तिच्या अस्तित्वाला तिच्या स्वतःच्याच नजरेत कवडीमोल ठरवण्याचं काम व्यवस्थेकडून अगदी बिनचूक पणे केले जाते.
शिक्षण ही केवळ माहिती नाही, तर मुक्तीची सुरुवात आहे.
मानवाची अधोगती :
माणूस जेव्हा आदिम अवस्थेत होता तेव्हा त्याने आपल्या गरजा भागविण्यासाठी गरजे पुरतं निसर्गाकडून घेत गेला. मात्र माणसाची गरज एवढी वाढली की माणूस माणसाला गुलाम करून त्याच्या असहायतेचा फायदा घेण्यापर्यंत मजल गाठली आहे. हे मानवाच्या प्रगतीचं नाही तर अधोगतीचं लक्षण आहे.
हुंडा पद्धती : मानवी विक्रीचं अदृश्य स्वरूप
खरेदी विक्रीचा व्यवहार सर्व प्राणीमात्रातून फक्त मानवप्राण्यात प्रचलीत आहे. माणसाने माणसाला विकणे पण बाकी ठेवले नाही. भारतीय समाजात स्त्रीचं जीवन अवघड करण्यासाठी हुंडा पद्धतीला प्रतिष्ठा देऊन संस्कृतीच्या नावाखाली मानव विक्रीच्या बाजाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. खरेदी विक्रीच्या व्यवहारात पैसे देऊन खरेदी केलेली गोष्ट मालकाच्या हक्काची होते. मात्र स्त्रीला दुसऱ्याच्या घरी जाण्यासाठी ज्याच्या घरी जाऊन जन्म भर रहायचय, जिथे ती आपली सगळी हयात ज्या घरासाठी खर्ची घालायची असते, तेच लोक तिच्या आई वडीलाकडून पैसे घेतात. या पेक्षा स्त्री जीवनाची प्रतारणा ती काय असू शकते.
हुंडा ही परंपरा नाही, तर मानवी प्रतिष्ठेचा अपमान आहे.
आत्मभानाची गरज :
आणि यात गैर असं कुणाला काहीच वाटत नाही. त्या मुलीला सुद्धा काही वाटत नाही कारण ही संस्कृती आहे. मुली सुद्धा आपल्या बापाने जास्त हुंडा दिल्याचा थाट मिरवत असतात. मात्र हा त्यांचा जास्त अपमान आहे हेच त्यांना कळत नाही. त्यांना निकृष्ट दर्जाची वस्तू ठरवले गेले आहे हे कळण्याइतपत आत्मभान जागृत होवू दिलेलं नसतं.
जोपर्यंत आत्मभान जागृत होत नाही, तोपर्यंत गुलामी ओळखूही येत नाही.
बदलाची सुरुवात :
हे ज्या वेळी मुलिंच्या लक्षात येईल तेव्हा बदल व्हायला वेळ लागणार नाही. ज्या दिवशी स्त्रीला स्वतःची किंमत कळेल, त्या दिवशी कोणतीही पितृसत्ताक व्यवस्था तिच्यावर राज्य करू शकणार नाही.
बदल बाहेर नाही तर आधी विचारात सुरू होतो.
©®छाया बेले 🖋
हेही वाचा:
स्त्रियांनी माणुसपणाकडे वाटचाल करायला हवी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा