अम्रुता प्रितम | मराठी कविता

अम्रुता प्रितम


सहजच तुला वाचायला घेतलं...
अन् वाचता वाचता कधी माझ्यात सामावलीस कळलच नाही
तू कबरीतून जिवंत झालीस
का मला कबरीतून जिवंत केलस कळत नाही...
तुझ्यातील आगीने ध्वस्त केल्या अनेक तटबंद्या
सुर्यानेही तुझ्या कडूनच आग  घेतलीय म्हणे प्रखर होण्यासाठी
मानवता आणि स्वातंत्र्याचा अर्थ समजावण्यासाठी कुठल्यातरी वेगळ्याच जगातून आली असावीस असं वाटतं
अनेक वेळा चढवलं गेलं तुला क्रुसावर
तरीही गात राहिलीस मानवतेचं गीत
तुझी प्रत्येक ओळ कबीराच्या दोह्याचा अर्थ सांगून जाते
तू जगलीस केवळ सत्य आणि सत्य
हे नसतं एवढं सोपं


सुंदर स्त्री देहावरील मांसाच्या गोळ्यात खिळल्या अनेक नजरा
तुझ्यातला बुद्ध पाहता आला नाही कुणालाही
तू पाहिलास विध्वंस आत आणि बाहेर
तरीही शिंपडत राहिलीस
आब-ए-जमजम 
तुझ्या शब्दांतून जगावर
खाली येताना
हीरने दिलं असावं अमानत म्हणून तिचं प्रेम तुझ्याकडे
दुप्पट्यात गुंडाळून
म्हणूनच काळ्या फुलांच्या बागेतही
जपलास एक लाल गुलाब जिवापाड

®© छाया बेले नांदेड ✍🏼

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चांगली स्त्री: समाजाने घडवलेला सापळा की अजून काही? (Reality of Good Woman)

गालावर पडलेलीच थप्पड असते असं नाही : स्त्रीच्या आत्मसन्मानावरचे अदृश्य प्रहार

नवीन वर्षाचे स्वागत करताना .